Team Newsskatta
आजकाल अनेक महिलांना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसॉर्डर (PCOD) म्हणजेच पीसीओडी या त्रासदायक आजाराचा सामना करावा लागत आहे. हार्मोनल असंतुलनामुळे वजन वाढ, अनियमित पाळी, थकवा आणि मानसिक तणाव यासारख्या समस्या निर्माण होतात. मात्र या समस्येवर केवळ औषधोपचार हा एकमेव उपाय नसून, आरोग्यदायी जीवनशैलीही तितकीच प्रभावी ठरते.
तज्ज्ञांच्या मते, नियमित झोप, संतुलित आहार आणि दररोजचा व्यायाम या तीन गोष्टी पाळल्यास पीसीओडीसारख्या आजारावर नियंत्रण ठेवता येते. फळे, हिरव्या पालेभाज्या, बीन्स, अक्रोड, बदाम, आणि मल्टीग्रेन पीठ यासारख्या फायबरयुक्त अन्नाचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.
मसालेदार, तेलकट आणि प्रक्रिया केलेले (प्रोसेस्ड) अन्न खाणं टाळा. त्याऐवजी सत्त्वयुक्त पदार्थ, प्रथिने, आणि संपूर्ण धान्यांचा समावेश असलेला आहार घ्या. झोपेची वेळ आणि खाण्याची वेळ नियमित ठेवा, कारण शरीरातील बायोलॉजिकल क्लॉक बिघडल्यास हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होऊ शकतं.
तणाव कमी करणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी योगा, ध्यान, संगीत किंवा नृत्य यांसारख्या तणावमुक्त करणाऱ्या क्रिया उपयुक्त ठरतात.
खरं तर, पीसीओडी हा आजार असला तरी त्यावर नियंत्रण मिळवणं तुमच्या हातात आहे. शस्त्रक्रियांच्या किंवा दीर्घकालीन औषधोपचारांच्या आधी, आपल्या जीवनशैलीत बदल करूनही खूप काही सुधारणा करता येऊ शकते. यासाठी लागतो फक्त सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वतःकडे लक्ष देण्याचा दृढ निश्चय.