कोल्हापूर –
शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील मठात गेल्या तीन दशकांपासून वास्तव्य करणारी माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण अखेर गुजरातकडे रवाना झाली, पण तिच्या जाण्याने पंचक्रोशीतील नागरिकांच्या भावना तीव्रतेने दुखावल्या आहेत. आता महादेवीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी कोल्हापुरात जनआंदोलन उभं राहत असून, कायदेशीर लढाईलाही सुरुवात झाली आहे.
गेल्या सोमवारी (२८ जुलै) रात्री महादेवी हत्तीण गुजरातमधील अंबानी समूहाच्या वनतारा प्रकल्पाकडे रवाना झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र, नांदणी परिसरातील सर्वधर्मीय ग्रामस्थांनी तिला अश्रुपूरित डोळ्यांनी निरोप दिला.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत अंबानी समूहाच्या जिओ सिमकार्डसह त्यांच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. महादेवीला परत आणण्यासाठी केवळ भावना नव्हे, तर कायदेशीर तयारीही सुरू करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या पातळीवरही या मुद्द्यावर गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. यासंदर्भात शुक्रवारी (१ ऑगस्ट) महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने आणि खासदार धनंजय महाडिक यांची उपस्थिती होती.
या बैठकीबद्दल माहिती देताना मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले की, “वनतारा प्रकल्पाच्या सीईओंनी सांगितले आहे की, त्यांच्या संस्था सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच काम करत आहेत. जर भविष्यात न्यायालय महादेवीला नांदणीत परत पाठवण्याचे निर्देश देते, तर वनतारा त्यास पूर्ण सहकार्य करेल.”
याशिवाय, वनताराचे सीईओ यांनी सुचवले की, “जर गरज भासली, तर नांदणी मठात वनताराचे युनिट सुरू करण्याची तयारीही आमची आहे. मात्र आमचा या प्रकरणात कोणताही थेट हस्तक्षेप नाही. आम्ही केवळ न्यायालयीन आदेशाचे पालन करत आहोत.”
मंत्री आबिटकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले, “कोल्हापूरच्या जनतेच्या भावना आम्ही सर्वोच्च न्यायालयात मांडणार आहोत. मात्र, न्यायव्यवस्थेत फक्त भावना महत्त्वाच्या नसून कायदेशीर प्रक्रिया देखील तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे या मुद्द्यावर कायदेशीर लढाई देखील लढावी लागेल, याची आम्हाला जाणीव आहे.”
महत्त्वाचे म्हणजे, या बैठकीत नांदणी मठाचे मठाधिपती, वनतारा प्रकल्पाचे प्रमुख आणि स्थानिक नेतृत्व यांच्यात सुसंवाद झाला. दोन्ही बाजूंच्या भावना समजून घेण्यासाठी आणि पुढील कायदेशीर वाटचालीसाठी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरली आहे.
या सगळ्या घडामोडींमुळे कोल्हापूरकरांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरूनही “माधुरीला परत आणा” अशी मोहीम छेडली असून, स्थानिक स्तरावर आंदोलनांचाही विचार सुरू आहे.
माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण ही केवळ एक प्राणी नसून, कोल्हापूरकरांची भावना आहे. तिच्या परतीसाठी कायदा आणि भावना यामध्ये समतोल साधत आता सरकारकडूनही पावले उचलली जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत, हजारो नागरिकांचे डोळे आता ‘वनतारा’च्या दाराशी लागले आहेत.