कोल्हापूर दि. 19 ऑगस्ट :
गेल्या २४ तासांत कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून नद्या, नाले व ओढ्यांतून तुडुंब पाणी वाहू लागले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सरासरी ६५.५ मिमी पावसाची नोंद झाली असून गगनबावडा तालुका १५१.३ मिमी पावसासह सर्वात आघाडीवर राहिला आहे.
पर्जन्यमान स्थिती
हातकणंगलेत ५०.८ मिमी, शिरोळमध्ये ३४.४ मिमी, पन्हाळ्यात ७०.९ मिमी, शाहुवाडीत ७७ मिमी, राधानगरीत ९१.८ मिमी, करवीरमध्ये ५९.९ मिमी, कागलमध्ये ७२ मिमी, गडहिंग्लजमध्ये ५१.९ मिमी, भुदरगडमध्ये ९२.२ मिमी, आजऱ्यात ६६.९ मिमी तर चंदगडमध्ये ६५.४ मिमी पाऊस झाला.
रस्ते वाहतूक कोलमडली
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग सुरळीत सुरू असले तरी राज्य मार्गांपैकी ४ बंद झाले आहेत. प्रमुख जिल्हा मार्ग १२, इतर जिल्हा मार्ग १ आणि ग्रामीण मार्ग १० ठिकाणी वाहतुकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. पाणी साचल्याने काही मार्ग बंद ठेवण्यात आले असून पर्यायी मार्गांचा वापर सुरू आहे.
नुकसानीचा आढावा
गेल्या दोन दिवसांत काही घरांची पडझड झाली आहे. १८ ऑगस्ट रोजी १ पक्के घर कोसळले, तर कच्च्या घरांची संख्या ६६ इतकी आहे. आतापर्यंतच्या एकूण पडझडीमध्ये ४ पक्की व ६२७ कच्ची घरे समाविष्ट आहेत. जनावरांच्या हानीत ७ मोठ्या दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला असून बाधित गोठ्यांची संख्या ३९ पर्यंत पोहोचली आहे. आतापर्यंत तीन जणांचा पावसामुळे मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे.
नदीपातळी वाढली
पंचगंगा नदीच्या विविध ठिकाणी पाणीपातळी वाढलेली दिसत आहे. सकाळी १० वाजेपर्यंतची आकडेवारीनुसार, राजाराम बंधाऱ्यावर ३५.११ फूट पातळी नोंदली गेली आहे (इशारा पातळी – ३९ फूट). शिरोळ, नृसिंहवाडी, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड या ठिकाणी पाणीपातळीत वाढ होत आहे; मात्र अद्याप ती इशारा किंवा धोका पातळीला पोहोचलेली नाही.
धरणांची स्थिती
धरणांमध्येही पाणी साठा झपाट्याने वाढतोय. राधानगरी धरण १०० टक्के भरले असून सर्व सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. वारणा धरण ९३ टक्के भरले असून १८,६३० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तुळशी व दूधगंगा धरणांत अनुक्रमे ९९ व ९३ टक्के साठा असून या धरणांतूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पूरप्रवण भागातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय तेली यांनी दिली.