🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

माईक हातात आला आणि आयुष्यचं वळण बदललं – 'मज्जा गर्ल' अंकिताचा प्रेरणादायी प्रवास

 महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली, मुंबईच्या धकाधकीच्या गर्दीत आत्मविश्वासाने बहरलेली, आणि आपल्या आवाजाच्या ताकदीवर असंख्य मनं जिंकणारी एक प्रतिभावान निवेदिका आणि संवेदनशील पत्रकार अंकिता अशोक लोखंडे

शब्दांशी असलेली मैत्री, आवाजातील उठाव, आणि समोरच्याच्या भावनांना समजून घेऊन त्या आपल्या आवाजात प्रभावीपणे उतरवण्याची विलक्षण कला हीच अंकिताची खरी ओळख. तिच्या सादरीकरणात केवळ शब्द नसतात, तर असते एक ऊर्जा, एक आत्मीयता आणि एक ठाम अस्सलपणा!

"न्यूज कट्टा"च्या वतीने आम्ही, The Shining Star – मज्जा गर्ल अंकिताशी केलेली खास आणि प्रेरणादायी बातचीत.....


मज्जा गर्ल’ ही ओळख कशी निर्माण झाली? या प्रवासाची सुरुवात कुठून आणि कशी झाली?

      ओके, सो पहिलाच प्रश्न हा आहे की मज्जा गर्ल ही ओळख कशी झाली आणि करिअर कसं झालं? मी माझं शिक्षण रुईया कॉलेजमध्ये बीएमएम (Bachelor of Mass Media) मध्ये केलं. कॉलेजच्या वेळी मी एकदा नाटकाच्या हॉलमध्ये गेले होते, आणि ते जे करत होते ते मला प्रचंड आवडलं. मला वाटलं की, "मलाही एक दिवस असंच नाटक करायला मिळावं!" पण तेव्हा त्या छोट्या अंकिताला असं काही स्वप्न नव्हतं नंतर नितीन कांबळे नावाचे एक दिग्दर्शक आहेत – त्यांनी 'जिलबी' चित्रपट बनवला आहे. माझ्या एका मैत्रिणीने मला त्यांच्या ओळखीला नेलं. मग मी त्यांच्या नाटकाच्या तालमीत शिकायला लागले. खूप महिने, खूप वर्षं झाली, पण ते नाटक रंगभूमीवर आलंच नाही –जोपर्यंत मी होते, तोपर्यंत नाही.मग घरून थोडासा प्रेशर आला "तू इतकी शिकली आहेस, बीएमएम केलं आहेस, आता या क्षेत्रात होणार नाही, काहीतरी जॉब बघ."तेव्हा मी एक पार्ट टाईम जॉब घेतला. एक सिम कार्ड प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीत कामाला लागले. हार्डली दीड-दोन महिनेच केलं, मग मी सरांना सांगितलं की, "मला याच इंडस्ट्रीमध्ये करायचंय एकदा पडद्यामागे किंवा पडद्यासमोर."तेव्हा त्यांनी सांगितलं, "एखादी संधी आली, तर तुला सांगतो."

त्याच दरम्यान मला कॉल आला "अंकिता, एक मीडिया वन सोल्युशन नावाची कंपनी आहे. त्यांचं 'मज्जा' नावाचं पेज आहे. त्यांना एक रिक्रूटमेंट आहे. जाऊन इंटरव्ह्यू दे."मी म्हटलं, "करत नाहीये काही सध्या, तर जाऊन येते."इंटरव्ह्यूला गेले. मला अजिबात माहिती नव्हतं – पोर्टल काय असतं, वेबपेज काय असतं, फेसबुक पेज कसं चालवतं, यूट्यूब पोस्टिंग काय असतं… काहीच माहिती नव्हतं,तेंव्हा आमचे जे बॉस आहेत, त्यांनीच सांगितलं,आम्हाला विश्वास आहे तुझ्यावर, तू करू शकतेस."माझा पहिला पगार फक्त सहा हजार रुपये,पण मला प्रचंड आनंद झाला..! मी अंधेरी स्टेशनवर उभी होते. मम्मीचा फोन आला "काय ग काय झालं झालं का सगळं नीट?"मी म्हटलं, "झालं, सहा हजार बोलतायत,करू का?

मम्मी म्हणाली, "सुरुवात करायची असेल तर करून टाक."मग मी जॉइन झाले. सुरूवातीला काहीच माहिती नव्हती – फक्त फेसबुकवर पोस्टिंग करत होते. तीन महिन्यांनी माझ्याकडे एडिटर आला, तेंव्हा थोडं थोडं व्हिडीओ बनवायला लागले. अगदी बेसिक – जसं आत्ताची लहान मुलं कॅनव्हा वापरतात, एका इव्हेंटला गेले होते. माझ्या मैत्रिणी तयार होत्या. सगळ्यांकडे कॅमेरे होते. सगळे रिपोर्टर हातात माईक घेऊन इंटरव्ह्यू घेत होते, मी ऑफिसला आले आणि बॉसला फोनवर सांगितलं "आय थिंक, हमें मज्जा के लिए कॅमेरा और माईक लेना चाहिए."त्यांनी विचारलं, "पण करणार काय?"

