कोल्हापूर | प्रतिनिधी - ११ ऑगस्ट हा दिवस सांगली आणि कोल्हापूरसाठी कायम स्मरणात राहील पण आनंदाने नव्हे, तर एका हृदयद्रावक घटनेमुळे. २१ वर्षीय गायत्री रेळेकर, सांगली जिल्ह्यातील हुशार, जबाबदार आणि सदैव हसतमुख विद्यार्थिनी, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महिला वसतिगृहात मृतावस्थेत सापडली. ही बातमी दुपारी पसरताच परिसरात शोककळा पसरली, आणि तिच्या ओळखीच्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घोळू लागला "गायत्री आत्महत्या करेलच कशी?"
गायत्रीचा स्वभाव खंबीर आणि उत्साही होता. नुकतंच ती रक्षाबंधन आणि कुटुंबातील वाढदिवसाच्या साजऱ्यात सहभागी होऊन, हसतमुखपणे, भविष्यातील योजना बोलून गेली होती. घरातील पाळीव कुत्रीला पिल्ले होणार असल्याची काळजी घेणे, गणेशोत्सवाच्या तयारीत आनंदाने सहभागी होणे या सगळ्या गोष्टींनी तिच्या मानसिक स्थितीबद्दल कोणताही नकारात्मक संकेत दिला नव्हता.
पण ११ ऑगस्टला,सकाळी ९ वाजता ती घरीून हॉस्टेलकडे रवाना झाली.साडेअकराला वडिलांना फोन करून सुखरूप पोहोचल्याची माहिती दिली.दुपारी सव्वा एक वाजता एका मैत्रिणीच्या आईशी निवांत, आनंदी संवाद झाला.दुपारी ३ वाजता धक्कादायक बातमी: गायत्रीने गळफास घेतला आहे.हा दीड तास कुटुंबाच्या प्रश्नांचा गाभा बनला आहे. गायत्रीचे वडील ठाम आहेत की, "ती आत्महत्या करणारच नाही. पंचनामा आमच्या समोर झाला नाही. हॉस्टेलचे सीसीटीव्ही, पोस्टमार्टम रिपोर्ट, कॉल रेकॉर्डिंग आम्हाला दाखवावे."
आईचा प्रश्न हृदय पिळवटून टाकणारा आहे: "तिच्यावर कोणाचा दबाव आला का? हॉस्टेलमध्ये काही प्रॉब्लेम होता का? पोलिसांनी खरे कारण सांगावे."
पोलिस तपासात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मृत्यूपूर्वी गायत्रीने एका तरुणाशी फोनवर संवाद साधला होता, आणि तो संवाद तिला भावनिक धक्का देणारा असू शकतो. वसतिगृहातील एका विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, त्या वेळी गायत्री रडत होती. मात्र या कॉलचा आशय अजूनही सार्वजनिक झालेला नाही.
फॉरेन्सिक पातळीवरही काही प्रश्न उपस्थित आहेत पंख्याची ताकद, गळफासाचे स्वरूप, घटनास्थळी असलेले पुरावे. कुटुंबाची मागणी आहे की सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, पोस्टमार्टम रिपोर्ट पारदर्शकतेने द्यावे आणि चौकशी निष्पक्ष व्हावी.
गायत्रीच्या निधनामुळे निर्माण झालेला शोक आणि संताप अगदी नैसर्गिक आहे. तिच्या कुटुंबाला उत्तर हवे आहे, आणि ते मिळायलाच पाहिजे. पण या न्यायाच्या शोधात सत्याचा आधार सोडून दिला, तर चुकीची माहिती आणि अफवा सहज पसरतात. त्याचा फटका केवळ दोषी व्यक्तींनाच नाही, तर निर्दोष संस्थांनाही बसतो.
शिवाजी विद्यापीठ ही अनेक दशकांची शैक्षणिक परंपरा असलेली संस्था आहे. एखाद्या घटनेचा तपास पूर्ण होण्याआधीच थेट आरोप झाल्यास, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पालकांच्या विश्वासावर, भावी विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर आणि विद्यापीठाच्या एकूण प्रतिमेवर होऊ शकतो.
विद्यापीठ प्रशासनाने या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी पोलिस तपासात पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे, तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि वसतिगृह सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत.विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार "आमच्यासाठी प्रत्येक विद्यार्थी कुटुंबाचा भाग आहे. ही घटना आम्हालाही हादरवणारी आहे. सत्य बाहेर यावे, आणि खरच कोणाचा दोष असेल त्या दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही सज्ज आहोत."
गायत्री रेळेकर प्रकरण हे केवळ एका मुलीचा मृत्यू नाही तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेचा, प्रत्येक पालकाच्या विश्वासाचा आणि प्रत्येक संस्थेच्या जबाबदारीचा प्रश्न आहे.
‘तो दीड तास काय घडले’ याचे उत्तर मिळालेच पाहिजे, पण या प्रवासात सत्य, संवेदनशीलता आणि संतुलन या तिन्ही गोष्टींना तडा जाऊ देता कामा नये. विद्यार्थी हित आणि न्याय हे केंद्रबिंदू असावेत, चुकीची माहिती किंवा नाहक बदनामी नव्हे.