🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

कोल्हापूरात पावसाचा जोर ओसरला तरी पंचगंगा नदी धोका; पातळीवर..

कोल्हापूर, दि. 21 ऑगस्ट 

गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे. शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून, पंचगंगा नदी राजाराम बंधाऱ्यावर इशारा पातळीवर पोहोचल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य धोक्याचा अंदाज घेत महापालिकेकडून नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.


नदीची पातळी धोकादायक

पंचगंगा नदी आज (21 ऑगस्ट) सकाळी आठ वाजता 42 फुट 9 इंच होती, तर दुपारी एक वाजता पातळी वाढून 43 फुटांवर गेली. हीच नदीची इशारा पातळी असल्याने नागरिकांना तातडीने स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. नदीच्या काठावरील गावांमध्ये प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला असून, ग्रामस्थांना वेळेत सुरक्षित स्थळी हलविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


वाहतुकीवर मोठा परिणाम

जिल्ह्यातील 80 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.


कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर केर्ले–केर्ली दरम्यान पुराचे पाणी शिरल्याने रस्ता बंद करण्यात आला. या मार्गावरील वाहतूक वडणगे फाटा–निगवे दुमाला–जोतिबा रोड–वाघबिळ मार्गे वळविण्यात आली आहे.


बावडा–शिये मार्ग पूर्णपणे बंद झाला असून, नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


हॉटेल ग्रीन फील्ड जवळील रजपूतवाडी परिसरात तब्बल दीड फूट पाणी आल्याने पोलीसांनी वडणगे फाटा येथे बॅरिकेडिंग करून मार्ग बंद केला.


या मार्गाचा पर्याय म्हणून कोल्हापूर–वाठार–वारणानगर–बोरपाडळे हा रस्ता खुला ठेवण्यात आला आहे.


वाहनधारकांची मात्र मोठी कसरत सुरू असून, विशेषत: तळकोकणात जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.


प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नदीकाठच्या व पुरग्रस्त भागातील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात यावे, यासाठी महसूल, पोलीस, महापालिका तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत.


येडगे यांनी स्पष्ट केले की, “कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतली आहे. पुरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणतीही दुर्लक्ष किंवा ढिलाई चालणार नाही.”


पुरात अडकलेल्या ट्रक चालकांची सुटका

दरम्यान, आणूर–बस्तवडे रस्त्यावर एक धक्कादायक प्रकार घडला. पावसामुळे रस्ता बंद असताना एक ट्रक चालक व त्याचा क्लीनर बॅरिकेड्स बाजूला करून पुराच्या पाण्यात शिरले. नदीच्या पाण्याचा जोर वाढल्याने ट्रक बंद पडला आणि तो पाण्यात अडकून पडला. ट्रकवर चढून हे दोघे मदतीची वाट पाहत होते.


ग्रामस्थांनी व पोलिसांनी तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळविले. स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेत धाडसी कामगिरी करून ट्रक चालक व क्लिनरची सुखरूप सुटका केली. या घटनेमुळे प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना बंद मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा दिला आहे.


नागरिकांची कोंडी

पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शेतजमिनींमध्ये पाणी साचल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर शहरातही रस्त्यावर पाणी आल्याने दुकानदारांना तोटा सहन करावा लागला.


वाहतुकीचे मार्ग बदलल्याने विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहने पर्यायी मार्गाने वळवल्यामुळे तासन् तास प्रवास करावा लागत आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की 

अफवांवर विश्वास ठेवू नये.

नदी, ओढ्यांच्या काठावर जाणे टाळावे.

आवश्यकतेनुसार प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

सुरक्षित स्थळी स्थलांतरित झालेल्यांनी तात्पुरत्या निवारा केंद्रात रहावे.

कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने सज्जता दाखवत पुरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. पंचगंगा नदीची पातळी आणखी वाढल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.




أحدث أقدم