मी म्हटलं, "बघूया काय होतं." मग माझा पहिला कॅमेरा आला. आजही मी तो जपून ठेवला आहे. कोणालाही विकलेला नाही, त्यानंतर आम्ही मार्केटमध्ये उतरलो एक अँकर म्हणून. आमच्या सरांनीच सुचवलं, "आपण तुला 'मज्जा गर्ल' म्हणून पुढे घेऊन जाऊ."

"हॅलो, हाय, नमस्कार! मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे!"

अशी सुरुवात झाली... आता जेव्हा फील्डवर जाते, किंवा कुणीतरी थोडंफार ओळखतं, तेव्हा मला हाक मारतात – "मज्जा गर्ल!"खूप भारी वाटतं,तेंव्हा मला ब्रँड काय असतो, याची कल्पनाही नव्हती. पण आज, ते नाव माझ्यासोबत आहे. मी त्याचा अभिमानाने उपयोग करते , माझी सुरूवात मीडियामध्ये अचानक झाली. माझं काहीच स्वप्न नव्हतं रिपोर्टर होण्याचं. लहानपणी मी बोबडी बोलायचे. आजही काही वेळा मी अडकते बोलताना, पण जेव्हा लहानपणापासून ओळखणारे लोक म्हणतात – "तू एवढं छान बोलतेस!" तेव्हा वाटतं, हेच माझं उत्तर आहे त्या सगळ्यांना.शाहरुख खानसारखी मी पण बोबडी बोलायचे. पण आज मी त्या नावानं उभी आहे ‘मज्जा गर्ल’ हीच माझी खरी ओळख आहे. आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे.


या 8 वर्षांच्या प्रवासात असा कोणता क्षण होता, जेव्हा वाटलं की एका ठिकाणी आता थांबावं?

आठ वर्षांच्या प्रवासात मला कधीच असं वाटलं नाही की थांबावं. खरंच, कधीच नाही. कारण का?मला माझं काम खूप आवडतं.

मी एक दिवसही माझ्या टीमशिवाय, माझ्या बॉसशिवाय, माझ्या ऑफिसशिवाय राहू शकत नाही.मी literally २४ तास काम करत असते. मी आजारी पडत नाही – कारण मी स्वतःला परवानगीच दिलेली नाहीये आजारी पडायची, किंवा विश्रांती घ्यायची! मी खूप काम करते – इतकं की सगळ्यांना सांगते: "खूप काम करा! जगात काही वेगळं नाही, फक्त एकच आयुष्य आहे. ते सुद्धा तुम्हाला तुमचं आवडतं काम करत करत जगायचंय."कारण हेच ते काम आहे – ज्यामुळे तुमचं घर चालतंय,ज्यामुळे आयुष्य चांगलं होतंय,ज्यामुळे महिन्याच्या शेवटी पैसे येतात.आणि मी त्याबद्दल नेहमी ग्रेटफुल राहते – "थँक्यू, तू येतोस माझ्या अकाउंटमध्ये, आणि त्यामुळे माझं आयुष्य चालतं."आईवडिलांना मी पैसे देते, स्वतःसाठी काही खर्च करते.आठ वर्षांत एकदाही असं वाटलं नाही की थांबावं.एकदाच एक क्षण होता जेव्हा थोडंसं वाईट वाटलं. एक खूप मोठा कलाकार होता नाव घेणार नाही.एक खूप मोठा चित्रपट. त्याचा कलाकार आमच्या studio मध्ये येणार होता.त्याच्या आधी मेकअप आर्टिस्ट, टीम वगैरे एका वाजता आली होती तो दोन वाजता येणार होता.माझा पहिलाच असं मोठं studio interview होतं.मी त्यासाठी प्रचंड तयारी केली होती.रात्रभर जागून प्रश्न लिहिले होते.दोन वाजले… तीन वाजले… साडेतीन वाजले. मी बाहेर गेले – तरी मेकअप आर्टिस्ट आलेला तो पण निघून गेला. आणि कॉल केल्यावर समजले की तो येणार नाही.

त्या क्षणी असं वाटलं "का? हे आपल्या सोबतच का होतं? का आपल्याला भाव मिळत नाही? मी इतकी मेहनत करते तरी कमी पडते का?"तेव्हा मला वाटलं, "नको… आता काहीतरी स्वतःसाठी करायला हवं!"मी तो इन्सिडेंट बाजूला ठेवला. आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली."काय करता येईल? आर्टिस्टसोबत चांगलं बॉन्डिंग करायचं असेल तर काय करता येईल?"मी चांगले चांगले इंटरव्ह्यू घ्यायला लागले, स्टोरीज करायला लागले.फेसबुकवर काम करत होते – तेव्हाच YouTube माझ्या आयुष्यात नव्हतं.

नंतर YouTube सुरू केलं.हळूहळू इंडस्ट्रीमध्ये लोकांना कळायला लागलं – "अरे, मज्जा गर्ल आहे कोणी तरी!"काही आर्टिस्ट ओळखायला लागले.त्याच्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला.सगळं जग थांबलं हे सगळ्यांना माहितीच आहे.

पण एंटरटेनमेंट थांबला नाही,टीव्ही थांबला नाही.आम्हाला ऑफिस बंद करायला सांगितलं मी सरांना विनंती केली, "वर्क फ्रॉम होम करूया."मी पीसी घरी आणला.आणि मला अभिमान वाटतो सांगायला –मी त्या दोन वर्षांत रोज 6 वाजता उठायचे.

