कोल्हापूर / पुष्पा पाटील
कोल्हापूर - इचलकरंजी शहरात वीज सेवा अधिक दर्जेदार व अखंडित करण्यासाठी महावितरणकडून राबवण्यात आलेली विशेष देखभाल व दुरुस्ती मोहीम यशस्वी झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि पावसाळ्यातील अडचणी लक्षात घेऊन राबवलेली ही मोहीम गेल्या पंधरा दिवसांपासून युद्धपातळीवर पार पडली. या अंतर्गत 10 किलोमीटर लांबीची एरियल बंच केबल (AB केबल) बसवण्यात आली असून तब्बल १२ हजार स्पेसर्सही (गार्डिंग लूप) जोडण्यात आले आहेत.
महावितरणच्या नियमित देखभाल उपक्रमाअंतर्गत एप्रिल-मे महिन्यांत कामे केली जात असतात. मात्र यावर्षी अवकाळी पावसामुळे काही कामे रखडली. याशिवाय नव्या अडचणी उद्भवल्याने आमदार राहुल आवडे यांच्या सूचनेनंतर इचलकरंजी विभागाने ही विशेष मोहीम हाती घेतली.
शहरातील मुख्य बाजारपेठ, गांधी पुतळा, सुहरबाग, कबनूर, शहापूर, सांगली रोड, एसआयटी कॉलेज परिसर या भागांमध्ये ही केबल टाकण्यात आली आहे. या कामांमुळे वीज पुरवठा अधिक स्थिर होणार असून वीज चोरीसही आळा बसेल.
इतर महत्वाची कामे:
१२ हजार स्पेसर्स बसवले – अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत
१४ नवीन वितरण बॉक्स पेट्या बसविण्यात आल्या
३९ ठिकाणी वितरण पेट्यांची दुरुस्ती
झाडांच्या फांद्या छाटणे, वेल-झुडप काढणे
१६ ठिकाणी नादुरुस्त AB स्विचचे बदल
उपकेंद्रांमध्ये क्रिपिंग आणि स्वच्छता
मिरवणूक मार्गांवर कोटेड केबल बसवणे
मंडपाजवळील लघुदाब वाहिन्यांची उंची वाढविणे
या सर्व कामांमुळे सार्वजनिक सुरक्षा वाढेल, अपघातांचे प्रमाण घटेल आणि गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवणार नाहीत, अशी माहिती महावितरणचे कोल्हापूर मंडल अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी दिली.
कार्यकारी अभियंता वैभव गौंदिंल यांच्या नेतृत्वाखाली सर्व अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत मोठे योगदान दिले. कामे जलदगतीने आणि वेळेत पूर्ण करण्यात आली.
ग्राहकांसाठी हेल्पलाइन:
महावितरणबाबत तक्रार नोंदवण्यासाठी ग्राहकांनी ७८७५७६९१०३ या WhatsApp क्रमांकावर संदेश पाठवावा.
24x7 हेल्पलाइन क्रमांक:
📞 1912 / 19120
📞 1800-212-3435 / 1800-233-3435