कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील मठात वर्षानुवर्षे असलेली आणि ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा भाग ठरलेली महादेवी हत्तीणीची अलीकडेच वनतारा रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये बदली करण्यात आली. या घटनेमुळे नांदणी गावात प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी रिलायन्स Jio कंपनीविरोधात भावनिक आणि सामाजिक पातळीवर निषेध व्यक्त करत सिम कार्ड पोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
"ही केवळ एक हत्तीण नव्हती, ती आमचं कुटुंब होती... तिच्या जाण्यानं जणू आमच्यातलाच एखादा माणूस निघून गेला आहे," अशा शब्दांत गावकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओ आणि क्लिप्समध्ये गावकरी अंबानी कुटुंबावर आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवताना दिसत आहेत. काही जणांनी तर मोबाईल शॉपमध्ये जाऊन Jio चे सिम कार्ड दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करतानाचे व्हिडिओही व्हायरल केले आहेत.
गावकऱ्यांच्या मते, "ही बाब राजकारणाशी संबंधित नाही, तर हृदयाशी जोडलेली आहे. महादेवी गेल्यानंतर आमच्या गावातून हसरा आवाज, आनंदी गजर नाहीसा झाला. या घटनेमुळे आम्ही संतप्त झालो आहोत आणि म्हणूनच रिलायन्स Jio विरोधात आम्ही आवाज उठवत आहोत."
नांदणी मठातील ही महादेवी हत्तीण ग्रामस्थांच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा एक अविभाज्य भाग होती. तिच्याशी जोडलेली श्रद्धा, पूजाअर्चा आणि भावनिक नाळ आता छाटल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही बाब केवळ वनविभागाची किंवा संस्थेची नाही, तर भावविश्वाशी संबंधित असल्याचा सूर जनतेतून उमटत आहे.
यावर अधिकृत प्रतिक्रिया म्हणून अद्याप Jio किंवा अंबानी समूहाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या या भावना आणि त्यांच्या निषेधाचे पडसाद सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचत आहेत.