पुष्पा पाटील/कोल्हापूर, दि. 19 :जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अनेक प्रमुख मार्गांवर पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे, तर काही ठिकाणी दरड कोसळल्याने मार्ग बंद करण्यात आले आहेत.
कोल्हापूरची जीवनदायिनी मानली जाणारी पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात पाचव्यांदा पात्राबाहेर पडली आहे. सध्या राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 35 फुटांच्या वर पोहोचली असून, शहरातील पूरप्रवण भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, राधानगरी धरणाचे सातही दरवाजे अद्याप उघडे असून, त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यासोबतच कोयना, दूधगंगा आणि धामणी धरणांतून देखील नदी पात्रात पाणी सोडले जात असल्याने नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील काही तास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.