बाकी सगळे आरामात उठायचे, पण मी सहा ते बारा काम करायचे, मग आंघोळ, जेवण, पुन्हा 2 ते 7 काम.माझं रूटीन कधीच बंद पडलं नाही.Covid मध्ये जग थांबलं,पण मी थांबले नाही.मी YouTube सुरू केलं आणि 1 लाख सब्सक्रायबर झाले! हो, वेळ लागला – 2 वर्षं लागली. पण एक लाख लोकांना त्याकाळात आपल्या चॅनेल वर घेऊन येणे म्हणजे खूप मोठी Achivement होती, घरच्यांनी केक कापला.

आणि मेहनतीचे डोळ्यांसमोर परिणाम दिसायला लागले. आणि सगळ्यांना सांगते,"तुमचं काम आहे, तुमचं क्रेडिट मिळालंच पाहिजे!"1 लाख सब्सक्रायबर झाल्यावर ऑफिसचा विश्वास वाढला.

माझा पगार त्यांनी कधी कमी केला नाही,कामावरून काढलं नाही, इन्क्रिमेंट दिलं योग्य पद्धतीनं.आणि म्हणून मला काम करावंसं वाटतं कारण मोबदला मिळतो.खरंच, एकही असा क्षण नाही आला जिथे मला वाटलं की थांबावं.काम, मेहनत आणि प्रामाणिकपणा या सगळ्यावर माझा विश्वास अजूनही तसाच आहे.


एक महिला पत्रकार म्हणून कोणते वेगळे संघर्ष तुम्हाला झेलावे लागले?

तुम्ही महिला आहात, तर तुमच्या आयुष्यात वेगळे काही संघर्ष असतातच, हे खरंच आहे. अनेक स्त्रियांना असे काही वेगळे अनुभव येतात. पण माझ्या आयुष्यात माझे जे काही कलीग आहेत, ते माझे खरे सहकारी आहेत. माझ्या ऑफिसमधले काही लोक, किंवा मी जिथे काम करते त्या फिल्डमधले काही लोक, यांनी कधीच मला "ही स्त्री आहे" म्हणून वेगळी ट्रीटमेंट दिली नाही.मला असं वाटतं की हे सगळं मनाचे खेळ असतात. असं नाही की पुरुष नेहमी स्त्रियांना कमी लेखतात. तुम्ही तुमचं काम कसं करता, तुम्ही माणूस म्हणून किती प्रामाणिक आणि सजग आहात हेच महत्त्वाचं ठरतं.या इंडस्ट्रीमध्ये, आणि कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये हेच बघितलं जातं की तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात, तुम्ही एक चांगले लीडर आहात का, लोकांशी तुमचं वागणं कसं आहे, आणि तुम्ही तुमच्या कामावर किती प्रेम करता. जर या सगळ्या गोष्टी मनापासून करत असाल, तर या जगात अशी कोणतीही ताकद नाही जी तुम्हाला खाली खेचू शकेल किंवा पुढे जाण्यापासून रोखू शकेल.तुमच्या कामाप्रती आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांप्रती प्रामाणिक राहिलात, तर या जगात अशक्य काहीच नाही असं मला ठाम वाटतं.


 तुमच्या कामाची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? कोण आहे तुमचा प्रेरणास्त्रोत?

      माझ्या कामाची खरी प्रेरणा दोन ठिकाणांहून मिळते—माझं घर आणि माझं ऑफिस. मला नेहमी असं वाटतं की माणसाच्या आयुष्यात दोन प्रकारचे संस्कार होत असतात: एक, आपल्या आई-वडिलांकडून मिळणारे, आणि दुसरे, आपण जिथे काम करतो त्या ठिकाणच्या वातावरणातून, तिथल्या लोकांमधून, त्यांच्या विचारांतून.घरातील संस्कार मला माणूस म्हणून घडवतात कसं बोलायचं, कसं वागायचं, इतरांचा आदर कसा करायचा हे मी घरातून शिकलो. पण जेव्हा तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमचं आयुष्य घडवत असता, तेव्हा तिथल्या लोकांचे विचार, त्यांचं ध्येय आणि त्यांची कार्यपद्धती तुमच्यावर खोलवर प्रभाव टाकतात.माझ्या आयुष्यात, माझे बॉस शौरिंद्र सर हे माझे खरे प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांनी मला 'मोठं स्वप्न बघायला' शिकवलं. त्यांनी नेहमी मला सांगितलं – "फ्रेम किंवा प्रसिद्धी क्षणात येत नाही, पण ध्येय मोठं ठेवलं तर त्यासाठीचा प्रवास तुला मोठा बनवतो."त्यांचं एक व्हिजन होतं – ‘मज्जा ओरिजिनल’. मी त्या व्हिजनमध्ये पूर्णपणे सहभागी झालो. ‘आठवी अ’ ही पहिली वेब सिरीज असो, किंवा ‘पाऊस' ' मैत्रीचा सातबारा’, किंवा इतर प्रोजेक्ट्स – या सगळ्याच्या निर्मितीचा मी भाग झालो, आणि मला त्याचा खूप अभिमान आहे.

माझ्यासाठी हे फक्त काम नव्हतं, हे एक स्वप्न होतंत्यांचं आणि आता माझंही झालेलं. त्यांच्या स्वप्नाची पूर्तता करणं म्हणजेच माझी स्वतःची जाणीव. आणि जेव्हा लोक आज म्हणतात, "मज्जा वाले काहीतरी वेगळं करतात," तेव्हा वाटतं की आपण खरोखरच काहीतरी सुंदर घडवतोय.

