नांदणी, ता. 31 जुलै:
नांदणी (ता. हातकणंगले) येथील जिनसेन स्वस्तिश्री जैन मठामधील महादेवी हत्तीणीचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झालेले स्थलांतर आता व्यापक जनभावनेचा विषय ठरत आहे. या प्रकाराने जैन धर्मीयांमध्ये तीव्र नाराजी व हळहळ व्यक्त केली जात असून, महादेवीला मठात परत आणण्यासाठी व्यापक स्वरूपात आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी आज मठात जाऊन मठाधिपती स्वस्तिश्री भट्टारक स्वामीजी यांची भेट घेतली आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. महादेवीला परत आणण्यासाठी कायदेशीर स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
मठाच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले की, लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवले जाणार असून, संपूर्ण देशभरातून जनआंदोलन उभारले जाणार आहे. महादेवी ही मठाची धार्मिक, पारंपरिक व आध्यात्मिक ओळख होती, असे भक्तांचे म्हणणे आहे.
या भेटीत माजी आमदार राजूबाबा आवळे, शेखर पाटील, सागरशंभु शेट्ये, महेश परीट, श्रेणिक नरदे, नितीन बागे, जयदिप थोरात, अमोल चौगले, मठाचे विश्वस्त डॉ. सागर पाटील, रामगोंडा पाटील, आप्पासाहेब तरवे, अविनाश पाटील, शितल उपाध्ये, माणतेश जोगळे आदींसह अनेक जैन धर्मीय आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
स्वस्तिश्री भट्टारक स्वामीजींनी भावनिक शब्दांत सांगितले –
> "महादेवी केवळ एक प्राणी नव्हती, ती आमच्या श्रद्धेची मूर्त स्वरूप होती. तिच्याशिवाय मठ ओस पडल्यासारखा वाटतो. आमचा हा लढा कायदेशीर आणि शांततापूर्ण असेल."
आमदार सतेज पाटील यांनीही भावना व्यक्त करत सांगितले –
> "महादेवीच्या बाबतीत झालेल्या निर्णयामुळे स्थानिक जनभावना व्यथित झाल्या आहेत. यासंदर्भात योग्य स्तरावर चर्चा करून न्याय मिळवण्यासाठी मी प्रयत्न करीन."
हे निवेदन आगामी आठवड्यात राष्ट्रपतींकडे सादर करण्यात येणार असून, राज्यभरातून सह्यांचे मोठ्या प्रमाणावर संकलन सुरू आहे.