कोल्हापूर/प्रतिनिधी - कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील व्हिनस कॉर्नर परिसरात एका सोन्याच्या व्यवसायिकाने थेट गटारीवर स्लॅब टाकून ती जागा खाजगी वापरासाठी हस्तगत केल्याचे समोर आले आहे. सदर जागा सध्या दुकानासमोर पार्किंग व जाहिरात बोर्डासाठी वापरली जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक व वाहतुकीसाठी या मार्गाचा वापर करणारे नागरिक संतप्त झाले असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची निष्क्रियता यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.सदर सोनाराने आपल्या दुकानासमोर असलेल्या महापालिकेच्या गटारीवर स्लॅब टाकले आहे. सामान्य नागरिक जिथे पावसाळ्यात गटारी तुंबल्यामुळे त्रास सहन करत आहेत, तिथे या गटारीवर थेट सिमेंटचा स्लॅब टाकून वाहनांसाठी पार्किंग जागा तयार करण्यात आली आहे. याशिवाय, गटारीच्या झाकणावर मोठा जाहिरात फलक देखील लावण्यात आला आहे.गटारी, फुटपाथ, आणि रस्ता हे सर्व सार्वजनिक जागेचे भाग असून त्यांचा कोणत्याही प्रकारे खाजगी उपयोग करणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (MRTP Act) तसेच महाराष्ट्र सार्वजनिक रस्ते आणि पायवाट संरक्षण अधिनियमानुसार अशा अतिक्रमणांवर दंडनीय कारवाईचा उल्लेख आहे.
परिसरातील स्थानिक नागरिकांनी या अतिक्रमणाचा तीव्र निषेध केला आहे. "हा रस्ता आधीच अरुंद आहे, त्यात गटारीवर स्लॅब टाकून पार्किंग केल्याने चालणाऱ्यांना जागाच राहिलेली नाही. पावसाळ्यात पाणी साचते आणि दुर्गंधी पसरते. कोणीतरी यांच्यावर कारवाई का करत नाही?"या प्रकरणात महापालिका, स्थानिक नगरसेवक, अतिक्रमण विभाग आणि वाहतूक विभाग यांच्याकडून ठोस कारवाई होणे अत्यावश्यक आहे. एक सामान्य नागरिक फुटपाथवर टपरी ठेवली तर महापालिका तत्काळ नोटीस पाठवते. पण मोठ्या व्यापाऱ्यांवर मात्र नियम का वेगळे?
जर व्हिनस कॉर्नरमधील सोनाराला सार्वजनिक गटारीवर स्लॅब टाकण्याची परवानगी महापालिकेने देऊ केली असेल, तर ही गोष्ट प्रशासकीय अन्याय व भेदभाव दर्शवणारी आहे.
शहरातील असंख्य लहान दुकानदार, रस्त्यावरील फेरीवाले, हातगाडीवाले, फुटपाथवर व्यवसाय करणारे सामान्य नागरिक यांना वारंवार नोटीसा, दंड, किंवा अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई सहन करावी लागते. अशा परिस्थितीत काही व्यावसायिकांना कायद्याच्या बाहेर ठेवलं जात असेल, तर हा खुला पक्षपातीपणा आहे.जर महापालिकेने अशा प्रकारचं बांधकाम अधिकृत मान्य केलं असेल, तर मग हेच नियम सर्व व्यापाऱ्यांना लागू करावेत.प्रत्येक दुकानासमोर स्लॅब टाकून गटारी झाकण्याची मुभा द्यावी प्रत्येकजण आपल्या जाहिरात फलकासाठी सार्वजनिक जागा वापरू शकावा सार्वजनिक मालमत्ता 'खाजगी' ठरवून पार्किंग सुलभ करू शकावा. अन्यथा, त्वरित कठोर कारवाई झाली पाहिजे.
नोंद: वरील बातमी ही नागरिकांच्या तक्रारी, प्रत्यक्ष पाहणी, आणि स्थानिक लोकांच्या प्रतिक्रियांवर आधारित आहे. या बातमीत नमूद केलेली माहिती सर्व संबंधित पुराव्यांच्या आधारे सत्य असून कोणत्याही व्यक्तीचा व्यक्तिगत अपमान करण्याचा उद्देश नाही. जर संबंधित व्यक्ती/संस्था यावर अधिक माहिती किंवा प्रतिक्रिया देऊ इच्छित असेल, तर आम्ही त्यांचे म्हणणे बातमीत जोडण्यास तयार आहोत.