म्हणूनच, माझ्या कामाची खरी प्रेरणा ही माझ्या बॉसकडूनच मिळते. त्यांच्या विचारांतली स्पष्टता, भविष्याकडे बघण्याची दूरदृष्टी, आणि कोणत्याही परिस्थितीत चिकाटीने काम करत राहण्याची वृत्ती—या सगळ्यांनी मला घडवलं आहे. माझी खरी प्रेरणा आई बाबा शौरिंद्र सर आणि ती लहानगी अंकिता हीच आहेत....


तुमचं एखादं असं वाक्य किंवा विचार जो तुम्हाला प्रत्येक कठीण प्रसंगी उभं करतो?

   खरं सांगायचं तर, असं एखादं ठराविक वाक्य नाही जे मला प्रत्येक कठीण प्रसंगी उभं करतं. मला उभं करतं ते म्हणजे माझं स्वतःचं संघर्षमय भूतकाळ.मी ते दिवस आठवते, जेव्हा मी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस झटलं. ती वर्ष, जेव्हा मी प्रचंड मेहनत घेतली एकटीने, कुठलाही शॉर्टकट न निवडता.आज जेव्हा परिस्थिती कठीण वाटते, तेव्हा मला स्वतःलाच आठवण होते की "मी इतकं दूर अर्ध्यातच थांबण्यासाठी आलेली नाही."आज लोक विचारतात "तुला इतक्या संधी मिळत आहेत, दुसरीकडे जा, मोठ्या कंपन्यांमधून कॉल येतात, मग का नाही जात?"पण माझं उत्तर सोपं आहे माझं हे ऑफिस मला फक्त पगार देत नाही, ते माझं घर आहे.

मी जिथं काम करते तिथून मला इन्क्रिमेंट मिळतं, स्थिरता मिळते. आज अनेकांना त्यांच्या नोकऱ्यांवरून काढलं जातं, पण मला आजही तिथं विश्वासाने ठेवण्यात येतं. मी एका अशा टप्प्यावर आहे जिथं माझ्या अधिपत्याखाली २५ लोकांची टीम आहे.मी आज ‘इट्स मज्जा मराठी’ पुरतं नाही, तर गुजराती, बंगाली, कन्नड अशा अनेक भाषांमधल्या प्लॅटफॉर्मवर काम करते.माझ्याकडे अनेक मोठ्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट आहेत, अनेक दरवाजे खुले आहेत. पण तरीही मला वाटतं मज्जा हेच माझं घर "मी खूप पुढे आलेय."कारण मी काही वाक्यांच्या आधाराने नाही, तर स्वतःच्या अनुभवांवर उभी राहिलेय.


"तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखादी मुलाखत किंवा घटना आठवते का जी आजही हृदयात घर करून आहे?"

        मुलाखत नाही म्हणता येणार... एक घटना आहे जी कायम माझ्या हृदयात घर करून राहिली आहे. मी एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अंध मुलांच्या शाळेत रक्षाबंधन साजरे करण्यासाठी गेले होते. सेलिब्रेशन खूप छान झाले. त्या अभिनेत्यालाही फार बरं वाटलं. तो म्हणाला, "अंकिता, हे खरंच खूप वेगळं आणि भावनिक अनुभव आहे."तिथे मुलांशी गप्पा मारताना, एक छोटी मुलगी माझ्या जवळ आली. ती खूप हळुवारपणे म्हणाली, "मी तुझे इंटरव्यू ऐकते. मला तुझा आवाज ओळखतो." तिने माझा परिचय अगदी तसाच दिला:

! हॅलो, हाय! नमस्कार! मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे!"

ज्या सुरात तिने हे बोललं ना… तो क्षण म्हणजे आयुष्यभराची कमाई होती. मी त्या रात्री झोपलेच नाही. सतत तो क्षण आठवत राहिला.कोणीतरी तुम्हाला चेहऱ्याने ओळखलं नाही, तरी चालेल... पण एखादी व्यक्ती तुम्हाला फक्त आवाजावरून ओळखते, आणि म्हणते की ती तुमचे इंटरव्ह्यू ऐकते – हे किती मोठं आहे! कदाचित तिने फक्त एक व्हिडिओ ऐकला असेल, पण तो आवाज तिच्या मनाच्या खोल कप्प्यात साठवला गेला होता. हे माझ्यासाठी फार मोठं आहे.तो एक मोमेंट – तो क्षण – मी आयुष्यभरासाठी जपून ठेवणार आहे. तो क्षणच माझ्यासाठी मुलाखतीपेक्षा मोठा आहे.



 "आजच्या डिजिटल युगात पत्रकार म्हणून जबाबदाऱ्या किती बदलल्या आहेत, असं तुम्हाला वाटतं का?"

 होय, आजच्या डिजिटल युगात पत्रकारांची जबाबदारी निश्चितच खूप वाढली आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे बातमी खरी, अचूक आणि जबाबदारीने मांडली गेली पाहिजे.आज प्रत्येक जण पहिला होण्याच्या शर्यतीत आहे – कोणती बातमी आपल्याच चॅनलवर आधी लागेल याची चढाओढ सुरू असते. पण मला वाटतं, या स्पर्धेत ‘मज्जाचा दृष्टिकोन वेगळा आहे. आम्ही कुठलीही बातमी देताना आधी ती पूर्ण तपासतो, संबंधित कलाकाराशी किंवा व्यक्तीशी संपर्क करतो आणि मगच ती बातमी प्रसारित करतो. फक्त ‘पहिलेपणासाठी’ चुकीची बातमी पसरवणं चुकीचं आहे, आणि ते आमच्या प्लॅटफॉर्मवर होत नाही.

