मुंबई –महाराष्ट्राच्या महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर अलीकडच्या काळात विविध प्रकारचे आरोप झाले असून, त्यात मंत्री योगेश कदम, माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय, काही मंत्री वादग्रस्त विधानांमुळेही वारंवार चर्चेत राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर ११ ऑगस्ट रोजी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तर्फे राज्यभर ‘जनआक्रोश आंदोलन’ करण्यात आले. आंदोलनाच्या विविध ठिकाणी काहींनी लुंगी-बनियान घालून उपस्थिती दर्शवली, कुणी पत्त्यांचा खेळ मांडला, तर काहींनी नृत्याचा कार्यक्रम सादर करून विरोध व्यक्त केला.
या आंदोलनावर भाष्य करताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार शब्दांत टीका केली. “मीच खरी आवृत्ती आहे, माझी नक्कल उद्धव ठाकरेच्या बापाला सुद्धा करू जमणार नाही ,” अशा आशयाचे विधान त्यांनी केले. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
गायकवाड यांनी पुढे म्हटले की, “विरोधकांनी लोकांच्या खऱ्या समस्यांवर बोललं पाहिजे. त्याऐवजी ते निरर्थक मुद्द्यांवर आंदोलन करतात. राज्यात केवळ १६ जागा मिळाल्यानंतर जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. जे पूर्वी मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते, ते आता रस्त्यावर आले आहेत. आता तरी त्यांनी वास्तव समजून घेतलं पाहिजे.”
महायुतीतील आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “भाजपाला पक्षविस्ताराचा अधिकार आहे आणि मी माझ्या पक्षासाठी काम करतोय. प्रत्येक पक्षाला स्वतःचं काम करण्याचा अधिकार आहे.”