कोल्हापूर - भारतीय समाज हा पारंपरिक संस्कृतीचा ठसा बाळगणारा समाज आहे. येथे लैंगिकता,मासिक पाळी,शरीरातील बदल, लैंगिक संबंध यांसारख्या विषयांवर आजही मोकळेपणे बोलण्यास टाळाटाळ केली जाते. विशेषतः तरूण तरूणींच्या बाबतीत तर हा संकोच आणखीच गडद होतो. बदलत्या काळानुसार आणि वाढत्या सामाजिक व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मुलींसह मुलांनाही वयात येताना योग्य लैंगिक शिक्षण देणे आज अत्यंत आवश्यक झाले आहे. पूर्वीची कुटुंबव्यवस्था संयुक्त होती.मात्र आज ती कमी होत विभक्त कुटुंबात रुपांतर झाली आहे. आईवडील दोघेही नोकरीवर असल्यामुळे आपल्या पाल्यांवर पुरेसे लक्ष देणे,त्यांच्याशी संवाद साधणे अनेक वेळा राहून जातं. अशा परिस्थितीत वयात येणाऱ्या युवकांच्या शरीरातील बदलांबाबत, मासिक पाळी, लैंगिक भावना, सुरक्षित संबंध, लैंगिक अत्याचार याबाबत माहीती नसल्याने त्यांना गोंधळ, भीती, अपराधीपणा वाटतो. आज लहान वयातील मुले-मुली इंटरनेटचा वापर करतात. मात्र, इंटरनेटवर असंख्य चुकीची व अश्लील माहीती सहज उपलब्ध असते. वयात येताना निर्माण होणाऱ्या नैसर्गिक कुतूहलामुळे आजचा युवा त्या इंटरनेटच्या अश्लिलतेच्या जाळ्यात नकळत ओढला जातोय, त्यांना योग्य-अयोग्य यातील फरक कळत नाहीय. त्यामुळे अशावेळी योग्य शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, जे त्यांना वास्तव आणि शास्त्रीय दृष्टिकोन देऊ शकते.खास करून वयात येताना मुलींच्या शरीरात अनेक बदल होतात. मासिक पाळी सुरू होते. शरीराची वाढ वेगाने होते. स्तन विकास, केस वाढ, त्वचेतील बदल, वजनवाढ अशा गोष्टी त्यांना गोंधळून सोडतात. यावर कोणी बोलत नाही,काही कुटुंबातील ही परिस्थीती बदलली असली तरी समान्य कुटुंबात आजही मुलींना या विषयावर 'गप्प राहा' किंवा “हे बोलायचं नसतं” हे होतच असतं,अशी उत्तरे दिली जातात मात्र अनेक मुली आजही या सर्व गोष्टींच्या दडपणाखाली वावरत असतात,त्यांची ही भीती दूर करण्यासाठी,आत्मविश्वास देण्यासाठी लैंगिक शिक्षण गरजेचे आहे.
आज दुर्दैवाने लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. बहुतेक वेळा अत्याचारी ओळखीचेच लोक असतात. अशावेळी लहानपणापासूनच “चांगला स्पर्श - वाईट स्पर्श” (Good Touch – Bad Touch) यातील फरक माहीत असणे आवश्यक आहे. लैंगिक शिक्षण त्यांना हे शिकवते की, त्यांचे शरीर त्यांचे स्वतःचे आहे आणि कोणीही परवानगीशिवाय त्यांना स्पर्श करू शकत नाही. ही जाणीव त्यांना सुरक्षित ठेवू शकते.आपल्या समाजात आजही मासिक पाळी म्हणजे घाण,अशुद्धता आणि टाळण्यासारखी गोष्ट मानली जाते. अनेक ठिकाणी मुलींना घराबाहेर काढणे, देवपूजेला बंदी, स्वयंपाकाला स्पर्श न करणे, शाळेत न जाणे असे नियम लादले जातात.आणि त्यामुळे योग्य लैंगिक शिक्षण हे मुलींना मासिक पाळी ही एक नैसर्गिक, शारीरिक प्रक्रिया असल्याचे शिकवते. यामुळे त्यांचा मानसिक ताण कमी होतो आणि त्यांना आत्मविश्वास मिळतो.