🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

२६ जुलै २००५ : स्वप्ननगरीच्या रस्त्यांवर अश्रूंचा महापूर!"

मुंबई : मुंबईकरांच्या काळजाला अजूनही धस्स करणारा, आणि आधुनिक इतिहासात भूतकाळाची धग ठेवणारा दिवस – २६ जुलै. आज या घटनेला २० वर्ष पूर्ण झाली, पण त्या दिवशीचा पाऊस, ती धावपळ, ती असहाय्यताचं तांडव आजही आठवलं की अंगावर काटा येतो.

त्यादिवशी सकाळ अगदी नेहमीसारखी होती – शाळा सुरू, ऑफिस सुरू, लोकल चालू. पण हळूहळू गडगडणाऱ्या आभाळात जो काही रुद्रावतार धारण झाला, त्याने संपूर्ण मुंबईला गुडघ्यापर्यंत नव्हे, तर छातीतपर्यंत पाण्यात बुडवलं.


सकाळी थोडीशी रिपरिप सुरू होतीच. पण दुपारी १२ नंतर हवामानाचा नूरच बदलला. जेव्हा काही भागात पाणी भरायला लागलं, तेव्हा काही शाळांनी आपली सुट्टी जाहीर केली. अनेकांनी वाटलं – "नेहमीसारखं, थोडा वेळ थांबेल." पण हे वेगळं होतं... अतिशय वेगळं!


जसजसा वेळ पुढे सरकत गेला, तसतसं हे संकट रौद्र होत गेलं. रस्ते, रेल्वे, बसस्थानकं, चाळी, उच्चभ्रू संकुले... कोणताही भाग या जलप्रलयातून सुटला नाही. लोकलच्या रूळांवर पाणी साचलं. बेस्ट बस अडकल्या. हजारो नागरिक आपल्या ऑफिसमधून किंवा इमारतींमध्ये अडकले.


अनेक भागांत पाण्याची पातळी इतकी वाढली होती की, लोकांच्या कमरेवरून खांद्यापर्यंत पाणी जात होतं. जे लोक घराकडे निघाले होते, त्यांनी जी पायपीट केली, ते शब्दांत सांगता येणं अशक्य.


काही ठिकाणी तर वाहत्या पाण्याचा वेग इतका होता की माणसं अक्षरशः वाहून गेली. बंद वाहनांमध्ये अडकलेले नागरिक गुदमरून गेले. मुंबईच्या अनेक भागांमध्ये केवळ पावसाचा नव्हे, तर मृत्यूचा धडका उमटला होता.


हवामान विभागाने २६ जुलै २००५ रोजी मुंबईत तब्बल ९९४ मिमी पावसाची नोंद केली. ही मात्रा संपूर्ण चार महिन्यांच्या सरासरीपेक्षा अधिक होती! एका दिवसातच शहर ठप्प झालं, आणि नागरिकांच्या जीवनात कायमचं भय निर्माण झालं.


या दिवसाने केवळ पाणीच वाहवलं नाही, तर हजारो स्वप्नं, संसार, घरं आणि माणसंही घेऊन गेलं. एकूण १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू, १४,००० पेक्षा जास्त घरे उद्ध्वस्त, आणि ५०० कोटींपेक्षा अधिकचे मालमत्तेचे नुकसान झालं.३७,००० रिक्षा, ४,००० टॅक्सी, ९०० बस व हजारो खासगी वाहने पाण्यात अडकली. लोकल सेवा तब्बल १० दिवस ठप्प होती – हे कोरोनाही करू शकला नव्हता.२६ जुलैच्या संध्याकाळपर्यंत शहरातलं विमानसेवेसारखं अवघं अवकाशही या संकटापासून वाचू शकलं नाही. एकूण ७०० हून अधिक फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या.


या दिवशी एका गोष्टीने मात्र मुंबईची ओळख पुन्हा एकदा सिद्ध केली – मानवतेचा धागा. अनोळखी लोकांनी एकमेकांना आसरा दिला, चहा-भाकर देऊन जीव वाचवले, आपली दुकाने नागरिकांसाठी उघडी ठेवली. परंतु दुर्दैवाने, जे लोक मदतीसाठी पुढे आले, त्यापैकी काहींचे प्राणसुद्धा गेले.

आज, दोन दशकांनंतरही, २६ जुलै म्हटली की मुंबईकर थरकतात. तो फक्त एक पावसाचा दिवस नव्हता – तो होता संघर्ष, शौर्य, भीती आणि अश्रूंचा दिवस.

मुंबईने नंतरही अनेक संकटं पाहिली २६/११, कोरोना, दंगल, दुष्काळ. पण २६ जुलै २००५ चा अनुभव... तो वेगळाच होता.










थोडे नवीन जरा जुने