इंटरव्ह्यू घेताना देखील, आम्ही अतिशय काळजी घेतो. कुठलाही चुकीचा प्रश्न विचारायचा नाही, आणि एखादी चुकीची माहिती दिली गेली तर त्याबद्दल क्षमा मागून, लगेच दुरुस्त करतो. डिजिटल युगात बातमी झपाट्याने पसरते, त्यामुळे चुकीची माहिती ही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे जबाबदारी अधिक आहे.माझा स्वतःचा दृष्टिकोन असा आहे की, पत्रकार म्हणून केवळ बातमी देणं हेच नव्हे, तर समाजाला सत्य माहिती देणं, चुकीचं काही पसरू न देणं – हीच खरी पत्रकारिता आहे.


"नवीन पिढीतल्या तरुणींना तुम्ही कोणता संदेश द्याल?"

   नवीन पिढीतील तरुणींना मी एकच गोष्ट सांगू इच्छिते मुलींना हरायचा पर्याय नसतो! मुलींनी कधीच हार मानू नये. मुलींनी नेहमी जिंकायचं! आणि मला यावर पूर्ण विश्वास आहे की, मुली जिंकतातच."मी मुलगी आहे", "मुलगी म्हणून मी कसं करू?", "हे क्षेत्र माझ्यासाठी नाही" — असे विचार करणं थांबवा.

मुलगी असणं हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. लहानपणापासूनच मी एक गोष्ट ठरवूनच चालते – पाच वर्षांनी मी कुठे असणार?कोणतंही क्षेत्र असो, जॉइन करतानाच विचार करा की पाच वर्षांनी मी तिथे काय साध्य केलेलं असेल?याचा विचार आधीच करा – आणि मग त्या दिशेने अथक मेहनत घ्या.

तुम्ही जितका प्रामाणिकपणे संघर्ष कराल, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं.आपल्याकडे हरायचा पर्यायच नाहीये. कारण लोकं फक्त टपून बसलेत – तुम्ही कधी हरता याची वाट पाहणारे!

"मुलगी आहेस", "तुला जमणार नाही", असं लोक बोलतील – पण त्यांना तो प्रसंगच येऊ देऊ नका! लोक श्वास रोखून तुमच्या अपयशाची वाट बघत असतात,त्यांचा श्वासच गुदमरून जाऊ द्या... पण तुम्ही हरू नका,ते सुटकेचा निश्वासही टाकायला नकोत,त्यांनी वाट पाहतच राहावं पण तुम्ही फक्त जिंकतच राहा.मुलींचा पराभव हा पर्याय नाही. जिंकणं हीच शक्यता आहे. आणि ती तुम्ही पूर्णपणे साध्य करू शकता!


"‘Ankita’ म्हणून माईकच्या पलीकडे कोण आहे? कोणत्या गोष्टी तुम्हाला शांतता देतात?"

       "अंकिता म्हणून माईकच्या पलीकडे मी फार वेगळी व्यक्ती आहे... खूप, खूपच वेगळी. पण जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता, पंचवीस लोकांची टीम हँडल करता, तेव्हा काही गोष्टी स्वतःकडे ठेवाव्याच लागतात. काही गोष्टी बिझनेस माइंडने खूप लाईटली, व्यवस्थित हाताळाव्या लागतात.माझी आई आहे, जी माझं घर सांभाळते. माझी मोठी बहीण आहे, लहान भाऊ आहे... आणि माझ्याकडे एक डॉगसुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी मला आनंद देतात. खरं सांगायचं तर मला वाटत नाही मी कुठे येते तरी! पण हो, शॉपिंगसाठी जाते आणि खूप शॉपिंग करते—कारण त्या गोष्टी मला खूप आनंद देतात.मी पुस्तकं वाचते, मोबाईल बघते. अशा असंख्य गोष्टी करते, ज्या एक नॉर्मल व्यक्ती करते. मला या छोट्या छोट्या गोष्टी फार शांतता देतात. काहीतरी वाचते, पिक्चर बघते, शिकते. YouTube वर काही नवीन आले असेल, सेमिनार्स असतील तर ते अटेंड करते. या सगळ्या गोष्टी मला खूप शांतता देतात.आणि या काही वर्षांमध्ये मी स्वतःला कामात इतकं बिझी केलंय, की जेव्हा जेव्हा मी घरी असते, तेव्हा फक्त शांततेत असते. काहीच करत नाही.माझ्यासाठी तीच खरी शांतता असते. माझं घरच मला शांतता देतं."


"पुढील 5 वर्षांमध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहता? ‘MajjaGirl’ चा पुढचा टप्पा काय असणार आहे?" 

