कोल्हापूर - कोल्हापूरच्या आरोग्य सेवेचा कणा मानले जाणारे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR Hospital) सध्या नूतनीकरणाच्या कामांमुळे चर्चेत आहे. रुग्णालयाचे नव्या रूपात रूपांतर करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. अत्याधुनिक सुविधा, नवे वॉर्ड्स, स्वच्छतागृहे, व्हेंटिलेटर सुविधा, आणि रुग्णांसाठी सुखसोयी – हे सर्व ऐकून जनतेत समाधानाचे सूर उमटत आहेत.पण या चकाकत्या घोषणांच्या आड एक कटू वास्तव दडलेले आहे.
या रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या एका नागरिकाने स्वतःचा अनुभव सोशल मीडियावर मांडला असून, या अनुभवामुळे रुग्णालय व्यवस्थेतील मूलभूत त्रुटी समोर आल्या आहेत.सकाळपासून रुग्ण वाट बघत राहतात, पण मुख्य डॉक्टर काही दिसत नाहीत. काही वॉर्ड्समध्ये केवळ शिकाऊ डॉक्टरांवर जबाबदारी टाकली जाते, जे अनेकदा गोंधळलेले असतात."प्रश्न विचारला तर उद्धटपणे बोलणे, उपचारामध्ये गडबड करणे, रुग्णांना दुर्लक्षित करणे" – हे या शिकाऊ कर्मचाऱ्यांचे सामान्य वर्तन झाले आहे.रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना आवश्यक माहिती मिळत नाही. काही वेळा त्यांना रागाने हाकलून लावले जाते. "तुमचं काम नसेल तर बाहेर बसा" असे म्हणत त्यांना कमी लेखले जाते.रुग्णाच्या सोबत असलेल्या व्यक्तीला वेळोवेळी हटकणे, घालून पाडून बोलणे, आणि अनेकदा त्यांच्यावर राग काढणे – हे सिक्युरिटी गार्ड्सचे वर्तन धक्कादायक आहे."रुग्णालय म्हणजे उपचार, आधार आणि मायेचं ठिकाण असावं लागतो. पण इथे मी आणि माझ्या नातेवाईकाने जे अनुभवलं, ते त्रासदायक होतं. डॉक्टरांची प्रतीक्षा, कर्मचाऱ्यांचे उद्धट बोलणे, गरज असताना कुणी मदतीला येत नाही... ही एक अपमानाची भावना होती", असा थेट अनुभव या व्यक्तीने सांगितला.नूतनीकरण म्हणजे केवळ भिंती रंगवणे किंवा यंत्रे आणणे नाही. मानसिकतेत बदल, कर्मचाऱ्यांची जबाबदारीची जाणीव, आणि सेवेतील गुणवत्ता – हे मुख्य मुद्दे आहेत. जर सेवा आणि वागणूकच चुकीची असेल, तर इमारतीच्या सौंदर्याला अर्थ उरत नाही.
🙏 आमचा सवाल:
नूतनीकरणाबरोबर रुग्णसेवेच्या दर्जाचे नूतनीकरण होईल का?
चुकीचे वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल का?
नातेवाईकांना मानवी वागणूक कधी मिळणार?
CPR सारख्या शासकीय रुग्णालयांची जबाबदारी कुणावर आहे?
प्रतिक्रिया.....
"नमस्कार,
मी आरोग्य सेविका नेहा देसाई .
मी नुकतीच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात एका रुग्णाला भेटण्यासाठी गेले होते. पण तिथे मला जो अनुभव आला... तो धक्कादायक होता. पेशंट आणि नातेवाईक यांना दिली जाणारी वागणूक ही निंदनीय होती. तसेच रुग्णालयात डॉक्टर अनुपस्थित, शिकाऊ स्टाफकडून असंवेदनशील वागणूक, नातेवाईकांशी उद्धट बोलणं, आणि सिक्युरिटी गार्डची थेट दादागिरी,हा अनुभव पाहून मी हेलावून गेले,एक आरोग्य क्षेत्रात काम करणारी म्हणून मला हे सहन झालं नाही,सामान्य माणसाचं काय? म्हणून माझी विनंती आहे –
आपण सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेब –कृपया याची तातडीने दखल घ्या.नूतनीकरण चालू आहे, ते चांगली गोष्ट आहे...पण त्यासोबत सेवेचं नूतनीकरण हे जास्त गरजेचं आहे.रुग्णालयात आलेल्याला माणूस म्हणून वागणूक मिळावी – हीच माझी विनंती आहे.
धन्यवाद!"