जॉर्जियामधील बटुमी शहरात पार पडलेल्या 2025 च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवा बुद्धिबळपटूने इतिहास रचला आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी नागपूरच्या दिव्या देशमुखने हा चकित करणारा पराक्रम गाजवत, भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हंपीला अंतिम सामन्यात पराभूत केलं आहे.
ही लढत केवळ दोन भारतीय खेळाडूंमधील नव्हती, तर ती अनुभव आणि तरुणाई यामधील संघर्ष होती. एकीकडे अनुभवी आणि अनेक जागतिक स्पर्धांचा अनुभव असलेली कोनेरू हंपी, तर दुसरीकडे तरुण पण अतिशय आक्रमक आणि तंत्रशुद्ध खेळ करणारी दिव्या देशमुख.
अखेर या दोघींच्या गाजलेल्या सामन्यात "वयापेक्षा आत्मविश्वास मोठा ठरतो" हे पुन्हा एकदा सिध्द झालं. दिव्याने हंपीच्या डावांची सडेतोड उत्तरं देत खेळावर आपलं पूर्ण नियंत्रण मिळवलं आणि काही निर्णायक चालींनी सामन्याचं पारडं आपल्या बाजूला वळवलं.
ही स्पर्धा भारतीय बुद्धिबळासाठी आधीपासूनच खास ठरली होती. कारण उपांत्यफेरीतच भारताच्या दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त खेळ करत जागतिक दिग्गजांना नमवत अंतिम फेरी गाठली होती. विशेष म्हणजे, चीनच्या खेळाडूंनी गेल्या काही वर्षांत या स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजवलं होतं, त्याला भारतीय लेकींनी यंदा तगडं आव्हान दिलं आणि ते पार करत दोघीही अंतिम फेरीत पोहोचल्या.दिव्याच्या या यशानं संपूर्ण भारतात आनंदाचं वातावरण आहे. १९ वर्षांच्या या चिमुरडीने वयाच्या दुप्पट असणाऱ्या हंपीला पराभूत करत फक्त एक स्पर्धा जिंकलेली नाही, तर देशाच्या नव्या बुद्धिबळ युगाची दारे उघडली आहेत.
कोनेरू हंपीचं योगदानही या विजयात कमी नाही. ती स्पर्धाभर स्थिर खेळ करत आली आणि अंतिम फेरीत एक भारतीय जिंकणार याची खात्री आधीच निर्माण झाली होती. मात्र, अंतिम टप्प्यावर दिव्याने ठाम निर्णय घेत स्वतःचं नाव इतिहासात कोरलं.
नागपूरची रहिवासी असलेली दिव्या देशमुख ही भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील एक झपाट्याने पुढे येणारी खेळाडू आहे. लहान वयातच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिनं आपला ठसा उमटवायला सुरुवात केली होती. तिच्या अचूक आणि आक्रमक डावांमुळे तिला ‘स्पीड क्वीन’ म्हणूनही ओळखलं जातं.2025 FIDE Women’s World Cup ही तिच्या कारकिर्दीतील आजवरची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. यामुळे ती जागतिक पातळीवर नावारूपाला येण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
दिव्याच्या या विजयाने केवळ बुद्धिबळ प्रेमीच नव्हे तर सामान्य जनतेचंही लक्ष वेधून घेतलं आहे. अशा स्पर्धांमध्ये भारताचे दोन खेळाडू अंतिम फेरीत पोहोचणं ही भारतीय बुद्धिबळासाठी ऐतिहासिक गोष्ट ठरली आहे.खेळाच्या क्षेत्रात महिला खेळाडूंना मिळणारी प्रोत्साहनाची गरज दिव्याच्या या यशामुळे अधोरेखित होते. अनेक तरुण मुलींना यामुळे प्रेरणा मिळेल आणि भारताला अजूनही अशा 'बुद्धीच्या राण्या' लाभतील.
"वय लहान असलं तरी स्वप्न मोठं होतं, आणि दिव्या देशमुखने ते स्वप्न सत्यात उतरवत भारतीय बुद्धिबळाचा झेंडा पुन्हा एकदा जागतिक पातळीवर फडकवला आहे!"