(विशेष लेख विश्वनाथ गरुड पुणे)
युट्यूब पार्टनरशीप प्रोग्रॅममध्ये येत्या १५ जुलैपासून महत्त्वाचा बदल होणार, अशा बातम्या काही डिजिटल माध्यमांनी दोन दिवसांपूर्वी दिल्या होत्या. त्या बातम्यांमध्ये रिपीटेटिव्ह कंटेट (तोच तो आशय) आणि विश्वासार्ह नसलेला आशय या स्वरुपाचे व्हिडिओ कोणताही क्रिएटर प्रसिद्ध करीत असेल, तर संबंधित व्हिडिओ मॉनेटाईज होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. म्हणजे त्या व्हिडिओचे पैसे संबंधित क्रिएटरला मिळणार नाहीत.
युट्यूबवरील क्रिएटर्सची संख्या भारतात खूप वेगाने वाढली आहे. याचे उदाहरण म्हणजे युट्यूब मॉनेटायजेशन हा की-वर्ड शनिवारी गुगल ट्रेंडमध्ये आला आहे. खूप लोक एखादा विषय सर्च करीत असतील, तर तो ट्रेंडमध्ये येतो. ज्यांचे युट्यूबवर चॅनेल नाही. त्यांना याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. तरीही हा की-वर्ड ट्रेंडमध्ये येतो, याचा अर्थ खूप लोक त्याचा शोध घेत आहेत. यातून त्यांची संख्या जास्त असल्याचे सहज समजते.
दुसरे असे की या संदर्भात खुद्द युट्यूबने त्यांच्या अधिकृत ब्लॉगवर शुक्रवारीच खुलासा केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की हा बदल फारमोठा असणार नाही. युट्यूब सातत्याने आपले नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे अपडेट करीत असते. हा बदल त्याचाच एक भाग आहे.
मुळात युट्यूबवर जे क्रिएटर स्वतःचे व्हिडिओ तयार करून प्रसिद्ध करतात. त्यांना या अपडेटमुळे काहीही फटका बसणार नाही. पण जे क्रिएटर्स तंत्रज्ञानाचा वापर करून मास-प्रोडक्शन करतात. म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून मोठ्या प्रमाणात व्हिडिओ युट्यूबवर प्रसिद्ध करतात. त्यांना या अपडेटमुळे धक्का बसणार आहे. जे व्हिडिओ ग्राहकांकडून स्पॅम म्हणून नोंदवले जातात. त्यांना याचा फटका बसणार आहे.
युट्यूबवरील आशय हा अधिकाधिक स्वतःचा असावा, त्यामागील विचार, त्याची निर्मिती, त्यातील दृश्ये, त्यातील संगीत हे सर्व क्रिएटरने स्वतः तयार केलेले असावे. अशा व्हिडिओंना युट्यूब पुढील काळात अधिकाधिक प्राधान्य देईल. त्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. हे या अपडेटमधून समजून घ्यायला हवे.
या अपडेटमुळे आता लगेच फार मोठ्या प्रमाणात क्रिटएर्सना धक्का बसणार नसला, तरी हे बदल समजून घेऊन स्वतःमध्ये बदल केले नाहीत, तर येत्या काळात नव्या अपडेट्सचा फटका नक्कीच बसू शकतो.