दोन-तीन दिवसांपूर्वी मी मासिक पाळीवर एक साधी, नॉर्मल पोस्ट लिहिली होती.विषय इतका नैसर्गिक, आपल्या शरीराचा, आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग… तरी त्यावर इतक्या घाणेरड्या, विखारी कॉमेंट्स आल्या की सांगता सोय नाही. फक्त माझ्यावर न बोलता माझ्या आईवडिलांवर एका पुरुषाने केलेली घाण कॉमेंट मित्रांनी उत्तर देऊन थांबवली.
नंतर फेक प्रोफाइल, लॉक अकाउंटवरून येऊन अजूनही हास्यास्पद, टोचणाऱ्या प्रतिक्रिया…आणि धक्का बसला कारण त्यात काही स्त्रियाही होत्या.या सगळ्या कॉमेंट मी डिलीट केल्या... वरून काहींचा दावा की,मी लाईक ,कॉमेंट्स साठी पोस्ट लिहिली आहे...अहो, लाईक्ससाठी मी हपापलेली नाही…पण हो, बदलासाठी नक्की लिहिते मी...
पण मनात एक प्रश्न कायमचा बसला , 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना आपण मोठमोठी भाषणे देतो... स्वातंत्र्य, समानता, आदर वगैरे. पण अजूनही ‘पाळी’ हा शब्द बोलला तरी लोकांचे खरे चेहेरे समोर येत आहेत आणि त्यांच्या तोंडून...चेष्टा आणि घाणेरडे जोक्स बाहेर पडत आहेत.
मासिक पाळीवर लिहिण्याचं माझं स्वातंत्र्य लोकांना का खुपतंय?
माझ्या शरीरावर मी लिहितेय… हे लोकांना समजत का नाही?
एक साधा प्रश्न, जर मासिक पाळीच नसती, तर तुम्ही-मी, हे सगळे जन्माला तरी आलो असतो का? स्वातंत्र्य म्हणजे फक्त देश परकीय सत्तेतून मोकळा होणे नाही. खरे स्वातंत्र्य म्हणजे विचारांनी, मनाने, समाजाने मोकळे होणे. पाळीवर बोलायला घाबरणारा, त्यावर घाणेरडी कॉमेंट करणारा समाज स्वतंत्र आहे असं तुम्हाला खरंच वाटतं का?
#अभिव्यक्ती_स्वातंत्र्य
योगेश्वरी भोसले