कोल्हापूर - जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गावर केर्ले–केर्ली दरम्यान पुराचे पाणी आले आहे. या मार्गावरील सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच बावडा–शिये मार्गही पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी इतर मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी बुधवारी पहाटे इशारा पातळी ओलांडून धोका पातळीच्या दिशेने सरकत आहे.
सध्याची पातळी – 42 फुटांच्या पुढे गेली आहे
इशारा पातळी – 39 फूट
धोका पातळी – 43 फूट
विसर्ग – 61,549 क्युसेक
दरम्यान, जिल्ह्यातील तब्बल 79 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
नदी–ओढ्यांच्या काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची सूचना.
बंद झालेल्या रस्त्यांवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे आदेश.
कोणतीही जीवित वा वित्तहानी होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश.
पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
KMC च्या निवारा केंद्रात 35 नागरिक स्थलांतरित
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांचे स्थलांतर सुरू असून चित्रदुर्ग मठ येथे निवारा केंद्र उभारण्यात आले आहे.
एकूण कुटुंबे – 9
पुरुष – 9
स्त्रिया – 11
लहान मुले – 9
लहान मुली – 6
एकूण नागरिक – 35 (सुतारवाडा येथून स्थलांतरित)
मुसळधार पावसामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग केला जात आहे.
राधानगरी – 8,640 क्युसेक
दूधगंगा – 18,600 क्युसेक
वारणा – 24,090 क्युसेक
कोयना – 95,300 क्युसेक
अलमट्टी – 2,50,000 क्युसेक
हिप्परगी – 1,25,969 क्युसेक
नद्यांचा जलस्तर वाढत असल्याने नागरिकांनी नदी–ओढ्यांच्या काठावर जाणे टाळावे, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.