पुढील पाच वर्षांमध्ये मी आणि आमचा ‘Majja’ ब्रँड एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेला असेल, असा मला पूर्ण विश्वास आहे. मी आणि माझ्या सरांनी ‘Majja’ साठी एक मोठं स्वप्न पाहिलं आहे – आणि ते म्हणजे, एक असं डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणं जिथे ओरिजिनल कंटेंटची खरी मजा प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

'आठवी अ', 'दहावी अ', 'पाऊस' मैत्रीचा सातबारा' या वेब सिरीजनी प्रेक्षकांच्या मनात जो ठसा उमटवला आहे, तोच आमचा आत्मविश्वास आहे. ही तर फक्त सुरुवात आहे.पुढच्या पाच वर्षांत ‘Majja Originals’ हे नाव एक ब्रँड म्हणून ओळखलं जाईल – जिथे दर्जेदार, हसवणारा, विचार करायला लावणारा आणि मनाला भिडणारा कंटेंट निर्माण केला जाईल. आम्ही अशा असंख्य वेब सिरीज घेऊन येणार आहोत ज्या प्रत्येक प्रेक्षकाला ‘हेच तर पाहायचं होतं’ असं वाटतील.व्यक्तिगत पातळीवर, मी स्वतःला एका दृढ नेतृत्वाच्या भूमिकेत पाहते – जिथे मी माझ्या टीमसह एक सकारात्मक आणि सृजनशील वातावरण तयार करतेय. नव्या कलाकारांना संधी देणं, नवीन कल्पना प्रत्यक्षात आणणं आणि ‘Majja’ चं नाव सर्वत्र पोहोचवणं – हाच माझा पुढील टप्पा असणार आहे.


कधी कधी यशाच्या मागे धावता धावता आपण स्वतःला हरवतो… तुम्ही स्वतःला जपण्यासाठी काय करता?

       हो… कधी कधी खरंच वाटतं की यशाच्या मागे धावता धावता आपण स्वतःला कुठेतरी हरवतो. पण मी त्या विचारावर पूर्ण विश्वास ठेवत नाही. कारण मी स्वतःला हरू दिलं नाही. हो, मी तीच "अंकिता" राहिले नाहीये, जी आठ वर्षांपूर्वी होती. आणि मला त्याचा पूर्ण अभिमान आहे.मला आठवतंय ती जुनी अंकिता लोकांसमोर बोलायला घाबरणारी, एक वाक्य सुद्धा धड बोलू न शकणारी, सतत अडखळणारी… पण ती अंकिता मला अजूनही जिवंत ठेवते, तीच आठवण मला मजबूत बनवते. आणि म्हणूनच मला मी बदललेय असं सांगताना लाज वाटत नाही, कारण तो ‘बदल’ म्हणजे माझा ‘अपग्रेड’ आहे.आज मी जी आहे, ती जगात टिकण्यासाठी आवश्यक होती. हे जग फार वेगानं बदलतंय… आणि या प्रवाहात आपण टिकून राहायचं असेल, तर आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवावेच लागतात. मात्र हे करताना स्वतःला हरवू न देता, स्वतःला समजून घेणं, सांभाळणं आवश्यक असतं. यशाच्या मागे धावायचं की नाही, हे प्रत्येकाने ठरवायचं. पण मी ठरवलं मी स्वतःच्या अस्तित्वात उभी राहीन, प्रवाहाच्या विरुद्धसुद्धा गरज पडल्यास. स्वतःला जपणं म्हणजेच माझं खरं यश.

सामान्य मुलगी असताना 'व्हेरिफाईड' ओळख मिळवणं – यामागचं वास्तव काय असतं?

      आजच्या जगात 'व्हेरिफाईड' ही ओळख म्हणजे फक्त एका निळ्या टिक मार्कपुरती गोष्ट राहिलेली नाही, तर ती बनली आहे आपल्या कष्टांची ओळख, आपल्या अस्तित्वाचा ठसा आणि आपल्या संघर्षाचा सन्मान.पण जेव्हा कोणी सामान्य पार्श्वभूमीतून आलेली मुलगी ही ओळख मिळवते, तेव्हा लोक विचार करतात “अरे, ही तर कालपरवापर्यंत साधी होती, रातोरात प्रसिद्ध झाली!”खरंतर, 'रातोरात' काहीच होत नाही.आपल्या समाजात आजही असं वाटलं जातं की 'व्हेरिफाईड' होणं म्हणजे झटपट यश, पण कुणालाच हे दिसत नाही की त्या निळ्या टिकमार्कच्या मागे दिवस रात्र मेहनत, अश्रू, अपमान, नकार, आणि शेकडो अपयशांची कथा दडलेली असते.

