कोल्हापूर | प्रतिनिधी – कृषी, उद्योग, आरोग्य, कला, क्रीडा, पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञानासह सर्वच क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याची प्रगती होत आहे. या प्रगतीला अधिक गती देण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर महाराणी ताराबाई सभागृहात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अग्नीशमन विभागातील भगवंत शिंगाडे, देशांतर्गत सुरक्षा मोहिमेत अपंगत्व आलेले सेवारत सैनिक, तसेच राज्यस्तरावर प्रशासकीय सुधारणा मोहिमेत यश मिळवलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले.
आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन हा पन्नास वर्षांच्या लढ्याचा यशस्वी टप्पा असून, यामुळे सहा जिल्ह्यांना न्यायदानाची सोय उपलब्ध होणार आहे. जिल्हा प्रशासनाने 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमात आणि मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमानता अभियानात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज आता ई-ऑफिस प्रणालीवर होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक प्रयोगशाळा, महिला रुग्णालय आणि कॅन्सर हॉस्पिटल उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आरोग्य पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर ‘मेडिकल टुरिझम हब’ बनवण्याचे उद्दिष्ट आहे. अवयवदान चळवळीत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पन्हाळा किल्ल्याचा युनेस्को जागतिक वारसा स्थळात समावेश, तसेच इतर ऐतिहासिक किल्ले आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला जात आहे. श्रीअंबाबाई मंदिर, जोतिबा, नृसिंहवाडी आणि बाळुमामा मंदिरांसह तीर्थक्षेत्रांचा विकास सुरू आहे. कोल्हापूर चित्रनगरीच्या माध्यमातून ‘कलानगरी’ची ओळख अधिक ठसवण्यावर भर दिला जात आहे.
शिक्षण क्षेत्रात परख राष्ट्रीय सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळवणे, समृद्ध शाळा अभियानाची यशस्वी अंमलबजावणी ही जिल्ह्याची वैशिष्ट्ये ठरली आहेत. सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधला जात आहे.
महाआवास अभियानांतर्गत 2026 पर्यंत 50 हजार घरकुलांचे लोकार्पण, लक्ष्मी मुक्ती योजनेतून महिलांच्या मालकीहक्काची नोंद, आणि महिला बचतगटांना रोजगार उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट ठेवले आहे. कृषी क्षेत्रात ऊस उत्पादन वाढ, तसेच कोल्हापुरी चप्पल युनिटसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
आयटी पार्कची निर्मिती, एमआयडीसीतील उद्योगांना चालना आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करणे, क्रीडा संकुलाचा विकास यासाठीही शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी मानले, तर सूत्रसंचालन गिरीश सोनार यांनी केले.