करवीर (प्रतिनिधी) — जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाटचालीकडे पावले वळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगत असतानाच, रविवारी त्यांनी करवीर तालुक्यातील कोपार्डे, वडणगे, बीड या गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.
या बैठकीत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करावा, असा ठाम आग्रह धरला. ‘पीएन पाटील यांच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा आधार हवा आहे. आमच्या स्थानिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सत्तारूढ पक्षाच्या माध्यमातूनच काम होऊ शकते,’ असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
विधानसभा निवडणुकीनंतर अनेक विकासकामे प्रलंबित असून, विरोधकांकडून अडथळे निर्माण होत असल्याची तक्रारही बैठकीत करण्यात आली. भोगावती सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिक अडचणीत असून, त्याला वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा आवश्यक असल्याचे मत अनेक कार्यकर्त्यांनी मांडले.
कार्यकर्त्यांच्या या भावना पाहता राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. मात्र, अद्याप त्यांनी कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. करवीर तालुक्यातील उर्वरित गावांचा दौरा पूर्ण झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, त्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व आमदार सतेज पाटील यांचीही भेट घेतली असून, सद्यस्थितीवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याचे समजते. राहुल पाटील यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण त्यांच्या पक्षांतरामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.