कोल्हापूर : घरातील वापरात नसलेल्या, मोडलेल्या, निष्क्रिय झालेल्या वस्तू उघड्यावर टाकून नुसतीच जागा व्यापतात असं नाही, तर पर्यावरणावरही परिणाम करतात. हे ओळखून कोल्हापूर महानगरपालिकेने आता घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 आणि पर्यावरण नियंत्रण मंडळाच्या सूचनांनुसार, नागरिकांनी घरगुती टाकाऊ वस्तू योग्य मार्गाने विल्हेवाट लावाव्यात यासाठी पालिकेच्या आरोग्य व घनकचरा विभागाने मोहिमेचे आयोजन केले आहे.
कशा प्रकारच्या वस्तू जमा करायच्या?
महानगरपालिकेच्या या उपक्रमांतर्गत नागरिकांनी खालीलप्रमाणे वस्तू त्यांच्या वॉर्ड कार्यालयात नेऊन सुपूर्त कराव्यात:
जुने कपडे, उशा, गाद्या, पादत्राणे
खराब झालेल्या इलेक्ट्रिक वस्तू – बल्ब, ट्यूबलाईट, बॅटरी
औषधांच्या जुन्या बाटल्या, एक्सपायरी झालेली डास व कीटकनाशके
धूळ, फडकं, कापडी साहित्य
आणि इतर न वापरता येणाऱ्या घरगुती वस्तू
संकलनाची वेळ आणि ठिकाणं
या वस्तू दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवार संकलित केल्या जातात.
याशिवाय, सोमवार ते शनिवार सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेत नागरिकांना त्यांच्या संबंधित वॉर्ड कार्यालयात या वस्तू स्वखर्चाने जमा करण्याची सुविधा दिली आहे.
स्वच्छता वॉर्ड कार्यालयांची यादी:
1. ए/1 – कपिलतीर्थ मार्केट
2. ए/2 – कळंबा फिल्टर हाऊस
3. ए/3 – कॉ. गोविंदराव पानसरे शाळा, राजोपाध्ये नगर
4. बी – महाराणी ताराराणी विद्यालय, मंगळवार पेठ
5. सी/1 – कोबडी बाजार मटण मार्केट
6. सी/2 – खोल खंडोबा
7. डी – पंचगंगा हॉस्पिटल
8. ई/1 – वि.स. खांडेकर शाळा, रेड्याची टक्की
9. ई/2 – तात्यासो मोहिते हायस्कूल, व्यापारी पेठ
10. ई/3 – एस बॅकवरती, कावळा नाका
11. ई/4 – कसबा बावडा, पॅव्हेलियन ग्राउंड
12. ई/5 – दत्तमंदिर समोर, महाडिक माळ, रुईकर कॉलनी
पर्यावरण रक्षणात प्रत्येकाचा वाटा महत्त्वाचा
हा उपक्रम केवळ स्वच्छता राखण्यासाठी नसून, पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना देण्यासाठी आहे. उघड्यावर किंवा नाल्यांमध्ये टाकल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे केवळ परिसरच नाही, तर पाणवठे, मोकळी जागा आणि सांडपाणी व्यवस्था यांवरही परिणाम होतो.
"शहराचे सौंदर्य आणि पर्यावरणाचे आरोग्य दोन्ही जपण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा," असे आवाहन पालिकेच्या आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले आहे.