🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

आप'चा सर्जनशिल निषेध: नोटांचा वर्षाव करत भ्रष्टाचाराच्या विळख्याला वाचा फोडली!

 कोल्हापूर | प्रतिनिधी

महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पात ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याच्या गंभीर आरोपांमुळे शहरात खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमीवर 'आम आदमी पार्टी'ने महापालिकेतील भ्रष्ट व्यवस्थेचा पर्दाफाश करत अनोख्या मार्गाने आंदोलन केले. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर नोटांचा वर्षाव करत, 'कचरा पेट्या' आणि टोचणाऱ्या घोषणांनी प्रशासनाला चपराक दिली.


कामाचे बिल पास करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचे ठोस पुरावे ठेकेदारानेच व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आणि स्क्रीनशॉट्सच्या माध्यमातून सार्वजनिक केले आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंत्यांपासून ते मुख्य लेखापाल व अतिरिक्त आयुक्तांपर्यंत टक्केवारीचा सुसंगत उल्लेख आढळतो, असे उघड झाले आहे.


या निषेध आंदोलनात नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले ते होते अधिकाऱ्यांचे 'प्रतिकात्मक पुतळे'. “मी टक्केवारी खातोय”, “माझं पगारात भागत नाही” अशा लिखाणासह तयार करण्यात आलेल्या पुतळ्यांमध्ये नोटा भरून ठेवण्यात आल्या होत्या. या माध्यमातून 'आप'ने भ्रष्टाचारावर सर्जनशील प्रहार केला.


'आप'चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले, "महापालिकेतील घोटाळ्यांचे स्वरूप आता पुराव्यांसह समोर आले आहे. ठेकेदाराच पुढे येऊन पैसे दिल्याची कबुली देतोय, आणि तरीही प्रशासन मूग गिळून गप्प का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


संपूर्ण प्रकरणात महापालिकेची चौकशी सध्या स्थानिक स्तरावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. मात्र, त्यांच्याच विभागातील व्यक्तींवर आरोप असल्याने चौकशीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. म्हणूनच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ व स्वतंत्र अधिकारी – मुख्य अभियंत्यांमार्फत तपास व्हावा, अशी स्पष्ट मागणी 'आप'च्या वतीने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे करण्यात आली आहे.


दरम्यान, महापालिकेच्या कामांमध्ये '18 टक्के कमिशनशिवाय कोणालाही काम मिळत नाही' असा संदेश काही महिन्यांपूर्वीच एका ठेकेदारांच्या ग्रुपमध्ये वायरल झाला होता. त्यामुळे आजवरचे आरोप केवळ अफवा नसून 'व्यवस्था' म्हणून राबवला जात असलेला भ्रष्टाचार असल्याचा गंभीर निष्कर्ष यानिमित्ताने पुढे आला आहे.


या आंदोलनात शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतिफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, राकेश गायकवाड, संजय नलवडे, मयुर भोसले, लखन काझी, रमेश कोळी, चेतन चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.


महापालिकेच्या पारदर्शकतेवर असलेले प्रश्नचिन्ह आता आणखी ठळक झाले असून, येत्या काही दिवसांत चौकशी आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



أحدث أقدم