🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

राजकारणाने दुरावलेले दोन शेतकरी नेते एकाच सोफ्यावर, पण संवाद नाहीच!

इंदापूर

शेतकरी चळवळीचे एकेकाळचे अग्रणी चेहरे आणि पूर्वीचे सवंगडी – राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत – आज पुन्हा एकदा एकत्र दिसले, मात्र केवळ दृश्यापुरते! इंदापूर न्यायालयाच्या वकिलांच्या बार रुममध्ये दोघे एकाच सोफ्यावर बसले खरे, पण दोघांच्यात संवादाचा साधा प्रयत्नही झाला नाही, नजरानजर टाळल्यासारखाच प्रकार संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला.


हे दोघेही शेतकरी आंदोलनाशी संबंधित न्यायालयीन प्रकरणात हजेरी लावण्यासाठी आले होते. जिथे कधीकाळी एकत्र लढणारे हे दोन चेहरे होते, तिथे आज शब्दांचीही देवाण-घेवाण झाली नाही. एकेकाळी ‘शेतकरी स्वाभिमान’ या एका छत्राखाली लढणारे हे दोघं आज राजकारणाच्या भिंतीमुळे पूर्णतः विभक्त झाल्याचं दृश्य स्पष्ट दिसून आलं.


प्रसारमाध्यमांनी दोघांची पुन्हा एकत्र येण्याबाबत विचारणा केली असता, राजू शेट्टी यांनी खोतांवर थेट ताशेरे ओढले.

> "सरकारच्या विरोधात लढण्याची हिंमत त्यांच्यात असेल, असं मला वाटत नाही,"अशा स्पष्ट शब्दांत शेट्टींनी खोतांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.


या दोघांमधील दुरावा २०१७ साली ठळकपणे समोर आला होता, जेव्हा सदाभाऊ खोत राज्याचे कृषी राज्यमंत्री असतानाच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

त्यावेळी संघटनेच्या निर्णय समितीने खोतांवर "संघटनेशी प्रामाणिक राहिलो नाहीत" असा ठपका ठेवत, त्यांच्या पक्षनिष्ठेवरच प्रश्न उपस्थित केले होते.राजू शेट्टी यांनी त्या काळात सत्ताधाऱ्यांपासून फटकत घेतले, तर खोतांनी मात्र आपले मंत्रीपद कायम ठेवले. त्यामुळे त्यांच्यावर पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.


आजच्या या क्षणिक भेटीमुळे एक प्रश्न मात्र नव्याने समोर आला आहे.शेतकरी प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेत्यांना व्यक्तिगत व राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची वेळ आली आहे का?

इंदापूरच्या न्यायालयात घडलेली ही ‘शांत भेट’ अनेक अर्थांनी गूढ आणि प्रतीकात्मक ठरली. एकाच चळवळीतील दोन दिग्गज नेते – एकाच सोफ्यावर, पण भिन्न दिशांनी पाहताना – शेतकरी चळवळीतील विसंवाद आणि विभाजन अधोरेखित होतंय.एकत्र लढलेली स्वाभिमानाची लढाई आज ‘स्व’ केंद्रित राजकारणात हरवत चालली आहे का? – हाच खरा प्रश्न आजचा आहे.

थोडे नवीन जरा जुने