पहिल्या डावात भारत ३५८ वर आटोपला. राहुल, जैस्वाल, सुदर्शन, पंत आणि ठाकूर यांनी कसाबसा स्कोअर उभा केला. स्टोक्स आणि आर्चरच्या भेदक माऱ्यानं भारताची अडचणीत भर घातली. इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळेस मात्र परिस्थिती पूर्ण बदलली. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवात खराब केली. क्रॉली, डकेट, पोपनंतर जो रूट आणि स्टोक्स यांनी भारंभार धावा कुटल्या. बुमराह, सिराज अपुरे पडत होते. सुंदरचा एकहाती प्रयत्न दिसत होता. अखेर जाडेजानं जो रूटचा काटा काढत इंग्लंडला पहिला धक्का दिला. स्टोक्सही तंबूत परतला.
इंग्लंडची डाव ६६९ वर आटोपली. भारतावर डावाने पिछाडी होती. दुसऱ्या डावात सुरुवातीच्या दोन विकेट्स ० धावांवर गेल्यावर भारत पुन्हा संकटात सापडला. पण राहुल-गिल जोडीने १८८ धावांची भागीदारी करून भारताला सावरलं. शतक पूर्ण करून राहुल बाद झाला आणि लगेचच गिलही तंबूत परतला.
२२२-४ अशी अवस्था असताना सामना पुन्हा इंग्लंडकडे झुकत होता. पण मग रंगात आले जाडेजा आणि सुंदर.
जाडेजाला रूटकडून एक कॅच मिळाला, पण तो सुटला आणि इंग्लंडच्या संघाचं नशिब तिथेच बुडालं. ५३ ओव्हरच्या प्रयत्नानंतरही जाडेजा-सुंदरची जोडी फुटली नाही. इंग्लंडचा माज चुरडला गेला. स्टोक्सनं पंचांकडे ड्रॉचा पर्याय मागितला पण जाडेजानं तो साफ नाकारला. शेवटी भारतानं हा सामना ड्रॉ करत मालिका पराभवापासून स्वतःला वाचवलं.
कसोटीतलं जाडेजाचं पाचवं शतक, तर सुंदरचं पहिलं कसोटी शतक ठरलं भारताच्या विजयासारखंच! सामना जिंकला नाही, पण पराभव टाळून भारतानं इंग्लंडला मैदानात नमवलं.