कोल्हापूर - २१ जून – ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’… दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण जगभर हा दिवस साजरा होईल. पण यंदाचा योग दिन साजरा करत असताना आपल्याला थोडं थांबून स्वतःकडे पाहण्याची गरज आहे. कारण फक्त शरीर फिट ठेवण्याचा मुद्दा पुरेसा राहिलेला नाही, आज मानसिक आरोग्य हा जास्त गंभीर विषय बनला आहे.आपण समाज म्हणून प्रगती करत आहोत, तंत्रज्ञानात झपाट्याने पुढे जात आहोत, पण या धावपळीच्या युगात एक अदृश्य अंधार आपल्या तरुण मनांना गिळून टाकतोय – तो म्हणजे वाढलेलं नैराश्य, नकारात्मक विचार आणि आत्महत्यांचं वाढतं प्रमाण.सध्या समाजात सर्वच वयोगटांमध्ये मनस्वास्थ्याचे प्रश्न गंभीरपणे समोर येत आहेत. लहान वयात नैराश्य, तरुणांमध्ये आत्महत्येचे विचार, मध्यमवयीनांमध्ये असहायतेची भावना, आणि वृद्धांमध्ये एकटेपणाची काळी सावली… ही सगळी स्थिती धोक्याची घंटा आहे.मुलांवरच्या अभ्यासाच्या स्पर्धा, मोबाईल-इंटरनेटच्या आहारी गेलेली जीवनशैली, सामाजिक तुलनांचा विषारी झोल, आणि सततचा अपयशाचा भयगंड… हे सर्व आजच्या मानसिक आरोग्य बिघडण्यामागचे मुख्य कारण बनले आहेत.राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (NCRB) च्या 2023 च्या आकडेवारीनुसार, भारतात दररोज सरासरी ४०० हून अधिक आत्महत्या घडतात. यामध्ये प्रामुख्याने १५ ते २९ वयोगटातील तरुणांचा मोठा वाटा आहे. ही संख्या केवळ आकडे नाहीत, ही आहेत कोसळलेल्या मानसिकतेची ओरड. विद्यार्थ्यांमधील आत्महत्या,आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या,कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या, प्रेमभंग, अपयश, अस्वस्थता… या सगळ्या गोष्टींचा गाभा एकच आहे – मन:शांतीचा अभाव,मी काहीच चांगलं करू शकत नाही’, ‘सगळं संपवलं तर बरं होईल’, ‘माझ्यामुळे सगळं बिघडलंय’ – हे शब्द सामान्य वाटतात, पण अशा विचारांमध्ये अडकलेला मेंदू मृत्यूच्या उंबरठ्यावर असतो. हे विचार फक्त क्षणिक नसतात, ते एका खोल खोल अंधारातून येतात.सोशल मीडियाचं गैरवापर, सततची तुलना, “परफेक्ट” लाईफचं आभासी दडपण, आणि संवादाचा अभाव – हे सर्व नकारात्मक विचार वाढवतात. लोक हसताना दिसतात पण आतून कोसळलेले असतात.मानसिक संतुलन म्हणजे मनात येणाऱ्या भावनांचं, विचारांचं, आणि प्रतिक्रियांचं सुसंवाद आणि समतोलपणे हाताळणं. आज अनेकांना कामाच्या ताणाखाली रडूही येत नाही, आणि आनंदात हसायला भीती वाटते.योग्य मानसिक संतुलन असलं की,निर्णयक्षमता सुधारते,नातेसंबंध सुदृढ होतात,शरीरावर ताणाचा परिणाम कमी होतो आणि आत्महत्येसारख्या विचारांना अटकाव मिळतो पण हे संतुलन सहज मिळत नाही. त्यासाठी लागतो आत्मनिरीक्षण, संयम, आणि योगाचा आधार.भारतीय संस्कृतीत योग हा केवळ शरीरासाठीचा व्यायाम नाही, तर तो मन, शरीर आणि आत्मा यांचं एकत्रित आरोग्य आहे. विशेषतः मानसिक आरोग्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे.श्वासाचं नियंत्रण शिकवणारा प्राणायाम – हा मानसिक शांततेसाठी रामबाण आहे. ‘अनुलोम-विलोम’, ‘भस्त्रिका’, ‘कपालभाती’ हे प्रकार मनावरचा ताण दूर करतात, विचारशक्ती वाढवतात.
ध्यान केल्याने मनातील विचारांची गर्दी कमी होते. जेव्हा आपण अंतर्मुख होतो, तेव्हा आपण स्वतःला अधिक चांगलं समजू लागतो. डिप्रेशन, ऍनझायटी यांसाठी ध्यान औषधासारखं आहे.
‘वज्रासन’, ‘पद्मासन’, ‘सर्वांगासन’, ‘शवासन’ – ही काही आसने विशेषतः मानसिक संतुलन राखण्यात मदत करतात. हृदयाच्या गतीवर नियंत्रण, मेंदूच्या पेशींना विश्रांती, आणि संपूर्ण शरीराला रिलॅक्स करणं – या सगळ्याचं योग हे एकत्रित साधन आहे.एक गोष्ट स्पष्ट आहे – फक्त औषधं किंवा काउन्सिलिंग पुरेसं नाही. सामाजिक बदल, सहानुभूती आणि संवादाची गरज आहे.शाळांमध्ये मानसिक आरोग्याविषयी शिक्षण द्यावं
पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा
सोशल मीडियाचा योग्य वापर शिकवावा
"आय वॉण्ट टू डाई" म्हणणाऱ्याला थट्टेने नाही, मदतीने उत्तर द्यावं,आणि यापलीकडे – योगासारख्या शास्त्राला समाजाच्या मूळ प्रवाहात आणणं आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं मन संभ्रमात आहे, विचार सतत नकारात्मक येतात, तर...
दररोज किमान १० मिनिटं ध्यान करा
झोपेचं वेळापत्रक ठेवा
सकाळी प्राणायाम सुरू करा
सोशल मीडियावर वेळ कमी करा
आणि सर्वात महत्त्वाचं – तुमच्या भावना कोणाशी तरी शेअर करा शेवटचा विचार: "श्वास घे, थांब, आणि पुन्हा चालायला सुरूवात कर" जग बदलतंय, पण त्याबरोबर आपण स्वतःला गमावत चाललोय. शरीर फिट ठेवण्यासाठी आपण जीम करतो, डाएट करतो, पण मनासाठी काय करतो? योग म्हणजे स्वतःकडे परत येणं. स्वतःचं मन समजून घेणं, त्यातली वेदना, चिंता, राग आणि दु:ख यांना सामोरं जाणं – हे सगळं योग शिकवतो. आणि म्हणूनच २१ जूनचा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ हा केवळ एक दिन नव्हे, तो एक संदेश आहे – "आपल्या मनासाठी वेळ काढा"