आजची पिढी 'फास्ट फॉरवर्ड' मोडमध्ये जगते. पहिल्याच इंटर्नशिपचा पगार २५ हजार हवाय, पहिल्याच व्हिडिओला लाखो व्ह्यूज हवेत, पहिल्याच पावलात यशाचं शिखर. पण यश म्हणजे वाई-फाय नाही की एका क्लिकवर मिळेल,यश म्हणजे आपल्या शंका, आपल्या भीती, आणि समाजाच्या नकारात्मक दृष्टिकोनाला पार करत पुढे जाणं.एक पत्रकार, एक लेखक, एक कलाकार – हे कोणीही असो, त्यांना त्यांच्या क्षेत्रात एक 'व्हेरिफाईड ओळख' मिळवण्यासाठी केवळ कौशल्य नाही, तर अखंड चिकाटी, मानसिक ताकद, आणि अपयश पचवण्याची कुवत लागते.होय, अनेकदा लोक तुमच्यावर टीका करतील, कोणी इंटरव्ह्यू नाकारतील, कोणी तुमच्याकडे तुच्छ नजरेने पाहतील. पण हेच ते क्षण असतात जे तुम्हाला मजबूत करतात, घडवतात, आणि तुम्हाला 'व्हेरिफाईड' बनवतात – समाजाने नाही, स्वतःच्या नजरेत.आज जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून काम करत राहिलात, तर लोकं काहीही बोलो – ते फक्त बघत राहतील.तुमचं स्वप्नं – ते मुंबईत घर घेण्याचं असो, आई-वडिलांना सुख देण्याचं असो, किंवा स्वतःची ओळख निर्माण करण्याचं – ते फक्त तुमचं आहे, आणि ते पूर्ण करायचं कामसुद्धा तुमचंच आहे.ते म्हणतात ना –दुसऱ्याची रेघ पुसण्यात वेळ घालवणाऱ्यांना पुसू द्या... आपण आपली रेघ मोठी करतच राहायची.कारण शेवटी, जग ‘व्हेरिफाईड’ त्या व्यक्तीला करतं जिने स्वतःला आधी सिद्ध केलेल असतं.

 "आज तुम्ही ज्याचं स्वप्न जगता आहात, त्या 'लहानगी अंकिता'ला तुम्ही आज काय सांगाल?"

मी त्या लहानग्या अंकिताला फक्त एकच सांगेल थँक्यू.

थँक्यू त्या धास्तावलेल्या डोळ्यांसाठी…

थँक्यू त्या लाजरवाळ्या स्वप्नांसाठी…

थँक्यू की तू घाबरलीस तरी थांबली नाहीस!

तुझं ते ‘प्रसिद्ध होण्याचं’ स्वप्न, जे त्या वेळी सगळ्यांना अशक्य वाटलं, ते मी आज जगतेय. तू जर ते स्वप्न पाहिलं नसतं, तर आज मी ही ‘मोठी अंकिता’ म्हणून अस्तित्वातच नसते.लहानपणापासूनच तुला लोकांसमोर बोलायचं होतं, काहीतरी वेगळं करायचं होतं तेच स्वप्न आज मी खरं करतेय.

मी तुला पूर्ण विसरले नाही. उलट, तुला मनाच्या एका खास कोपऱ्यात घट्ट जपून ठेवलंय.कारण मला माहित आहे – ती लहान अंकिता जर घट्ट उभी राहिली नसती, तर ही मोठी अंकिता कुठेच पोहोचली नसती.आजही जेव्हा मी थकते, जेव्हा मी स्वतःला हरवते, तेव्हा तीच लहान अंकिता मला पुन्हा उभी करते तिच्या नाजूक पण जिद्दी स्वप्नांनी.म्हणून…    थँक्यू लहानगी अंकिता, तू घाबरलीस पण स्वप्नं पाहिलीस, आणि त्या स्वप्नांना मी आज जगतेय.


"लोकांचं लक्ष वेधून घेणं आणि त्यांच्या मनात घर करणं – हे साध्य करण्यासाठी कोणते 3 गुण तुमच्यात आहेत असं तुम्हाला वाटतं?"

         माझ्यामते, लोकांचं लक्ष वेधून घेणं आणि त्यांच्या मनात घर करणं हे दोन पूर्ण वेगळे टप्पे आहेत. लक्ष वेधून घेण्यासाठी मी काहीतरी 'स्पेशल' करून दाखवते असं नाही, पण माझ्या आतली जी खरी भावना आहे, ती लोकांपर्यंत पोहोचते  आणि तीच खरी शक्ती आहे.

पहिला गुण म्हणजे मनापासून संवाद साधण्याची ताकद. मी आज २५ जणांची टीम हाताळते — ती सुद्धा फक्त मराठी नव्हे, तर कन्नड, बंगाली, गुजराती अशा विविध भाषांतील लोकांची. या प्रत्येक भाषेच्या लोकांशी त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या भावनांचा आदर ठेवून संवाद साधावा लागतो. मी कधी रागावते, कधी चिडते, कधी त्यांच्यासाठी लढते… पण त्यांच्यावरचा माझा जीव अगदी मनापासून असतो.

 दुसरा गुण म्हणजे ऐकून घेण्याची तयारी. प्रत्येक वेळी उत्तर द्यावं असं नाही, कधी फक्त शांत राहून समजून घ्यावं लागतं. मला हे कळतं की ही व्यक्ती खरंच माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आली आहे की फक्त आपलं मन मोकळं करायला. आणि अशा वेळी मी बोलण्यापेक्षा 'समजून घेणं' अधिक महत्त्वाचं मानते.

 तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे प्रामाणिकपणा आणि आपलेपणा. माझ्या टीमला वाटतं की त्यांची टीमलीडर म्हणजे एक ‘इट्स मज्जाच’ नावाला साजेशीच व्यक्ती आहे – खरी, थोडी हट्टी, पण सच्ची. मी त्यांच्यावर प्रेम करते, त्यांच्यासोबत काम करते, त्यांच्यासाठी रागावते – पण त्यामागचं माझं प्रेम त्यांना कळतं, आणि त्यामुळेच मी त्यांच्या मनात घर करते.या तीन गोष्टी – मनापासून संवाद, समजून घेणं, आणि प्रामाणिक आपलेपणा – याचं मिश्रणच माझी खरी ताकद आहे, असं मला वाटतं.


