तांदुळवाडी (जि. सांगली) तांदुळवाडी येथील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी कामाचे बिले वेळेवर न मिळाल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिक पातळीवर शासन यंत्रणेच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. हर्षल पाटील यांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती सर्व मदत व पाठपुरावा केला जाईल, असा ठाम शब्द त्यांनी यावेळी दिला.
"न्याय मिळवून देण्यासाठी लढा देऊ" – सतेज पाटील
या भेटीत आमदार पाटील यांनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडे या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. "एका कष्टकरी तरुणाचे आयुष्य चुकीच्या सिस्टीममुळे संपले, हे अत्यंत वेदनादायक आहे. हर्षलला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू," असे आश्वासन त्यांनी दिले.