कोल्हापूर, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला, स्वराज्य स्थापनेला आणि मराठा इतिहासाला साक्ष देणारा भव्य पन्हाळा किल्ला आता जागतिक नकाशावर ठळकपणे अधोरेखित झाला आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या प्रतिष्ठेच्या यादीत पन्हाळा किल्ल्याचा समावेश करण्यात आला असून, ही संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली आहे.
पन्हाळा किल्ला हा केवळ दगडधोंड्यांचा दुर्ग नव्हे, तर मराठी अस्मितेचा आणि इतिहासाच्या महाकाव्याचा एक सजीव पुरावा आहे. या किल्ल्याच्या भिंती, दरवाजे, गुप्त बुरुज आणि विशाल प्राचीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या असंख्य आठवणींना साक्षी आहेत. बाजीप्रभू देशपांडे यांच्या अजरामर ‘घोषखिंड’ युद्धकथांनी पन्हाळ्याच्या मातीला पावन केले आहे. अशा या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक दर्जाची ओळख मिळाल्याने, कोल्हापूरच्या इतिहासातील हे पान सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
पन्हाळा किल्ल्याच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याच्या घोषणेनंतर गडावर उत्सवाचे वातावरण होते. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकाच्या नृत्यात आणि घोषवाक्यांनी परिसर दुमदुमला. पन्हाळा गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवाजी काशिद यांच्या पुतळ्यांनाही अभिवादन करण्यात आले. किल्ल्यावर गावकरी, अधिकारी, कर्मचारी आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद ओसंडून वाहत होता.
या ऐतिहासिक टप्प्यामुळे पन्हाळा किल्ल्याची जबाबदारी अधिकच वाढली आहे. किल्ल्याचे जतन, संवर्धन, स्वच्छता आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन ही प्राथमिक गरज ठरणार आहे. पन्हाळ्याचे ऐतिहासिक वैभव, स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्ये, कलात्मक दृष्टिकोन आणि त्यामागील कथा जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
युनेस्कोच्या शिष्टमंडळाने पन्हाळा किल्ल्याची सखोल पाहणी केली होती. किल्ल्याच्या भौगोलिक रचनेपासून ते ऐतिहासिक महत्त्वापर्यंत, स्थापत्यकलेपासून ते संरक्षण व्यवस्थेपर्यंत विविध पैलूंचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. त्या अहवालाच्या आधारावरच पन्हाळ्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झाला.
पन्हाळा किल्ला केवळ महाराष्ट्राचाच नाही, तर आता जगाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशात एक अनमोल ठेवा म्हणून नावारूपाला आला आहे. हा दर्जा केवळ पन्हाळ्याचे नव्हे, तर संपूर्ण कोल्हापूरचे, महाराष्ट्राचे आणि मराठी अस्मितेचे जागतिक पातळीवर मोठे प्रतनिधित्व करत आहे.