चांगला पत्रकार होण्यासाठी ‘माईक’पेक्षा मोठं हत्यार कोणतं असतं?

          चांगल्या पत्रकारासाठी ‘माईक’ हे फक्त एक माध्यम आहे… खरा आवाज म्हणजे त्याचे संस्कार.माईक फक्त तुमचं बोलणं amplifiy करतो, पण तुमचे संस्कार तुमच्या शब्दांना अर्थ, गांभीर्य आणि सच्चेपणा देतात.हे संस्कार आईवडील, शिक्षक, समाज आणि अनुभवांतून मिळतात.जेव्हा एखादा पत्रकार समाजासमोर उभा राहतो, तेव्हा त्याच्या आवाजामागे असते एक जबाबदारी – कुणाला दुखवू नये, कुणावर अन्याय होऊ नये आणि सत्ताधाऱ्याला खरी जाणीव करून द्यावी.ही जाणीव, ही संवेदना, ही सचोटी – हे सगळं माईकमधून नाही, तर मनामधून येतं… आणि त्याचं मूळ असतं संस्कारांमध्ये.म्हणून मला वाटतं, चांगला पत्रकार होण्यासाठी माईक पेक्षा मोठं हत्यार म्हणजेच – आपले संस्कार.


"जर आयुष्य एक Talk Show असतं, तर त्याचं नाव काय ठेवलं असतं आणि पहिला पाहुणा कोण असता?"

             जर आयुष्य एखादं Talk Show असतं ना, तर त्याचं नाव मी "मज्जा" ठेवलं असतं.कारण आयुष्यात मजा नसेल, तर ते आयुष्य कसले? मजा म्हणजे उत्साह, खळखळाट, हसणं, शिकणं आणि जगणं,आणि या 'मज्जा' शोच्या पहिल्या पाहुण्या असत्या अंकिता लोखंडे.लहानपणी तिची एक वेगळीच ओळख माझ्या मनात तयार झाली होती. ती पडद्यावर जितकी सुंदर दिसते, तितकीच ती मनानं सकारात्मक वाटायची.तिला अनेक प्रश्न विचारले असते – बालपणाच्या आठवणी, पहिलं ऑडिशन, अपयशात काय शिकली आणि यशात काय हरवलं.आणि हो, गप्पा देखील खूप रंगल्या असत्या – आरशात स्वतःशी बोलण्यापासून ते आयुष्यातल्या मोठ्या निर्णयांपर्यंत सगळं!

खरं सांगायचं तर, आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी स्वतःशी गप्पा मारतो – पण मग का नाही त्या गप्पा जाहीर करायच्या?म्हणूनच, ‘मज्जा’ या Talk Show मध्ये पहिला पाहुणा हा कोणी प्रसिद्ध व्यक्ती नसून, स्वतः मीच असतो! कारण स्वतःशी संवाद सुरू झाला की, आयुष्य आपोआप मजेशीर होतं........


माझं आयुष्य हे एक टॉक शो असतं, तर त्याचं नाव मी ‘मज्जाच!’ ठेवलं असतं...

अंकिता लोखंडेच्या या एका ओळीत तिचं अख्खं जीवनगाणं सामावलेलं आहे.कोणत्याही मोठ्या यशाच्या मागे असते एक लहानशी स्वप्नांची खोली, स्वतःशीच केलेल्या गप्पा, अडचणींच्या वादळातून शब्दांचं आश्रय घेत केलेली वाटचाल. अंकिताची कहाणीही काहीशी अशीच... महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली, मुंबईच्या स्पीडने शिकलेली आणि स्वतःच्या आवाजाने मनं जिंकणारी ‘मज्जा गर्ल’ आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.तिच्या शब्दांत जशी सहजता आहे, तसाच तिच्या व्यक्तिमत्त्वात खळाळता आत्मविश्वास आहे. तिच्या उत्तरांमधून दिसणारी ती लहानग्या अंकिताची आठवण, जी आरशात स्वतःशी गप्पा मारायची; आणि आज तीच मुलगी असंख्यांच्या मनात शब्दांची दिवे पेटवते आहे.'प्रसिद्धी पेक्षा प्रामाणिकपणा' आणि 'यशापेक्षा अनुभव' यांना महत्त्व देणारी ही मुलगी खऱ्या अर्थाने आजच्या पिढीची प्रतिनिधी आहे. कारण यश हे मोजमाप नाही, ते अनुभवाचं संकलन असतं आणि हे अंकिता लोखंडे जगून दाखवत आहे.आजच्या या डिजिटल युगात, जिथे आवाजांचे कोलाहल आहेत तिथे अंकिताचा आवाज शुद्ध, सरळ आणि खरा वाटतो. तो केवळ ऐकवण्यासाठी नाही, तर ऐकण्यासाठी आहे. आणि म्हणूनच 'न्यूज कट्टा'च्या माध्यमातून ही खास बातचीत तुमच्यापर्यंत पोहचवताना आम्हाला वाटतंय – आपण फक्त एका मुलाखतीचा भाग नव्हतो, तर एका प्रेरणादायी प्रवासाचे साक्षीदार होतो.

अंकिता लोखंडे ही केवळ एक निवेदिका नाही, तर हजारोंना स्वतःच्या आवाजाची, ओळखीची आणि आत्मभानाची आठवण करून देणारी एक नितळ ऊर्जा आहे.


विशेष मुलाखत - Team Newsskatta


أحدث أقدم