Kolhapur - कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा मूलभूत विकास साधण्यासाठी जिल्हा क्रीडा कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली शाहूजी सभागृहात पार पडलेल्या बैठकीत हा ठराव करण्यात आला.
या आराखड्याअंतर्गत पुढील 20-25 वर्षांकरता नियोजन करून, खेळाडू केंद्रित, तांत्रिक गरजांना पूरक, आणि आधुनिक सुविधा असलेली क्रीडा रचना उभारण्यात येणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
CSR निधी, शासन अनुदान व औद्योगिक सहकार्याने निधी संकलन
हॉकी स्टेडियम, गांधी मैदान, शिवाजी विद्यापीठ, जलतरण तलाव यांसह प्रमुख मैदानांचा दर्जा उंचावणार
स्पोर्ट्स हॉस्टेल, सिंथेटिक ट्रॅक, FIFA दर्जाचं फुटबॉल मैदान आणि प्रशिक्षण केंद्राची उभारणी
विभागीय क्रीडा संकुलाचा विस्तार आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्याची तयारी
जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटनांच्या सूचना विचारात घेऊन आराखडा तयार होणार
बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर, आणि विविध खेळांचे तज्ज्ञ व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “खेळाडू हा आराखड्याचा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि त्याला सर्व सुविधा सहज मिळाल्या पाहिजेत.”