अभिजित कोतोलीकर/जिल्हा प्रतिनिधी
राधानगरी- महिला या कुटूंबाचा मुख्य कणा असून त्यांच्यावर संपूर्ण कुटूंबाच्या आरोग्याची जबाबदारी असते. त्यामुळे कुटूंबातील प्रत्येक महिला निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब देखील निरोगी राहील असे प्रतिपादन जेनेसिस कॉलेजच्या सचिव आरती अभिजित तायशेटे यांनी व्यक्त केले.
जेनेसिस कॉलेज राधानगरी, ग्रामपंचायत कुडुत्री आणि अँपल सरस्वती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कुडुत्री येथील कल्लेश्वर मंदिरात करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.
या आरोग्य शिबिरात तब्बल १४२ महिलांनी सहभाग नोंदवीला. या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, थकवा, थायरॉईड, स्त्रीरोग, कॅन्सर, किडनी व मेंदू विकार यांसारख्या आजारांची मोफत तपासणी, मार्गदर्शन तसेच मोफत औषधवाटप करण्यात आले.
यावेळी वक्रतुंड एज्युकेशन सोसायटी, राधानगरीच्या सचिव सौ. आरती अभिजित तायशेटे यांनी महिलांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. "घरातील स्त्री आरोग्यदृष्ट्या सक्षम असेल, तर संपूर्ण कुटुंब आरोग्यदृष्ट्या सक्षम होतं. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान गोकुळचे विद्यमान संचालक व माजी अर्थ व शिक्षण समिती सभापती अभिजीत तायशेटे यांच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रम गेली अनेक वर्षे या परिसरात राबविण्यात येत आहेत. यापुढील हे उपक्रम असेच सुरु ठेवण्यात येणार असून या सर्वच उपक्रमांना आपण उस्फुर्त प्रतिसाद व आशीर्वाद द्यावेत अशी विनंती देखील सौ.आरती तायशेटे यांनी यावेळी केली.
तर संचालिका अवंतिका तायशेटे यांनी, महिलांच्या आरोग्यावर लक्ष दिल्यास आपण सशक्त समाज निर्माण करू शकतो." असे मत व्यक्त करत महिलांच्या आरोग्याबद्दलच्या जागरूकते संदर्भात आपले विचार व्यक्त केले.
डॉ. श्रीया गाढवे (अॅपल हॉस्पिटल, कोल्हापूर) यांनी ऋतूनुसार बदलणाऱ्या हवामानाचा आरोग्यावर होणारा परिणाम समजावून सांगितला, तर जनसंपर्क अधिकारी जयश्री गाठी यांनी गावपातळीवर आरोग्य जनजागृतीचे महत्व विशद केले.
या उपक्रमासाठी लोकनियुक्त सरपंच शिवाजी चौगले, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
NSS विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग:
या उपक्रमात Genesis College च्या फार्मसी विभागातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटमधील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध, सेवाभावी आणि व्यावसायिक पद्धतीने मोलाचे योगदान दिले. रुग्ण नोंदणी, तपासणी व्यवस्थापन, औषध वितरण आदी बाबींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.हा उपक्रम केवळ एक आरोग्य शिबिर नव्हे, तर ग्रामीण महिलांच्या आरोग्यविषयी जागरूकतेचा एक स्तुत्य प्रयत्न ठरला. शिबिरात सहभागी महिलांनी समाधान व्यक्त करत भविष्यकाळातही असेच उपक्रम आयोजित करण्याची मागणी केली.