🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

गायत्री रेळेकर आत्महत्या – दीड तासाचा गूढ .... शेवटचा कॉल..... आणि आयुष्याचा शेवट...

अजय शिंगे / कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील एका प्रेमळ, हसतमुख आणि धाडसी मुलीचा मृत्यू आज संपूर्ण परिसराला हादरवून गेला आहे. गायत्री रेळेकर (वय 21) या विद्यार्थिनीने कोल्हापूरमधील महिला वसतिगृहात गळफास घेतल्याची बातमी ११ ऑगस्ट रोजी दुपारी पसरली, आणि त्या क्षणापासून तिचे कुटुंब, मित्रमैत्रिणी आणि ओळखीचे लोक एका प्रश्नाने त्रस्त झाले आहेत  “आमची गायत्री आत्महत्या करणारच नाही, मग नेमके घडले काय?”

गायत्री ही सांगलीतील साध्या, प्रेमळ आणि एकजूट कुटुंबातील कन्या. शिक्षणात हुशार, घरात जबाबदार आणि मित्रमैत्रिणींमध्ये नेहमी हसतमुख म्हणून ओळखली जात असे. कुटुंबात ती सर्वांशी मोकळेपणाने वागत असे, कोणतीही गोष्ट लपवत नसे.तिचा शैक्षणिक प्रवास कोल्हापूरपर्यंत पोहोचला. ती तिथे उच्च शिक्षण घेत होती आणि महिला वसतिगृहात राहत होती.


रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी ती घरी आली होती. केवळ रक्षाबंधनच नाही, तर कुटुंबातील एका वाढदिवसाचा आनंदही तिने घरच्यांसोबत साजरा केला. घरातील पाळीव मादी कुत्रीला पिल्ले होणार असल्याने, तिनेच तिची जागा व्यवस्थित करून ठेवली होती. गणेशोत्सवाच्या तयारीबद्दल ती उत्साहाने बोलत होती.

11 ऑगस्ट रोजी नक्की काय झाले....

सकाळी ९ वाजता: गायत्री घरातून कोल्हापूरला निघाली.

साडेअकरा: तिने वडिलांना फोन करून सांगितले, “मी सुखरूप पोहोचले.”

दुपारी १:३०: तिच्या मैत्रिणीच्या आईचा फोन आला गायत्रीशी निवांत आणि आनंदी संभाषण झाले होते. कोणत्याही तणावाची लक्षणे नव्हती.

दुपारी ३ वाजता: धक्कादायक बातमी गायत्रीने गळफास घेतला आहे.फक्त दीड तासांच्या आत हा बदल हसतमुख, तणावमुक्त मुलगी मृत अवस्थेत सापडणे कुटुंबाला अजूनही स्वीकारणे कठीण जात आहे.

गायत्रीचे वडील म्हणतात 

 “माझी मुलगी खूप धाडसी होती. ती असे पाऊल कधी उचलणार नाही. पंचनामा आमच्या समोर झाला नाही. हॉस्टेलचे सीसीटीव्ही फुटेज, पोस्टमार्टम रिपोर्ट, सीडीआर, कॉल रेकॉर्डिंग आम्हाला दाखवावे. एवढ्या छोट्या खोलीत व हलक्या पंख्याला ६५ किलो वजनाची व्यक्ती लटकू कशी शकते? हे कोडे सुटत नाही.”

आईचा भावनिक प्रश्न 

 “तिच्यावर कोणाचा दबाव आला का? हॉस्टेलमध्ये काही प्रॉब्लेम होता का? पोलिसांनी खरे कारण सांगावे. माझी गायू अशी नव्हती.”

बहिणींचा आरोप....

 “तिला रूममध्ये खाली उतरवून ठेवले, आम्हाला जवळ जाऊ दिले नाही. हात लावू दिला नाही. माध्यमांमध्ये आलेल्या काही गोष्टी खोट्या आहेत. आमची बहिण असं काही करूच शकत नाही.”

