🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

शाहूंच्या नगरीत शिक्षणाचं बाजारीकरण : कोल्हापुरात खाजगी अँकॅडम्यांचा सुळसुळाट

कोल्हापूर – एकेकाळी मूल्याधिष्ठित शिक्षणाचा आदर्श मानला जाणारा कोल्हापूर जिल्हा आज खाजगी अँकॅडम्यांच्या वाढत्या सुळसुळाटामुळे शिक्षणाच्या बाजारीकरणाचं केंद्र बनत चाललाय. UPSC, MPSC, मेडिकल, इंजिनीअरिंग, पोलीस भरती यांसारख्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 'यशाचं स्वप्न' दाखवून लाखो रुपयांची फी आकारली जात आहे.


एका बाजूला शेतकरी, कामगार आणि गोरगरीब कुटुंबातील पालक मुलांच्या शिक्षणासाठी जमीन, दागिने, जनावरे विकतात, तर दुसरीकडे काही अँकॅडम्या फसव्या जाहिराती, बनावट टॉपर्स आणि खोट्या गाजावाजाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या आशा विकत घेत आहेत.


अनेक कोचिंग क्लासेसनी प्रत्यक्ष शिकवलेल्या विद्यार्थ्यांऐवजी यशस्वी उमेदवारांचे फोटो पैसे देऊन वापरण्याची प्रथा सुरू केली आहे. "AIR Rank 1 आमच्या बॅचमधून" अशा जाहिराती मागील सत्य शोधताना अनेकदा केवळ पब्लिसिटी स्टंट आढळून येतात.


शिक्षणाच्या नावाखाली सुरू झालेला हा व्यवसाय आज एका मुलीचा आत्मविश्वास हिरावतोय, एका मुलाचे आयुष्य डागाळतोय, आणि अनेक पालकांच्या कर्जबाजारीपणाला खतपाणी घालत आहे. मागील तीन वर्षांत कोल्हापुरात कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी आहेत – आणि या आत्महत्यांमागे मानसिक ताण, अपयश, आणि अपेक्षांचा डोंगर आहे.राजर्षी शाहू महाराजांनी उभं केलेलं शिक्षणाचं समतेचं स्वप्न आज केवळ श्रीमंतांच्या आवाक्यात उरलं आहे. सरकारी शाळा, कॉलेज आणि मोफत योजनांऐवजी मुलं अँकॅडम्यांच्या 'पॅकेज'मध्ये अडकत आहेत.


शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्व घडवण्याची प्रक्रिया आहे, ती पैसे कमावण्याचा धंदा नाही. शासनाने फी नियंत्रण, जाहिरात धोरणांवर कारवाई, आणि योग्य दिशेने मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. अन्यथा शिक्षण व्यवस्था म्हणजे एक उत्पादन केंद्र बनेल – आणि विद्यार्थी केवळ ग्राहक.


माध्यमिक शाळांची देखील चौकशी सुरु 

 जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण क्षेत्रावर खाजगी अँकॅडम्यांचा प्रभाव वाढत चालल्यामुळे अनेक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती यावर नकारात्मक परिणाम होत असल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे पोहोचली आहे. त्यामुळे आता संबंधित शाळांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे प्रतिनिधींसह शाळांचा आकस्मिक दौरा सुरू असून, अँकॅडम्यांमुळे पारंपरिक शाळांमध्ये होत असलेल्या गैरहजेरीची सखोल चौकशी सुरू आहे.


अनेक शाळांमध्ये 8वी ते 10वीचे विद्यार्थी सकाळच्या सत्रात केवळ नावापुरते शाळेत दाखल होतात आणि उर्वरित वेळ खासगी कोचिंग क्लासेसमध्ये घालवतात. परिणामी शाळेचा शैक्षणिक स्तर आणि परिणामकारकता दोन्ही घटत आहेत.


أحدث أقدم