🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

राधानगरी धरण भरलं! दरवाजे उघडले; पंचगंगा परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

 कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण आज, २५ जुलै रोजी रात्री १० वाजता पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातील स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडले आहेत. यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.


धरणातून सध्या वीज निर्मितीसाठी २,७६५ क्यूसेक आणि विसर्गासाठी ४,३५८ क्यूसेक असे एकूण ७,१२३ क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. या वाढलेल्या विसर्गामुळे पंचगंगा व भोगावती नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.


शुक्रवारी रात्रीपासून कोल्हापूर परिसरात पावसाचा जोर कायम असून, धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. पावसासोबतच वाऱ्याच्या जोराने देखील दरवाजे उघडण्याची प्रक्रिया वेगाने झाली. रात्री १० वाजून १ मिनिटांनी पहिला दरवाजा उघडला आणि नंतर काही मिनिटांच्या अंतराने सहा दरवाजे आपोआप उघडले.


विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही नेमक्याच २५ जुलै दिवशी धरण भरून दरवाजे उघडले गेले होते. यंदाही तीच परिस्थिती उद्भवली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जलसाठा वेगाने वाढत आहे.


प्रशासनाने पंचगंगा नदीच्या काठावर असलेल्या गावांमध्ये अलर्ट जारी केला असून, नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशी सूचना देण्यात आली आहे. शेतीपिके, जनावरे आणि विद्युत उपकरणांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.


सूचना

पुढील काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचना लक्षपूर्वक ऐकाव्यात व गरज असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

أحدث أقدم