कोणताही गुन्हा घडल्यानंतर जेव्हा न्यायालयात तो सिद्ध करण्याचे काम सरकारी पक्षाकडे असते, त्यावेळी सर्वात आधी गुन्हेगारी कृत्य करण्यामागील आरोपीचा हेतू सिद्ध करावा लागतो. कोणत्या हेतूने आरोपीने संबंधित कृत्य केले, हे पुराव्यांच्या आधारे न्यायालयापुढे सादर करावे लागते. पुराव्यांची साखळी सुसंगत असली पाहिजे, ती गुन्हेगारी स्वरुपाच्या कृत्याशी थेटपणे जोडलेली असली पाहिजे, हेतू आणि कृती यामधील वेळेचे अंतर हे सुद्धा या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. या सगळ्या गोष्टींच्या आधारे न्यायालयात हेतू सिद्ध करता आला आणि गुन्हा संबंधित व्यक्तीनेच केला आहे, हे सुद्धा दाखवून देता आले तर आणि तरच न्यायालयाकडून संबंधित आरोपीला दोषी ठरवून त्याला कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षा सुनावली जाते. गुन्हा करताना आरोपीचा हेतू काय होता, हे जर न्यायालयापुढे दाखवून देता आले नाही आणि सबळ पुरावेसुद्धा नसतील तर आरोपीची सुटका करण्याशिवाय न्यायालयापुढे पर्याय नसतो.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जून महिन्याच्या अखेरिस एक निकाल दिला. या निकालामध्ये न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली. तसे करताना न्यायालयाने सर्वात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे आरोपीचा हेतू गुन्हेगारी स्वरुपाचा असल्याचे पुराव्यांवरून दिसून येत नाही. न्या. उर्मिला जोशी-फाळके यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. हे प्रकरण होते लैंगिक अत्याचाराचे. आरोपीविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ३५४ ए (आय) आणि लैंगिक अत्याचारापासून लहान मुलांचे संरक्षण कायद्यातील (पॉक्सो) कलम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यातील पीडित मुलगी सज्ञान नव्हती. त्यामुळे आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण नक्की काय होते हे सुद्धा समजून घेतले पाहिजे. पीडीत मुलगी उच्च माध्यमिक शाळेत शिकत होती. ती शाळेतून घरी परतत असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. त्याने तिला घरी जाण्यापासून काही वेळ रोखले आणि त्यावेळी तो तिला ‘आय लव्ह यू’ म्हटला. संबंधित मुलगी घरी गेल्यावर तिने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी वर उल्लेख केलेल्या कलमांच्या आधारे संबंधित मुलाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयात हा खटला चालला. सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचे युक्तिवाद ऐकून घेतल्यावर अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून त्याला तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला. हे सर्व घडल्यानंतर दोषी ठरविण्यात आलेल्या मुलाने सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपिल दाखल केले. उच्च न्यायालयाने या खटल्याच्या सुनावणीवेळी जे घटक विचारात घेतले ते विचार करायला लावणारे आहेत.
सत्र न्यायालयात या खटल्यात पीडित मुलीची उलट तपासणी घेण्यात आली, त्यावेळी तिने हे स्पष्टपणे सांगितले की, तिला संबंधित आरोपीचे नाव माहिती नाही. आरोपी हा शेतीमध्ये काम करतो. संबंधित घटना घडल्याच्या १५ दिवस आधी आरोपी आणि पीडित मुलीचे वडील यांच्यामध्ये शेताला पाणी देण्यावरून वाद झाला होता, हा दावा पीडित मुलीने फेटाळला. या खटल्यातील दुसऱ्या साक्षीदाराने न्यायालयात साक्ष देताना सांगितले की, आरोपी हा घटना घडली त्या दिवशी मोटारसायकलवरून आला होता आणि त्याने पीडितेचे उजवा हात पकडून तिला ‘आय लव्ह यू’ म्हटले होते. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या साक्षीमध्ये जेव्हा मुलीने त्यांना ही घटना सांगितली, त्यावेळी तिने आरोपीचे नाव त्यांना सांगितले नव्हते. केवळ एका मुलाने तिचा हात पकडून तिला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचे सांगितले होते.
