🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

विद्यार्थ्याचा जीव की मार्केटिंगचा अहंकार? खाजगी शिक्षणसंस्थांचा असंवेदनशील चेहरा....



कोल्हापूर: ही एक हताश विद्यार्थी आत्मा जगाला सोडून गेला तेव्हा मागे ठेवून गेला होती. इचलकरंजीमध्ये एका डिप्लोमा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या निरागस मुलाने आत्महत्या केली आणि त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ उघड झाला. त्या व्हिडिओत तो शिक्षणसंस्थेतील ताण, अपमान, अवहेलना यामुळे जीव दिल्याचं सांगत होता.आणि त्या दिवशी केवळ एक विद्यार्थी नाही हरवला... एक स्वप्न हरवलं, एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि पुन्हा एकदा शिक्षणाच्या नावावर चालणाऱ्या धंद्याचा काळा चेहरा उघड झाला.शिक्षण म्हणजे व्यक्तीमत्त्व घडवणं, जीवनाचं मार्गदर्शन करणं, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेप्रमाणे संधी देणं. पण गेल्या दशकभरात शिक्षण 'व्यवसाय' झाला आहे. हजारो-लाखो रुपये फी आकारणारे हे खाजगी क्लासेस आणि कॉलेजेस – जे फक्त निकाल, प्रतिष्ठा आणि मार्केटिंग यासाठी जगतात – तिथे माणुसकी, समजूत, आणि विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ्य हरवलंय.इचलकरंजीमधील श्रद्धा फाउंडेशनमध्ये घडलेली घटना त्याचं जिवंत उदाहरण आहे. एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या मित्रांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. अॅकॅडमीच्या ऑफिसची तोडफोड झाली. कायदा हातात घेतल्याचं कोण म्हणेल, पण त्यामागचा आक्रोश समजून घेतला पाहिजे.खाजगी क्लासेसची 'इमेज' म्हणजे त्यांचा ब्रँड. ती जपण्यासाठी ते काहीही करतात.एखादा विद्यार्थी जर मार्क्स कमी मिळवतो, तर त्याचं नाव कॉलेजच्या यादीतून काढून टाकलं जातं. अनेक क्लासेस 'टॉपर्स' घडवण्यासाठी फक्त हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करतात.मागे राहणाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते – त्यांना मूर्ख, नालायक ठरवलं जातं.शिक्षकांचा सूर बदलतो, प्रशासकीय लोकांचा चेहरा बदलतो... आणि हळूहळू विद्यार्थी एकटाच पडतो.त्याच एकटेपणातून काहीजण सावरतात, काही हरवतात..

आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये "मानसिक स्वास्थ्य" म्हणजे विनोद वाटतो. शिक्षण संस्था केवळ मार्कशीट पाहतात, विद्यार्थ्याच्या डोळ्यातील भीती नाही.
त्या मुलाने आत्महत्या केली कारण:
त्याला सतत अपमानित केलं जात होतं.
त्याचे वर्गात नाव घेऊन अपमान केले जात होते.
त्याच्या चुकांबद्दल सर्वांसमोर टोचून बोललं जायचं.
ही वागणूक शिक्षकांकडून आली असेल, की प्रशासनाकडून – ते महत्त्वाचं नाही... महत्त्वाचं हे आहे की ती "संस्था" त्याला एक सुरक्षित, समजूतदार जागा देऊ शकली नाही.आज अनेक खाजगी क्लासेस निकाल, बोर्ड रँक, IIT-JEE, NEET, MHT-CET यावर लक्ष केंद्रित करतात. तेवढंच त्यांचं मार्केटिंग चालतं. पण काय ते प्रत्येक मुलगा टॉपर असतो?कोणी मध्यम बुद्धीचे विद्यार्थी असतात, कोणी गरिब घरातून येतात, कोणी मानसिक दबावाखाली असतात. त्यांना कुणी समजून घेतं का?त्यांचा संघर्ष, त्यांची घुसमट कुठे जाते? संस्थेसाठी ते केवळ एक ‘फी भरलेला युनिट’ असतात. त्यामुळे त्यांच्या भावना, त्यांच्या समस्या हे शिक्षणात गणलेच जात नाहीत.या घटनेनंतर जमावाने अॅकॅडमीची तोडफोड केली. पोलिस हस्तक्षेप झाला. कायद्याच्या दृष्टीने ही कृती चुकीची आहे. पण त्यामागे एक खोल दुःख आहे, एक अन्यायाविरुद्ध उभा राहण्याचा प्रयत्न आहे.हा विद्यार्थी एकटा नव्हता. त्याच्यासारखे अनेक मुलं या यंत्रणेतून जात असतात. अपमान, दबाव, तिरस्कार यामुळे अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. काही जण बोलून मोकळे होतात, काही गप्प राहतात, आणि काही… कायमचे निघून जातात.हा मुलगा गेला... आता त्याच्या आई-वडिलांना कोणती शिक्षा झाली असेल, हे शब्दांत मांडता येणार नाही.“तो जिवंत होता तेव्हा आम्हाला वाटायचं – कॉलेज त्याची घडण करत आहे... पण प्रत्यक्षात तिथे त्याला तोडलं जात होतं...”या एका वाक्यात किती पालकांचं दुःख सामावलेलं आहे. त्यांनी मोठ्या अपेक्षेने पोटचं लेकरू क्लासमध्ये दिलं होतं. फी भरली, अभ्यासासाठी रात्री-अपरात्री झोप मोड केली. पण संस्थेच्या ‘प्रतिष्ठे’च्या हव्यासापुढे त्यांच्या मुलाचं भावविश्व हरवलं.प्रत्येक संस्था, कॉलेज, क्लासेस यांना हे लक्षात घ्यावं लागेल – विद्यार्थी एक ‘मशीन’ नाही.तो चुकतो, त्याला घसरायला होते...पण त्याला हात द्या, तोंडावर ‘फेल आहेस’ असं फेकू नका.चुका दाखवा, पण माणूस म्हणून – इज्जत राखून, समजूतदारपणाने.त्यांच्या भावना ऐका, त्यांना समजून घ्या.'टॉपर' बनवणं हेच जर उद्दिष्ट असेल, तर विद्यार्थ्यांचं आयुष्य 'तळागाळात' जाणार हे निश्चित.या घटनेनंतर सरकार, पोलीस आणि शिक्षण खात्याने लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे: प्रत्येक खाजगी संस्थेसाठी ‘मानसिक आरोग्य सल्लागार’ नेमणं बंधनकारक करावं.विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी स्वतंत्र समिती असावी. संस्थांना विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आणल्यास कडक कारवाईची तरतूद असावी. हे केवळ तात्पुरतं दुःख मिटवण्यापुरतं नव्हे, तर भविष्यात अशा आत्महत्या थांबवण्यासाठी आवश्यक आहे.विद्यार्थी आत्महत्या ही आकड्यांमध्ये मोजायची गोष्ट नाही.ती म्हणजे एक स्वप्न तुटणं, एक घर उद्ध्वस्त होणं, आणि एक व्यवस्था अपयशी ठरणं.खाजगी क्लासेस, कॉलेजेस यांना हे समजावं लागेल की, ‘रिप्युटेशन’ म्हणजे मुलांचे मार्क नव्हेत – तर मुलांचं आयुष्य घडवणं हेच सर्वात मोठं ब्रँडिंग आहे.

أحدث أقدم