🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रवास – साडेएकशे वर्षांचा बदलता चेहरा

Team Newsskatta कोल्हापूर - कोल्हापूर म्हटलं की राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य, तांबडा-पांढरा रस्सा, खासबागेतील मल्लांचा उत्साह, रंकाळा तलावाची देखणी किनार आणि शहराची संस्कृती – ही सगळीच प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. पण या शहराच्या नागरी व्यवस्थापनाची कहाणीही तितकीच रोचक आहे. गेल्या दीडशे वर्षांत नगरपालिकेपासून महानगरपालिकेपर्यंतचा प्रवास, बदलत्या काळानुसार शहराच्या विकासाचा आराखडा ठरवत आला आहे.


नगरपालिकेची पहिली पायरी (1854 – 1940)

ब्रिटिशांच्या कारकिर्दीत 12 ऑक्टोबर 1854 रोजी कोल्हापूरला पहिली औपचारिक नगरपालिका स्थापन झाली. त्यावेळी शहराची लोकसंख्या अवघी 40 हजारांच्या आसपास होती आणि वार्षिक खर्च फक्त 300 रुपये इतका होता. या स्थापनेनंतर पहिल्यांदाच नियोजित नागरी आराखड्याची सुरुवात झाली. रस्ते, पाणीपुरवठा, बाजारपेठांची मांडणी – हे सारे टप्प्याटप्प्याने आकार घेत गेले.


स्थानिक स्वराज्य आणि जनतेचा सहभाग (1941 – 1944)

1941 च्या त्रैवार्षिक निवडणुकीत ‘स्थानिक स्वराज्य संघ’ स्थापन झाला. भाई माधवराव बागल, शेठ गोविंदराव कोरगांवकर आणि भारतरत्न रत्नाप्पा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली भेदभावविरहित जनसेवा करण्याचा संकल्प करण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध न ठेवता, केवळ नागरी सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आला. या काळात नगर रचनेत आणि नागरी जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडून आले.


गतिमान विस्ताराचा काळ (1944 – 1971)

स्वातंत्र्योत्तर काळात कोल्हापूरची ओळख ‘औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र’ अशी निर्माण झाली. 1956-57 मध्ये नगरपालिकेचे वार्षिक उत्पन्न सुमारे 33 लाख रुपये इतके होते. याच काळात रस्त्यांचे जाळे, नवीन पूल, पाणीपुरवठ्याची सुधारणा, उद्याने आणि बाजारपेठांचे आधुनिकीकरण अशा योजना राबवल्या गेल्या.

उद्योगक्षेत्रात वाय.पी. पवार, महादबा मिस्त्री, तात्या शिंदे, रामभाई सामाणी अशा उद्योजकांनी यांत्रिकीकरणाचा पाया रचला. कोल्हापूर उद्योग वसाहतीतील उत्पादने आशिया आणि आफ्रिकेतील देशांपर्यंत पोहोचू लागली. 1962 मध्ये राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली, ज्यामुळे शहर शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले.


महानगरपालिकेचा जन्म (1972)

15 नोव्हेंबर 1972 रोजी नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले. वाढती लोकसंख्या, नागरी समस्यांची गुंतागुंत आणि विकासाचा वाढता वेग लक्षात घेता ही रूपांतरण प्रक्रिया अपरिहार्य होती. 1972 ते 1978 या काळात प्रशासकांच्या मार्फत कामकाज सुरू राहिले. विकास आराखड्यात विस्थापितांचे पुनर्वसन, उपनगरांची नियोजनबद्ध उभारणी आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा यावर भर देण्यात आला.


लोकनियुक्त प्रतिनिधींचा कालखंड (1978 – आजतागायत

ऑगस्ट 1978 मध्ये पहिली लोकनियुक्त महानगरपालिका अस्तित्वात आली. बाबासाहेब कसबेकर, नानासाहेब यादव, द. न. कणेरकर, बाबुराव पारखे, प्रा. सुभाष राणे आदी महापौरांनी विविध योजना राबवल्या. नानासाहेब यादव यांच्या काळात मोफत प्रेतदहनाची योजना सुरु झाली, तर कणेरकर यांच्या कार्यकाळात रणरागिणी ताराराणीचा पुतळा आणि आधुनिक रस्त्यांची पायाभरणी झाली.

गेल्या 50 वर्षांत कोल्हापूरची महानगरपालिका हद्दवाढ न झालेलं राज्यातील एकमेव मोठं शहर आहे. क्षेत्रफळ 66.82 चौ.किमी असून लोकसंख्या नऊ पटीनं वाढली आहे. हद्दवाढ हा मुद्दा आगामी निवडणुकीत मध्यवर्ती राहण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर, कोरोनाच्या परिस्थितीमुळे महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आले. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच निवडणुका होणार आहेत.

दीडशे वर्षांहून अधिक काळात कोल्हापूर महानगरपालिकेने सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात शहराच्या विकासाला दिशा दिली आहे. ब्रिटिश काळातील लहानशी नगरपालिका आज आधुनिक सुविधा असलेली, ऐतिहासिक वारसा जपणारी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाणारी महानगरपालिका बनली आहे.

थोडे नवीन जरा जुने