मृत्यूपूर्वीचा फोन नक्की कोणाचा 

पोलिस तपासात समोर आलेली महत्त्वाची बाब म्हणजे गायत्रीने मृत्यूपूर्वी एका तरुणाशी फोनवर बोलणे.वसतिगृहातील एका विद्यार्थिनीने सांगितले की, त्या वेळी गायत्री रडत होती. नेमके काय बोलणे झाले, याची माहिती अजूनही सार्वजनिक केलेली नाही. हा कॉल आणि त्याचा आशय हा तपासाचा महत्त्वाचा धागा ठरू शकतो.

गायत्री राहत असलेल्या वसतिगृहाच्या खोलीबाबतही संशय आहे. खोली लहान, पंखा साधारण, आणि त्यावर ६५ किलो वजन सहन करण्याची क्षमता शंकास्पद. फॉरेन्सिक तज्ज्ञांचे मत मिळवण्याची गरज आहे.विद्यार्थ्यांच्या मते, वसतिगृहात योग्य सुरक्षा व मानसिक आरोग्य सहाय्याची कमतरता आहे.


मानसशास्त्रज्ञ: कॉलेज आणि वसतिगृहातील मानसिक ताण, एकाकीपणा किंवा सामाजिक दबाव विद्यार्थ्यांना त्रास देऊ शकतो. पण अचानक घेतलेले पाऊल सहसा काहीतरी तातडीच्या कारणाने होते.

फॉरेन्सिक तज्ज्ञ: पंख्याची ताकद, गळफासाचे स्वरूप, आणि घटनास्थळावरील पुरावे तपासूनच आत्महत्या नक्की कशी हे सांगता येईल

कायदा तज्ज्ञ: अशा प्रकरणात पंचनामा, पीएम रिपोर्ट आणि सीडीआर हे पुरावे महत्त्वाचे. त्यांची पारदर्शकता आणि वेळेवर मिळणे गरजेचे.

सामाजिक प्रश्न आणि मानसिक आरोग्य

विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे आकडे सांगतात. यामागे शैक्षणिक दडपण, कुटुंबापासून दूर राहण्याची सवय न लागणे, तसेच तातडीच्या संकटाला सामोरे जाण्याची मानसिक तयारी नसणे, हे घटक असतात. पण गायत्रीच्या बाबतीत तिचे कुटुंब ठाम आहे की, ती मानसिकदृष्ट्या खंबीर होती.

रेळेकर कुटुंबाची मागणी

1. सर्व पुरावे (सीसीटीव्ही, सीडीआर, पीएम रिपोर्ट) पारदर्शकतेने द्यावेत.

2. मृत्यूपूर्वीच्या कॉलची सविस्तर चौकशी व्हावी.

3. हॉस्टेल व्यवस्थापनाच्या भूमिकेचा तपास व्हावा.

पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. कुटुंब न्यायालयीन लढाईचीही तयारी करत आहे.

विद्यापीठ प्रशासन- 

विद्यापीठ प्रशासनाने यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की या प्रकरणात हॉस्टेल आणि विद्यापीठाचा काही संबंध नाही आहे तिचं कॉल सुरू असलेले भांडण आणि त्यानंतर झालेला निर्णय आहे तो पोलिसांनी पण प्रथमदर्शी तसेच म्हणणे मांडले आहे. कॉल डिटेल्स आणि सर्वांची चौकशी झाल्यानंतर PM Report आल्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा होईल.

गायत्री रेळेकर प्रकरण केवळ एका कुटुंबाचा वैयक्तिक शोक नाही; हा प्रत्येक पालक, विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थेसाठी धडा आहे. सुरक्षितता, मानसिक आरोग्य, पारदर्शक तपास आणि जबाबदार प्रशासन हे सर्व घटक एकत्र आल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत.त्या दीड तासात काय घडले, हे उलगडल्याशिवाय केवळ गायत्रीच्या नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षेला न्याय मिळणार नाही.






थोडे नवीन जरा जुने