स्नेहल तोडकर/विशेष लेख
भाऊ… हा शब्दच आपल्याला एक वेगळी ऊब देतो. तो फक्त आपला भाऊ नसतो, तर आपल्या आयुष्याचा सावलीदार असतो. लहानपणापासून मोठेपणापर्यंत त्याचं प्रेम, काळजी आणि रक्षण हे सतत जाणवतं. तो नेहमी आपल्या मागे उभा असतो, मग परिस्थिती कितीही अवघड असो.
माझ्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर, जेव्हा मी घाबरले, संभ्रमात पडले किंवा अडचणीत आले, तेव्हा माझ्या भावाने मला आधार दिला. त्याचं बोलणं कधी मृदू असतं तर कधी कठोर, पण त्यामागे एकच उद्देश असतो – माझं भलं. माझ्या प्रत्येक निर्णयात तो माझ्यासाठी एक मार्गदर्शक असतो.
लहानपणीचे भांडणं, खेळ, त्याची टोमणे – हे सगळं आजही आठवलं की चेहऱ्यावर हसू येतं. पण त्याचवेळी, तो रागावून मला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखायचा, हेही लक्षात राहतं. भावाचं रक्षण हे फक्त शारीरिक नसतं, तर मानसिक आणि भावनिक आधारही असतो.
तो माझ्यासाठी ढाल आहे, जो मला वाईट परिस्थितीपासून जपतो; किल्ला आहे, जो मला सुरक्षित ठेवतो; आणि प्रकाशाचा दिवा आहे, जो मला योग्य दिशेने चालायला शिकवतो.
माझ्या आयुष्यातील हा रक्षण करणारा भाऊ म्हणजे माझं सर्वात मोठं भाग्य आहे.