🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

अल्पवयीन चालक, बेजबाबदार पालक आणि झोपलेल्या प्रशासनाने घेतला प्रज्ञाचा बळी

 

विशेष वृत्त टीम Newsskatta 

गुरुवारचा तो काळा दिवस… कोल्हापूरच्या कौलव गावात प्रज्ञा दशरथ कांबळे हिचा मृतदेह पोहचला, आणि साऱ्या गावाने नुसते हुंदकेच दिले. ही फक्त एक १८ वर्षांची निरागस विद्यार्थिनी होती. तिचं आयुष्य फक्त कॉलेज, अभ्यास, आणि स्वप्नांनी भरलेलं होतं. पण एका क्षणात त्या साऱ्या स्वप्नांवर अपघाताच्या दुर्दैवी गाडीने चिरडून टाकलं.


प्रज्ञा, भोगावती महाविद्यालयात बीएससीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. कॉलेज सुटलं, बसची वाट पाहत ती मित्रमैत्रिणींसोबत उभी होती. पण त्याच वेळी भरधाव वेगात येणाऱ्या मोटारीने – जी एका अल्पवयीन मुलाने चालवली होती पाच मुलींना चिरडलं. प्रज्ञाचा मृत्यू झाला, चार जणी गंभीर जखमी झाल्या. आणि याच्या जबाबदारीचं ओझं कोणावर?

हा अपघात नाही. हे निष्काळजीपणाचं दुसरं नाव आहे. कायद्यानुसार १८ वर्षांखालील व्यक्ती वाहन चालवू शकत नाही, आणि जर अशी व्यक्ती वाहन चालवत असेल आणि कोणाचं जीव घेत असेल, तर त्याच्यावर फक्त कारवाई नव्हे, तर गुन्हा दाखल व्हावा.

या घटनेत वाहनचालक अल्पवयीन आहे. म्हणजे त्याला गाडी कुणी दिली? त्याचे पालक कोण? त्या अल्पवयीन मुलाच्या चुकीमुळे एक चिमुकली जीव गेला, तिचे स्वप्न गेले, तिचे आईवडील पोरके झाले. हे अपघात म्हणायचं की बेशिस्त पालकत्वाचा फटका?


कुरुकली भागातील एसटी बसथांब्याजवळ सातत्याने असे अपघात घडत आहेत. २०१८ मध्ये याच ठिकाणी दोन विद्यार्थ्यांचे प्राण गेले. त्यानंतर प्रशासनाने काय केलं? कोणती उपाययोजना केली?


कोणत्याही एसटी स्थानकावर बस वेळेवर येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना रस्त्यावर थांबावं लागतं. एसटी सेवा महाविद्यालयापर्यंत चालू नसेल, तर विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय? त्याच रस्त्यावर भरधाव गाड्या, स्टंटबाजी करणारे तरुण, आणि वाहतुकीचं पूर्णपणे नियंत्रण हरवलेलं असतं.या सर्व गोंधळात एखाद्या प्रज्ञासारखं निष्पाप जीव गमवावा लागतो.


हा अल्पवयीन मुलगा मोटार चालवत होता, याचा थेट दोष त्याच्या पालकांवरच आहे. त्यांनी त्याला वाहन का दिलं? त्याच्या गाडीवर कुणाचा परवाना होता?

जर तुमच्या मुलाच्या हातात तुम्ही वाहन देत असाल, आणि त्याच्या हातून एखाद्याचा बळी जात असेल, तर तुम्हीही गुन्ह्यात सहभागी आहात. पालक म्हणून जबाबदारीची सीमा पार करत, समाजात धोका निर्माण करत असाल, तर कायद्याने तुमच्यावरही गुन्हा दाखल व्हायलाच हवा.


या देशात कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी शून्य आहे. अल्पवयीन मुलांकडून गाड्या चालवल्या जातात, अपघात होतात, लोक मरतात, आणि काही दिवसांनी सगळं विसरलं जातं. पोलिस फक्त “तपास सुरू आहे” असं सांगून मोकळे होतात. पण प्रज्ञा परत येणार नाही.


या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?

त्या मुलाला वाहन कुणी दिलं?

त्या गाडीवर इन्शुरन्स होतं का?

तो मुलगा अल्पवयीन असूनही त्याच्यावर कोणती कारवाई होणार?

त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल का होत नाही?

प्रशासनाने २०१८ च्या अपघातानंतर कोणते उपाय केले?

एसटी बस सेवा महाविद्यालयापर्यंत सुरू का नाही केली?

म्हणून मागणी हीच –

1. प्रज्ञाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन चालकाच्या पालकांवर गुन्हा दाखल करावा.

2. अशा घटनांत फक्त चौकशी नव्हे, तर कठोर शिक्षा करावी, जेणेकरून इतरांना धडा मिळेल.

3. भोगावती महाविद्यालय परिसरात कायमस्वरूपी एसटी बस सेवा सुरु करावी.

4. स्थानिक प्रशासनाने, पोलिसांनी आणि महाविद्यालयाने संयुक्तरीत्या वाहन नियंत्रण आणि वाहतूक नियोजन करावं.

5. महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही, वाहतूक सिग्नल आणि पोलीस गस्त अनिवार्य करावी.

प्रज्ञाच्या जाण्याने संपूर्ण कौलव गाव सुन्न झालं आहे. तिचे आईवडील – एक शाळेचे शिपाई आणि दुसरी ग्रामपंचायतीत सेवेत – आज आपल्या चिमुकलीच्या आठवणींना कवटाळून बसले आहेत. तिचं मनमिळाऊ स्वभाव, अभ्यासातील प्रगती, आणि मित्रमैत्रिणींशी असलेलं नातं आज गावातल्या प्रत्येकाला आठवत आहे.ही घटना अपघात नव्हे, तर एका व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचं प्रतिक आहे. आणि जोवर यावर ठोस पावले उचलली जाणार नाहीत, तोवर आणखी "प्रज्ञा" आपल्या भविष्याचं बलिदान देत राहतील.



أحدث أقدم