उच्च न्यायालयाने या नंतर भारतीय दंडविधान संहितेचा कलम ३५४ मध्ये नक्की काय म्हटले आहे, हे सुद्धा विचारात घेतले. हे कलम लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे. यामध्ये महिलेशी शारीरिक संपर्क प्रस्थापित करणे, तिला नको असलेला स्पर्श करणे, तिच्याकडून शारीरिक संबंधाची अपेक्षा करणे, तिच्या सहमतीशिवाय तिला अश्लील आशय दाखवणे, तिच्याविषयी लैंगिक शब्द उच्चारणे या सर्वाचा समावेश आहे. कलम ३५४ ए (आय) मध्ये याचा समावेश होतो. पॉक्सो कायद्यातील कलम ८ हे कलम ७ शी संबंधित आहे. कलम सातमध्ये लहान मुलीच्या खासगी भागांना हेतूपूर्वक स्पर्श करणे आणि इतर लैंगिक कृत्य करणे याचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपपत्रात आरोपीविरोधात दाखल केलेली कलमे, ज्या आधारावर सत्र न्यायालयाने आरोपीविरोधात खटला चालविला त्यामध्ये आणि प्रत्यक्ष घटना यामध्ये तफावत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.
आता ही तफावत नक्की कुठे आहे याचे सविस्तर विश्लेषण उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात केले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोपीचा हेतू याचा विचार उच्च न्यायालयाने केला. कोणत्याही व्यक्तीचा हेतू हा सहजपणे लक्षात येत नाही. कारण हेतू ही मनातील भावना असते. ती उघडपणे दिसत नाही. तरीही आरोपीने केलेले कृत्य, त्यातून पुढे आलेले पुरावे आणि त्याच्याशी संबंधित सगळे बिंदू एकमेकांना जोडून आरोपीचा हेतू न्यायालयात सिद्ध करता येऊ शकतो. लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांमध्ये आरोपीचा हेतू हा महत्त्वाचा घटक आहे. या खटल्यामध्ये आरोपीने पीडितेसोबत केलेले कृत्य, त्यासंदर्भात सरकारी पक्षाने न्यायालयात सादर केलेले पुरावे यावरून आरोपीचा हेतू पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीने पीडितेला ‘आय लव्ह यू’ म्हटले म्हणजे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्याच्याविरुद्ध भारतीय दंडविधान संहितेतील संबंधित कलमे आणि पॉक्सोतील संबंधित कलमे यांच्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे, असे होत नाही. एखाद्या मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणणे म्हणजे लैंगिक अत्याचार असे कुठेही कायद्यात लिहिलेले नाही आणि कायद्याची निर्मिती करणाऱ्यांना तसे अपेक्षित असल्याचेही संबंधित कायद्याच्या उद्देशिकेवरून दिसून येत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले.
उच्च न्यायालायने या संपूर्ण खटल्यातील तथ्ये, पुरावे, कायद्यातील तरतुदी हे सर्व बघितल्यावर अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेला निकाल रद्दबातल ठरवला. अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीविरोधात ज्या ज्या कलमांआधारे आरोप निश्चित केले होते, त्या सर्वांमधून आरोपीची मुक्तता करण्यात आली तसेच त्याची कारागृहातून सुटका करण्याचेही आदेश जारी केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या खटल्यात जो निकाल दिला आहे, तो गुन्हेगारी स्वरुपाच्या खटल्यांमध्ये हेतूला किती महत्त्व असते, हे समजावून सांगणारा आहे. आधी म्हटल्याप्रमाणे गुन्हेगारी कृत्य करण्यामागील आरोपीचा हेतू हा न्यायिक प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. जरी कोणाचा हेतू हा सहजासहजी लक्षात येणे अवघड असले, तरी गुन्हेगारी कृत्य तेथून मिळालेले पुरावे, गुन्ह्याशी संबंधित सगळे घटक याची जोडणी करून पोलिसांना आणि सरकारी पक्षाला हा हेतू न्यायालयापुढे स्पष्टपणे दाखवावा लागतो. हा हेतू सिद्ध करता आला आणि तो कायद्यातील संबंधित कलमांशी सुसंगत असेल तर न्यायालय आरोपीला दोषी ठरवू शकते. हेतूच सिद्ध झाला नाही, तर मग जे प्रश्न उपस्थित होतात, त्यातून आरोपीची सुटका सुद्धा होऊ शकते, हे सामान्य नागरिक म्हणून आपणही लक्षात ठेवले पाहिजे.
(लेखक विश्वनाथ गरुड पुण)