🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

रक्ताचे डाग – फक्त भिंतीवर नव्हे, महाराष्ट्राच्या काळजात

 


टीम NewsKatta 

देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात एक अशी घटना घडावी, की जी आपल्या संस्कृतीला काळिमा फासेल, असं कोणाला वाटलं होतं? आर.एस. दमानिया शाळेत घडलेली ही घटना केवळ शाळेच्या चार भिंतीत बंद राहत नाही. ती राज्याच्या मनाला जखम करते, आपल्या समाजाची लज्जास्पद परिस्थिती जगासमोर उघडी पाडते.


एका शाळेत स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळतात. त्या रक्ताने कोणीही घाबरलं नसतं, जर शाळेच्या प्रशासकांची मती कुंठित झाली नसती. मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण त्या रक्ताला अपराध म्हणून पाहिलं गेलं. इतकंच नव्हे, तर शाळेतील सहावी ते दहावीच्या मुलींना विवस्त्र करून तपासण्यात आलं – कुणाला पाळी आली आहे, हे शोधण्यासाठी!

काय म्हणावं या देशाच्या शिक्षण व्यवस्थेला? ज्या शाळांमध्ये मुलामुलींमध्ये पाळीविषयी गैरसमज दूर करण्यासाठी वर्ग घ्यायला हवेत, त्या शाळेत मुलींना भिंतीवरच्या रक्ताच्या डागांसाठी जबाबदार ठरवलं गेलं.


त्या मुलींच्या डोळ्यात किती भय, किती अपमान, किती लाज मिसळलेली असेल, याचा विचारही अंगावर शहारे आणतो. शिक्षिका आणि महिला कर्मचाऱ्यांनी तपास केला, म्हणे. पण विवस्त्र करणे ही कोणत्याही परिस्थितीत क्षम्य गोष्ट नाही. मुलींच्या आत्मसन्मानावर, मानव्यतेवर, त्यांच्या अधिकारांवर हे थेट आघात आहेत.

त्यात आणखी भयावह म्हणजे शाळेत पाण्याचा अभाव असल्याने, मुलींनी भिंतीवर पुसलेले रक्ताचे डाग प्रोजेक्टरवर दाखवण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांसमोर त्या मुलींची जाहीर नाचक्की झाली. आणि ही घटना मुलींनी रडत-रडत घरी जाऊन सांगितली. त्या शब्दांनी घराघरात आग पेटली.


या साऱ्या प्रकारानंतर संतप्त पालकांनी शाळेसमोर, पोलिस ठाण्यासमोर ठिय्या दिला. पोलिसांनी अखेर प्राचार्य आणि आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. प्राचार्य आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. पण हे सगळं पुरेसं आहे का? त्या मुलींच्या आत्मसन्मानाचं काय? त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या भीतीचं, लाजेचं, अपमानाचं काय?


या आर.एस. दमानिया शाळेतील घटनेचा गाभा म्हणजे आपल्या समाजातील अजूनही टिकून असलेला अज्ञानाचा अंधकार. मासिक पाळी ही गुन्हा नाही. ती निसर्गाची देणगी आहे. पण आजही अनेक ठिकाणी ती अपवित्र, लाजिरवाणी मानली जाते. शाळेतल्या शिक्षिका आणि महिला कर्मचाऱ्यांनीही हे समजून घ्यायला हवं होतं. विवस्त्र तपास करणे म्हणजे केवळ शारीरिक अपमान नाही, तर मुलींच्या मनावर आयुष्यभर राहणारी जखम आहे.


आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. पुन्हा हेच लोक तुप-लोणी लावायला तुमच्याकडे येतील. पुन्हा गोड बोलतील. पण आज या घटना विसरू नका. आर.एस. दमानिया शाळेतील अपमान विसरू नका. मुक्ताईनगरच्या मुलीची असहाय अवस्था विसरू नका. गोंदियाच्या कोसळलेल्या पुलाचं भगदाड विसरू नका. कारण हेच प्रश्न उद्या तुमच्यावरही येऊ शकतात.


महाराष्ट्रातील जनतेला आता डोळस होण्याची वेळ आली आहे. आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी, आपल्या कष्टाने भरलेल्या करांच्या योग्य वापरासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला आवाज उठवावा लागेल.


राजकारणी येतील आणि जातील. पण ज्या समाजात मुलींना विवस्त्र केलं जातं, जिथे पुलं सहा महिन्यात कोसळतात, जिथे नेते सरकारी गुंडगिरी करतात – तिथे लोकशाहीला जीवंत ठेवायचं असेल, तर आपल्याला जागं व्हावं लागेल.

शाळेत रक्त सांडलं. भिंतीवर डाग दिसले. त्या रक्ताचे डाग प्रोजेक्टरवर दाखवून मुलींना अपमानित करण्यात आलं. पण या साऱ्या घटनांमध्ये मोठा प्रश्न उरतो –

> रक्त भिंतीवर होतं, की आपल्या व्यवस्थेच्या काळजात?

महाराष्ट्राच्या काळजातच सांडलंय रक्त. आणि ते साफ करायचं काम आपणच करायचं आहे.




महाराष्ट्रातील शाळेत मुलींना विवस्त्र केल्याची घटना,–लाज आणणारी घटना आणि जनतेची जबाबदारी.





थोडे नवीन जरा जुने