विशेष लेखक: प्रशांत कदम (सिनियर पत्रकार)
“हत्ती” – या दोन अक्षरांच्या शब्दामागे एक इतिहास, एक संस्कृती, एक करुणा आणि एक संघर्ष दडलेला आहे. आणि जेव्हा देशातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत उद्योगसमूहाकडून “वन्यजीव संवर्धन” या नावाने एक भव्य प्रकल्प उभा केला जातो – तेव्हा त्या जंगलात केवळ हत्तीच नव्हे, तर अनेक प्रश्नही फिरू लागतात. आज ‘वनतारा’ या कथित “हत्ती उपचार केंद्रा”भोवती उभ्या राहिलेल्या अनुत्तरित प्रश्नांची जंगलसदृश गर्दी आपण समजून घ्यायला हवी आहे.
वनतारा – हे देशात एकमेव हत्ती उपचार केंद्र आहे का?
नक्कीच नाही. देशभरात अनेक ठिकाणी हत्तींची काळजी घेण्यासाठी वनखात्याच्या अखत्यारीत कार्यरत असलेली सेमी-वाइल्ड सॅनक्च्युरीज आहेत – केरळ, कर्नाटका, आसाम, ओडिशा, तामिळनाडू यांसारख्या राज्यांमध्ये. हत्ती हे जंगलात जन्मलेले, जंगलात वाढलेले आणि जंगलातच बरे होणारे प्राणी आहेत. उपचारासाठी उभारले जाणारे “हत्ती उपचार केंद्र” जर २७०० एकरांचं, भिंतीने बंदिस्त, आणि सीसीटीव्हीखालील क्लोज मॉनिटरिंग असणार असेल, तर हा उपचार आहे की मनोरंजनाचा प्रकल्प?
गुजरातचा हवामान हत्तींसाठी योग्य आहे?
अंबानी कुटुंबाच्या श्रीमंतीला देशात कुणीही नकार देणार नाही, पण हत्तींसाठी खरी संपत्ती म्हणजे – सावली, नद्या, चिखलट तलाव, उष्ण आर्द्र हवामान, भरपूर आहार आणि मोकळा वावर. हे सर्व कोल्हापूर, आसाम किंवा केरळसारख्या ठिकाणी मिळू शकते – गुजरातमध्ये नाही. तापमान ४५ अंशांवर पोहोचणारं, पाण्याची टंचाई आणि नैसर्गिक वने जवळ नसलेलं हवामान हत्तींसाठी योग्य मानणं म्हणजे केवळ आत्ममोहित विज्ञान!
जर अंबानींच्या मुलाला प्राण्यांचं प्रेम आहे, तर प्रकल्पाला विरोध का?
खरं तर कुणालाही वन्यजीवांवर प्रेम असणं चुकीचं नाही. पण त्या प्रेमामागे जर कार्पोरेट हितसंबंध, पर्यटन विकास, CSR ब्रँडिंग किंवा इमेज बिल्डिंगचा अजेंडा असेल, तर प्रश्न निर्माण होतात. “हत्तींची काळजी” ही भावना असेल तर त्यासाठी वनखात्याच्या सोबत काम करणं, सेमी-वाइल्ड सेंटरमध्ये योगदान देणं, आणि राज्य सरकारसोबत पारदर्शक करार करणं हे अधिक नैतिक असतं.
वनतारामधील प्राणीसंख्या ६८ वरून ४००० पर्यंत कशी पोहोचली?
ही आकडेवारीच पुरेशी संशय निर्माण करणारी आहे. २०२०-२१ मध्ये वनतारात ६८ प्राणी होते, तर २०२५ पर्यंत ती संख्या ४००० वर गेली. हत्ती, सिंह, बिबटे, पक्षी, रांगणारे प्राणी – ही वाढ नैसर्गिक आहे की योजनाबद्ध “कलेक्शन”? शेअर बाजारात कृत्रिमरित्या शेअर्स वाढवले जातात, तशीच कृत्रिम वस्ती वनतारामध्ये वाढवली जात आहे का? वन्यजीवांची जिवंत प्रदर्शनं हे नैतिक आहे का?
हत्ती जर जखमी असेल, तर तो वनखात्याच्या व्यवस्थापनात देता येत नाही का?
याला उत्तर म्हणजे ‘Elephant Whisperers’ नावाची ऑस्कर विजेती डॉक्युमेंटरी. तमिळनाडूतील एका साध्या जोडप्याने जखमी पिल्लू आपल्याच घरात सांभाळलं – वनखात्याच्या सेमी-वाइल्ड प्रकल्पाअंतर्गत. तिथे हत्ती स्वतः शिकतो, समाजात मिसळतो, आणि माणसाशी एक हळवी नाळ जोडतो. पण वनतारामध्ये हत्तीवर उपचार चालू असताना, मोकळेपणा, नैसर्गिक वावर, आणि सामाजिक सहवास यांची कमतरता जाणवते. हत्तीचा 'प्रोजेक्ट' होतो, प्राणी नाही.
आसाम, त्रिपुरा, बंगालहून हत्ती गुजरातला का?
ज्याठिकाणी हत्ती नैसर्गिकरित्या आढळतात, तिथून हजारो किलोमीटर दूर गुजरातला हत्ती का हलवले जात आहेत? तेही ‘धोका असल्यामुळे’ या कारणावर? हे “धोका” कोण ठरवतो? स्थानिक सामाजिक संस्था, वनाधिकारी, की एखाद्या खासगी कंपनीचा व्हेटनरी रिपोर्ट? प्राण्यांचं स्थलांतर हा कायद्यानं नियंत्रित मुद्दा आहे – मग हे सर्व एका कंपनीच्या प्रकल्पासाठीच कसं काय शक्य होतं?
वन्यजीव कायद्यात हे सगळं कसं काय बदललं?
वनताराची स्थापना होते आणि त्याच दरम्यान केंद्र सरकारकडून भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियमात बदल केला जातो – ज्यामध्ये हत्तींसह अनेक प्राण्यांच्या हस्तांतरणासाठी सवलती मिळतात. कायदे बदलले जातात, ग्रीन सिग्नल मिळतो आणि हजारो एकर जंगलात ‘निजी प्राणी केंद्र’ तयार होतं – हे सगळं योगायोग आहे का?
हत्तीच्या प्रश्नात धर्म, पक्ष आणि व्होटबँका येतात तरी कशा?
जेव्हा नांदणीच्या महादेवी हत्तीवरून कोल्हापुरात जनआंदोलन होतं, तेव्हा एक वर्ग याला जैन मठ, पारंपरिक भाजप मतदार, वा दक्षिणपंथ्यांचा अजेंडा म्हणतो. हत्तीवर बोलणाऱ्यांना "मनुष्यविरोधी" शिक्के दिले जातात. पण जेव्हा प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो, तेव्हा तो केवळ पशूधर्म नाही, तो संपूर्ण पर्यावरणाचा धर्म असतो. राजकीय चष्म्यातून पाहणाऱ्यांना विचारावंसं वाटतं – “त्या हत्तीला काय वाटत असेल?”
शेवटचा एक विचार:
प्रश्न असे आहेत की, वनतारा खरंच एक संवेदनशील प्रकल्प आहे का, की तो एक पर्यावरणीय प्रयोगशाळा आहे – जिथे कॉर्पोरेट वर्चस्व, कायदेशीर लवचिकता आणि जनतेचा आवाज यांचं मिश्रण उभं केलं जातंय?
हत्ती जरी मौनात असला, तरी जंगल ओरडतंय… फक्त ऐकायला हवं!