नवी दिल्ली – माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी अचानक दिलेल्या राजीनाम्यानंतर ते नेमके कुठे आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिलेल्या या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. त्यानंतर तीन आठवडे उलटूनही त्यांच्या तब्येतीविषयी किंवा ठिकाणाबद्दल मौन पाळले गेले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट प्रश्न विचारत, धनखड यांच्या प्रकृतीची आणि संपर्काची माहिती द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी शहांना पत्र पाठवून असेच प्रश्न उपस्थित केले.
राऊत यांनी पत्रात नमूद केले की, २१ जुलै रोजी धनखड नेहमीसारखे दिसत होते; मात्र संध्याकाळी त्यांनी आरोग्य कारणांचा हवाला देत राजीनामा दिला. “ते सध्या कुठे आहेत? सुरक्षित आहेत का? त्यांची तब्येत कशी आहे?” हे प्रश्न देशाला पडले असून, अफवांना पूर्णविराम मिळावा, यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, असे राऊत यांनी लिहिले. त्यांनी इशारा दिला की, आवश्यक ती माहिती न मिळाल्यास ते सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील.
या घडामोडींनंतर राजकीय वर्तुळाचे आणि जनतेचे लक्ष अमित शहा यांच्याकडे लागले आहे. सरकारकडून स्पष्टीकरण येते की राऊत न्यायालयात जातात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.