🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

रस्तोरस्ती नंगानाच आणि निर्वस्त्र लोकशाही

विशेष लेख अमृता खंडेराव

लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, लोकांची मते, लोकांचे हित. पण जेव्हा लोकांच्या विवेकावर पडदा पडतो, जेव्हा लोकच उथळ, स्वस्त आणि ओंगळ मनोरंजनाच्या नादी लागतात, तेव्हा ती लोकशाही स्वतःचे कपडे उतरवते. आज महाराष्ट्रात आणि देशभरात सण-उत्सव, निवडणुका, राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम या सगळ्याच ठिकाणी जी नवी प्रथा वाढते आहे, ती नेमकी लोकशाहीचा कोणता चेहरा दाखवते आहे?


लावणी ही महाराष्ट्राची शान आहे. तिच्यात शृंगार आहे, नृत्याचे शास्त्र आहे, ताल आहे, शब्दांची ताकद आहे. 'लावणी' ऐकली की डोळ्यासमोर येते ती गंधर्वनगरीसारखी झगमगणारी रंगभूमी, हार्मोनियमचे सूर, ढोलकीची लय आणि नृत्यांगनेच्या चेहऱ्यावरची नजाकत. पण आज 'लावणी' या नावाखाली जे काही चालते आहे ते पाहिलं की संताप येतो.हिंदुस्थानात नृत्य ही देवपूजेची कला मानली जाते. 'नटराज' शिव हा नृत्याचा अधिपती. पण आज या नृत्यकलेचा अवमान करून तिला फक्त अंगप्रदर्शनाची साधने बनवले गेले आहे. मंचावर किंवा रस्त्यावर जेव्हा नर्तकी अश्लील हालचाली करते, तेव्हा ती फक्त स्वतःचीच नव्हे तर आपल्या संस्कृतीचीही थट्टा उडवते.


आजकाल प्रत्येक सणाला डीजे, नाचगाणी, महिलांचे नृत्य, अश्लील हावभाव हे 'नॉर्मल' झालं आहे. भजनाऐवजी बास वाजतो, पोवाड्याऐवजी हिंदी आयटम साँग, ढोल-ताशांच्या तालाऐवजी 'बीडी जलईले'वर टाळ्या. या सगळ्यात सणाचा आत्मा कुठे गेला?पारंपरिक सणांचा उद्देश समाजात ऐक्य निर्माण करणे, एकत्र येऊन श्रद्धा व आनंद व्यक्त करणे हा होता. पण आजचा सण म्हणजे गर्दी करणे, रस्ते अडवणे, कानठळ्या बसवणारे डीजे वाजवणे आणि गर्दीसमोर नर्तकी नाचवून मोकळं होणं. हे कोणत्याही संस्कृतीचे लक्षण नाही, ही फक्त उथळपणाची निशाणी आहे.


सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो राजकारण्यांचा. निवडणूक आली की मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात. लाखो रुपये खर्चून 'नर्तकी शो' ठेवला की गर्दी जमते, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतात, आणि राजकारण्याला 'लोकप्रिय' असल्याची खोटी खूण पटते.पण खरे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, पायाभूत सुविधा, रस्त्यांची दुरवस्था, शिक्षणातील दर्जा याकडे कुणाचे लक्ष जात नाही. कारण नाचणाऱ्या बायका दिसल्या की लोकशाहीला लागलेले जखमेचे व्रण कुणाला दिसतच नाहीत.


या सगळ्यात मोठी जबाबदारी नागरिकांची आहे. आपणच गर्दीत उभं राहून टाळ्या वाजवतो, आपल्या मुलांना घेऊन जातो. सोशल मीडियावर व्हिडिओ बघून हसतो, शेअर करतो. मग राजकारणी असे कार्यक्रम का थांबवतील?लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही. लोकशाही म्हणजे "आम्हाला काय हवे आणि काय नको" हे स्पष्टपणे सांगण्याची ताकद. पण जर नागरिकांनी ही ताकद गमावली तर राजकारणी काहीही करतील आणि आपण फक्त प्रेक्षक राहू.


महाराष्ट्राची लोककला ही जगातील एक मोठी संपत्ती आहे. भारुड, पोवाडा, लेझीम, ढोल-ताशा, समशेर नृत्य, घुंगुरकाठी… किती तरी प्रकार आहेत. मग हे सगळं सोडून अश्लील गाण्यांवर का नाचावं लागतं?तरुणांना नाचायचं आहे, आनंद साजरा करायचा आहे हे खरे. पण दर्जेदार कला त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर तेच तरुण त्यात रंगून जातील. प्रश्न आहे फक्त आयोजकांच्या हेतूचा. पैसा वाखाणायचा की संस्कृती जपायची?


आज जी दृश्यं दिसतात रस्त्यात नर्तकी, स्टेजवर राजकारणी, गर्दीत टाळ्या वाजवणारे नागरिक ही फक्त कार्यक्रमांची अधोगती नाही तर लोकशाहीची अधोगती आहे. कारण जेव्हा नागरिक उथळ मनोरंजनाला विवेकापेक्षा वरचं स्थान देतात, तेव्हा लोकशाहीचे कपडे उतरतात.

लोकशाहीला निर्वस्त्र करणारे हात म्हणजे 

पैशाच्या जोरावर संस्कृती विकणारे राजकारणी

स्वस्ताईला कला समजणारे आयोजक

विवेक हरवलेले नागरिक

लोकशाही टिकवायची असेल तर नागरिकांनी आपली भूमिका बदलावी लागेल.अशा कार्यक्रमांना हजेरी लावणे थांबवावे.मुलांना दर्जेदार कला दाखवावी.राजकारण्यांना थेट विचारावे तुम्ही आम्हाला रोजगार द्यायला आलात की रस्त्यावर नाचायला?सण-उत्सवांच्या नावाखाली जे 'नंगानाच' सुरू आहेत त्यांना समाजाने थारा देऊ नये.कारण लोकशाही ही फक्त कागदावरची नसते, ती आपल्या कृतींमध्ये असते. आपणच जर नंगानाचाच्या गर्दीत टाळ्या वाजवल्या, तर लोकशाही उद्या खरोखर निर्वस्त्र होऊन आपल्या डोळ्यासमोर उभी राहील

थोडे नवीन जरा जुने