अकोला | प्रतिनिधी
शेतकरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या आणि आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय राहिलेल्या अकोल्यातील युवक अक्षय राऊत यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नव्या नेतृत्व संकल्पनेचा एक नवा अध्याय म्हणून या नेमणुकीकडे पाहिले जात असून, पक्षांतर्गत आणि बाह्य वर्तुळातही या निर्णयाचे विविध अर्थ काढले जात आहेत.
राजकारणातील पारंपरिक व घराणेशाहीच्या चौकटीत न बसणारी ही नेमणूक अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरली आहे. 'शेतकरी हमीभाव कायदा' आणि 'कर्जमुक्ती' या ज्वलंत मुद्द्यांवर जिल्ह्यात संघर्ष करताना रस्त्यावर उतरलेल्या आणि ‘शेतकरी जागर मंच’च्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती घडवणाऱ्या अक्षय राऊत यांनी कोणत्याही पदाचा विचार न करता कार्यकर्त्याच्या भूमिकेतून आपला आवाज बुलंद केला होता.
राजकारणातील कोणतीही पूर्वपिठिका नसताना आणि काँग्रेसमध्ये सदस्यत्वाची देखील पार्श्वभूमी नसतानाही, थेट प्रदेश सचिवपदावर त्यांची वर्णी लागणं ही पक्षातील परिवर्तनशीलतेची नवी ओळख ठरत आहे. काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या नव्या नेतृत्व संकल्पनेचा हा भाग असल्याचं सांगितलं जातं आहे.
सामाजिक चळवळीतून उगम पावलेलं हे नेतृत्व केवळ बोलघेवडं नसून कृतीशील असल्याचा ठसा अक्षय राऊत यांनी मागील काही महिन्यांत उमटवला होता. अकोल्यातील विविध तालुक्यांत शेतकरी समस्या मांडणारे मोर्चे, उपोषणं, संवाद यात्रा यामधून त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका प्रभावीपणे सादर केली होती. त्यांच्या ‘न थांबणाऱ्या’ लढ्याने स्थानिक पातळीवर एक ठोस जनाधार तयार केला.
सामाजिक कार्यातून राजकारणात प्रवेश मिळणं हे फारसं दिसून येत नाही. मात्र, राऊत यांचा संघर्ष आणि त्यामागील तळमळ काँग्रेस नेतृत्वाच्या निदर्शनास आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नियुक्तीनंतर सोशल मीडियावर अनेक जणांनी स्वागतपर प्रतिक्रियांची बरसात केली असून, पक्षविरोधी भूमिका मांडणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्याच्या या नव्या प्रवासाचे कौतुक केले आहे.
राजकीय भाष्यकारांच्या मते, ही नेमणूक केवळ एक व्यक्तीला दिलेली संधी नाही, तर काँग्रेस पक्षात नव्या दमाच्या नेतृत्वासाठी तयार असलेले व्यासपीठ अधिक खुले करण्याचा इशारा आहे. "सांगणाऱ्यांपेक्षा करणाऱ्यांना संधी" या सिद्धांताची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्याचं हे उदाहरण असल्याचं निरीक्षण व्यक्त केलं जात आहे.
या संधीमुळे अक्षय राऊत यांच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष शेतकरी आणि ग्रामीण भागाशी अधिक प्रभावी संवाद साधू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.