सोबतच आधीच्या काळी मुली घरीच राहत असल्यामुळे पाळीच्या काळात आराम करायला मिळायचा मात्र आता परिस्थिती बदलली आहे.आजची महिला घरासोबतच बाहेरचीही जबाबदारी योग्यपद्धतीने सांभाळते,काळ बदलला असली तरी मात्र स्त्रियांना त्या दिवसांना,त्या त्रासाला समोरे जावेच लागते. त्यामुळेच स्त्रियांना पाळीच्या दिवसांत २ दिवस period leave देण्याची मागणी सध्या वाढत चालली आहे.पण त्यासाठी पुरूषांनाही स्त्रियांना त्या काळात होणाऱ्या त्रासाबद्दल तिच्या शरीरातील बदलांबद्दल माहित असणे महत्वाचे आहे,स्त्रीयांमधील हार्मोनल बदल त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करतात. भावनिक चढ-उतार, चिडचिड, नैराश्य, अपराधीपणा, एकटेपणा, कमी आत्मविश्वास अशा समस्या मुलींमध्ये दिसतात. त्यामुळे त्या शिक्षणाची सुरूवात योग्य वयात होणे गरजेचे आहे, लैंगिक शिक्षण केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक बदलांचाही समावेश करून मुलींना त्यातून मार्ग काढायला शिकवते. काही तरूण-तरुणी कोवळ्यावयात प्रेमसंबंधात गुंततात.अशावेळी त्यांना सुरक्षित लैंगिक संबंध,गर्भधारणा,गर्भनिरोधक, लैंगिक रोग याविषयी योग्य माहीती मिळणे अत्यंत गरजेचे आहे.अन्यथा चुकीच्या माहितीमुळे किंवा दबावामुळे मुली अनेकदा गर्भधारणा, लैंगिक रोग, मानसिक ताण अशा संकटात सापडतात. लैंगिक शिक्षण त्यांना निर्णयक्षम बनवते.शिक्षण मुलींना केवळ शारीरिक किंवा लैंगिक माहीती देत नाही, तर त्यांना लैंगिक समानतेचा संदेश देते. “मुलं असं करू शकतात, मुली नाही” हा भेद दूर करते. मुलीही आपल्या शरीरावर, निर्णयावर हक्क सांगू शकतात, ही जाणीव त्यांच्यात निर्माण करते. यामुळे त्यांना आत्मभान येते आणि समाजात आपले स्थान ठामपणे मांडता येते. पालकांनीच या विषयावर खुलेपणाने बोलले पाहिजे. “हे विषय शाळेत शिकवले जातीलच” असे गृहित धरू नये.यासाठी पालकांनी मुलींशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवणे आवश्यक आहे, कारण सर्वप्रथम मुली आईवडिलांकडेच उत्तर शोधतात.पालकांकडून योग्य उत्तर न मिळाल्यास उपलब्ध असलेल्या इंटरनेटचा आधार घेतात, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना शांतपणे उत्तर देणे, कोणताही संकोच न ठेवता चर्चा करणे आवश्यक आहे. शाळांनीही लैंगिक शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित न ठेवता प्रतिकात्मक प्रात्यक्षिकांसह शिकवावे. यासाठी तज्ज्ञ, डॉक्टर, समुपदेशक यांची मदत घ्यावी. मुलींना प्रश्न विचारण्यासाठी मोकळी जागा आणि गोपनीयता देणे गरजेचे आहे.म्हणून वयात येताना योग्य लैंगिक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. ते केवळ शारीरिक माहितीपुरते मर्यादित नाही, तर मानसिक, सामाजिक, भावनिक, आरोग्यविषयक अशा अनेक अंगांना स्पर्श करते. आजच्या बदलत्या समाजात मुलींनी सशक्त, आत्मविश्वासपूर्ण, सुरक्षित आणि सुखी आयुष्य जगावे, यासाठी मुलांसह मुलींनाही लहान वयापासूनच योग्य, शास्त्रीय आणि खुलेपणाने दिलेले लैंगिक शिक्षण अत्यंत आवश्यक आहे.
(विशेष लेख जुही धर्मे -मुंबई)