मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अर्थात महावितरणने 'प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने'च्या प्रभावी अंमलबजावणीत देशपातळीवर आपल्या नेतृत्वाची ठसठशीत छाप पाडली असून, या कामगिरीची दखल घेऊन ‘रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स अवॉर्ड’ने थायलंडमधील फुकेत येथे महावितरणला सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार आणि विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट यांनी हा पुरस्कार स्विकारला.
स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने महाराष्ट्राचा आत्मनिर्भर वाटचाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राबवली जात असलेली 'प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना' ही देशातील घरगुती ग्राहकांसाठी क्रांतिकारक ठरली आहे. महाराष्ट्रात योजनेचा प्रभावी अंमलबजावणीचा भार महावितरणने समर्थपणे पेलत, महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
आजवर २ लाख ४२ हजार ७१४ घरगुती ग्राहकांच्या छतांवर सौर प्रकल्प बसवले गेले असून, एकूण ९१९ मेगावॅट सौर क्षमता उभारण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर आणि स्वतःची वीज निर्मिती दोन्ही शक्य झाले आहे.
या प्रकल्पांसाठी आतापर्यंत १६८५ कोटी ४२ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, हे या योजनेतील महाराष्ट्राच्या सक्रिय सहभागाचे मोठे उदाहरण आहे.
सौर ऊर्जेमुळे मिळणारे थेट फायदे..
१ ते ३ किलोवॅट क्षमतेचे सौर प्रकल्प बसवणाऱ्या घरगुती ग्राहकांना दरमहा १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळते.
अनुदानाचे स्वरूप:
१ किलोवॅट – ₹३०,०००
२ किलोवॅट – ₹६०,०००
३ किलोवॅट व अधिक – कमाल ₹७८,०००
बँकांकडून सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध.
गृहसंकुलांसाठी व कॉमन युटिलिटीसाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रकल्पासाठी प्रति किलोवॅट ₹१८,००० अनुदान, म्हणजेच कमाल ₹९० लाखांपर्यंतची मदत.