🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

इंटर्नशिप – स्वप्नपूर्तीची खरी सुरुवात"

आज शिक्षणाची व्याख्या केवळ पुस्तकं, नोट्स आणि परीक्षांपुरती उरलेली दिसते. कॉलेजच्या चौकटीत आपण कितीही अभ्यास केला, कितीही मार्क मिळवले, तरी प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी ठरणाऱ्या गोष्टी काहीशा वेगळ्याच असतात. कारण कॉलेजमध्ये आपण "शिकतो", पण फिल्डवर उतरल्यावर "घडतो"! आणि हे "घडणं" सुरू होतं, इंटर्नशिपपासून.


इंटर्नशिप म्हणजे नुसते काम नव्हे, तर ती एक संधी असते – स्वतःला ओळखण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची आणि आयुष्यातील पहिलं पाऊल आत्मविश्वासाने टाकण्याची.कॉलेजचे वर्ग, शिकवणी, सिलेबस, प्रेझेंटेशन आणि असाइनमेंट यामध्ये आपण थकतो, पण फिल्डवर जेव्हा पहिल्यांदा "टास्क" दिलं जातं, तेव्हा लक्षात येतं – ही संधी काही वेगळीच आहे. कारण इथे मार्क्स मिळत नाहीत – इथे अनुभव मिळतो, चुका करायला मुभा असते, पण त्या चुका शिकवण्या देतात.


मी स्वतः जेव्हा पहिल्यांदा इंटर्नशिप सुरू केली, तेव्हा ऑफिसमध्ये पाय ठेवताना हात थरथरत होते. "आपण हे करू शकू का?", "लोक आपल्याला गंभीरपणे घेतील का?", "आपण काही चुकलं तर?" – असे अनेक प्रश्न मनात चालू होते. पण पहिला टास्क मिळाल्यावर, आणि तो वेळेत पूर्ण केल्यावर जे समाधान वाटलं, ते कुठल्याही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या आनंदापेक्षा वेगळं आणि खास होतं.


इंटर्नशिपच्या काळात तुम्ही एका टीमचा भाग होता. इथे 'स्पर्धा' नसते, इथे 'सहकार्य' असतं. काम करताना जेव्हा एखादा सिनियर तुम्हाला थोडं थांबून मार्गदर्शन करतो, तेव्हा समजतं की अनुभव हा शिक्षकापेक्षाही मोठा गुरू आहे. ऑफिसमध्ये दररोज येणं, एक ठरावीक वेळ पाळणं, टास्क डेडलाइनमध्ये पूर्ण करणं, कामाचं वेळेवर रिपोर्टिंग करणं – हे सगळं ऐकायला साधं वाटतं, पण प्रत्यक्षात त्यामधून शिस्त, संयम आणि जबाबदारी शिकवली जाते.


खास करून संवादकौशल्य (communication skills) हे या काळात जबरदस्त वाढतं. आपल्याला नेहमी वाटतं की "आपण बोलतोच तर रोज", पण जेव्हा एखाद्या सीनिअरला, मॅनेजरला किंवा क्लायंटला आपलं म्हणणं समजावून सांगावं लागतं – तेव्हा खरी कम्युनिकेशन टेस्ट होते. आणि हाच आत्मविश्वास तुम्हाला नंतरच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी ठरतो.


इंटर्नशिप ही म्हणजे केवळ शिकवण्याची जागा नसते – ती एक जिवंत प्रयोगशाळा असते. इथे प्रत्येक टास्क, प्रत्येक कॉल, प्रत्येक फाईल तुमचं भविष्य घडवते. एखाद्या टीपण्णीत केलेली चूक, एखाद्या रिपोर्टमधील निरीक्षण, वेळेवर पूर्ण केलेला प्रोजेक्ट – यांचा ठसा तुमच्या कामगिरीवर कायम राहतो.


या प्रवासात अनेकदा अडचणीही येतात. कधी काम कळत नाही, कधी वेळ अपुरा पडतो, तर कधी आत्मविश्वास ढासळतो. पण हीच वेळ असते – स्वतःला पुढे नेण्याची. कारण इंटर्नशिप तुम्हाला तुमच्या मर्यादा दाखवते, आणि त्याचबरोबर त्या ओलांडायचं बळही देते.


कॉलेजमध्ये आपण असाइनमेंट फक्त मार्क्ससाठी लिहतो. पण इंटर्नशिपमध्ये जेव्हा टास्क दिलं जातं, तेव्हा त्यामागे जबाबदारी असते. ती पूर्ण करताना आपण केवळ काम पूर्ण करत नाही – आपण स्वतःचं मूल्य सिद्ध करत असतो. आणि यामुळेच इंटर्नशिपमध्ये मिळालेला प्रत्येक अनुभव पुढे खूप मोठं स्थान निर्माण करतो.


या संधीमधून केवळ प्रोफेशनल कौशल्यच नव्हे, तर आत्मविश्वास, संयम, टीमवर्क, आणि समाजाशी संवाद यासारख्या जीवनगुणांचाही विकास होतो. तुम्ही केवळ ‘कंपनीत काम केले’ हे सांगण्याइतपतच मर्यादित राहत नाही, तर तुम्ही 'कंपनीमध्ये शिकलो, वाढलो आणि घडलो' असं ठामपणे सांगू शकता.


इंटर्नशिपमुळे तुमचं स्वप्न अधिक स्पष्ट होतं. तुम्ही नक्की कुठल्या क्षेत्रात काम करायचं आहे, तुमची आवड आणि क्षमता काय आहे, हे तुम्ही स्वतः अनुभवातून समजून घेता. आणि एकदा का दिशा स्पष्ट झाली, की पायवाट तयार करणं सहज शक्य होतं.


एक इंटर्नशिप म्हणजे केवळ एक रजिस्टरवरची एंट्री नव्हे – ती तुमच्या करिअरच्या पहिल्या पायरीचा पाया असतो. त्यामुळे ती अनुभवताना प्रत्येक क्षण शिका, विचार करा, आणि स्वतःमध्ये बदल घडवा.

कारण…

"इंटर्नशिप म्हणजे नुसते काम नाही,

तर संधी असते – घडण्याची, वाढण्याची आणि उंच भरारी घेण्याची!"

विशेष लेख - कोमल वखरे

أحدث أقدم