कोल्हापूर - शाळा ही फक्त अभ्यासाची जागा नसते. ती एका आयुष्याच्या स्वप्नांची शाळा असते. तिथे मैत्री असते, शिस्त असते, आदर असतो… आणि सर्वात महत्त्वाचं – सुरक्षितता असते. पण जेव्हा याच सुरक्षिततेवर, याच आदरावर, याच विश्वासावर कुणी ओरखडा मारतो, तेव्हा संपूर्ण समाजाचा चेहरा हादरतो. सेनापती कापशी (कोल्हापूर) येथे नुकतीच घडलेली घटना याचं ज्वलंत उदाहरण आहे.एका सामान्य शाळेतील विद्यार्थिनी. ती दररोज वेळेवर येते, अभ्यास करते, शिक्षकांचा आदर करते आणि स्वप्न पाहते – एका दिवशी मोठं होण्याचं. पण तिला काय ठाऊक, की ती जिच्याजवळ शिकते, जिच्याकडून ती ज्ञानाची अपेक्षा करते, तोच शिक्षक तिच्या मनावर कायमचा ओरखडा उमटवेल.
त्या विद्यार्थिनीने सहन केलं दिवसेंदिवस एक, दोन नव्हे तर अनेक वेळा,तिच्या नजरेतला भेदरलेपणा, घाबरलेली वागणूक तिच्या आई-वडिलांना जाणवली. जेव्हा तिने घरच्यांना सांगितलं, तेव्हा त्या घरात एक क्षणभर शोकसंवाद पसरला. बापाची मान खाली गेली, आईचे डोळे पाणावले. मुलीच्या डोळ्यातून ‘माझी चूक काय?’ असा न बोललेला प्रश्न झिरपत राहिला.शाळा ही आई-वडिलांनंतरचा दुसरा विश्वासाचा आधार असतो. शिक्षक हा देवासमान असतो. पण जेव्हा देवताच राक्षसाची भूमिका घेतो, तेव्हा भक्तांना आधार गमावल्यासारखं वाटतं. सेनापती कापशीतील त्या शाळेतील विद्यार्थ्यांना, पालकांना हेच अनुभवावं लागलं.त्या मुलीच्या पालकांनी शाळेत तक्रार केली. पण अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं त्यांनी गावकऱ्यांना, इतर पालकांना बोलावलं. काही वेळात शाळेसमोर लोकांचा महासागर उसळला. प्रत्येकाच्या नजरेत राग नव्हता, फक्त वेदना होती – आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी उभी असलेली वेदना.एका आईनं रडत रडत म्हटलं, “मी तिला विश्वासाने इथे पाठवलं, पण इथंच तिचं स्वप्न फाटलं...” त्या शब्दांमागे हजारो पालकांचे हृदय होते.हजारोंचा जमाव संतप्त झाला होता. शिक्षकाला धडा शिकवण्यासाठी हातात काठ्या, दगड घेतले जात होते. पण याच वेळी पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून परिस्थिती हाताळली. शिक्षकाला ताब्यात घेतलं गेलं, गुन्हा दाखल झाला. लोक शांत झाले... पण त्या विद्यार्थिनीच्या मनात उठलेलं वादळ अजूनही थांबलेलं नव्हतं.शाळा बंद झाली. मुलगी घरी परत आली. आईच्या कुशीत शांत झोपण्याऐवजी, तिने खोलीचा दरवाजा लावून घेतला. आरशात पाहिलं, आणि स्वतःलाच विचारलं – “मीच चुकीची आहे का?” तिच्या मनात निर्माण झालेला संशय तिच्या आत्मविश्वासाला पोखरत होता.शिक्षक हा ‘गुरु’ असतो. गुरु म्हणजे अंधारातून उजेडाकडे घेणारा. पण येथे एक शिक्षक स्वतःच अंधार झाला. त्याने आपली भूमिका, आपला अधिकार आणि आपली माणुसकी पायदळी तुडवली. असे शिक्षक एकटा एकटा मुलीचं नव्हे, तर संपूर्ण समाजाचं नैतिक खच्चीकरण करतात
समाजाचा सवाल: शाळा सुरक्षित आहेत का?
या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले:
शाळांमध्ये मुलींची सुरक्षितता कुठं आहे?
शिक्षकांची पडताळणी, त्यांचं मानसशास्त्र तपासलं जातं का?
विद्यार्थिनींच्या तक्रारींना गांभीर्याने घेतलं जातं का?
मुलींनी आवाज उठवावा, पण त्यांना पाठिंबा मिळतो का?
या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधणं ही आता वेळेची गरज आहे.या प्रकरणात शिक्षणसंस्थेने त्या शिक्षकाला तात्काळ निलंबित केलं, ही गोष्ट सकारात्मक आहे. पण हे टाळाटाळीनं नव्हे तर जबाबदारीनं झालं पाहिजे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी संस्थांनी शिक्षकांची कार्यशैली, विद्यार्थ्यांची मानसिकता यावर सतत लक्ष ठेवणं आवश्यक आहे.या घटनेनं एक धडा दिला – पालकांनी आपल्या मुलींशी सतत संवादात राहायला हवं. त्यांचं वागणं, त्यांचा मूड, त्यांचे शब्द – हे सगळं जाणून घ्या. त्यांच्यावर विश्वास ठेवा, कारण त्यांच्या डोळ्यांत अनेकदा न सांगितलेली वेदना असते.ती मुलगी जर धीर करून आई-वडिलांना सांगितली नसती, तर आजही त्या शाळेत कदाचित इतर मुलींना तेच सहन करावं लागलं असतं. तिचं हे साहस खरंच सलाम करण्यासारखं आहे. समाजाने अशा विद्यार्थिनींचं संरक्षण केलं पाहिजे, त्यांना ‘दोषी’ समजणं थांबवलं पाहिजे.लोकमतने ही बातमी समोर आणली. सोशल मीडियावर ती व्हायरल झाली. समाजाच्या कानापर्यंत पोहोचली. अशा बातम्या केवळ वाचणं पुरेसं नाही, त्यातून शहाणपण घेणं गरजेचं आहे. पत्रकार म्हणून आपल्याला केवळ ‘स्टोरी’ न बनवता, ‘समाधान’ शोधणं हेच खरे पत्रकारितेचं बळ.शिक्षक होणं हे नोकरी नाही, ती एक जबाबदारी आहे – मुलांच्या भविष्यासाठी. एखाद्या चुकीच्या व्यक्तीमुळे सर्व शिक्षकांचा आदर कमी होतो. त्यामुळे अशा घटना होऊ नयेत यासाठी शिक्षकांमध्ये सातत्याने मूल्यसंस्कार, प्रशिक्षण, आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणं गरजेचं आहे.
सेनापती कापशीतील ही घटना केवळ एका शाळेची कहाणी नाही. ती समाजासाठी, शिक्षणसंस्थांसाठी आणि पालकांसाठी एक सणसणीत इशारा आहे.या विद्यार्थिनीच्या अश्रूंमध्ये एक चेतावणी आहे – "फक्त अभ्यास नको, सुरक्षा ही मूलभूत हक्क आहे." तुम्हीही पालक असाल, शिक्षक असाल, विद्यार्थी असाल किंवा फक्त एक संवेदनशील माणूस असाल… हा लेख वाचून जर तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल, तर कृपया तो दुर्लक्ष करू नका. याचं उत्तर शोधा – तुमच्या मुलांच्या भविष्याच्या उजेडासाठी.
✍️ लेखक: अजय शिंगे | © NewssKatta.Com
📲 Instagram: @journalistajay25