कोल्हापूर :गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे वाढलेल्या नदीपात्रातील पाणीपातळीला आज दिलासा मिळाला आहे. दूधगंगा व कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरल्याने विसर्गात घट झाली आहे.
दूधगंगा धरण
दूधगंगा धरणात पाण्याची आवक कमी झाली असून सांडव्यावरील विसर्ग 9500 क्युसेक पर्यंत खाली आला आहे. तर विद्युतनिर्मिती केंद्रातून 1500 क्युसेक विसर्ग सुरू असून एकूण 11,000 क्युसेक पाणी दूधगंगा नदीपात्रामध्ये सोडले जात आहे. नदीपात्रातील पाणीपातळीत थोडी घट होण्याची शक्यता असल्याची माहिती कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी दिली. तसेच ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून नदीपात्रात न उतरण्याचे आवाहन केले आहे.
कोयना धरण
कोयना धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज रात्री सहा वक्र दरवाजे ४ फूट ६ इंचांवरून ३ फुटांवर खाली आणण्यात आले. त्यामुळे कोयना नदीपात्रात 19,800 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. याशिवाय पायथा विद्युतगृहातील दोन्ही युनिटमधून 2100 क्युसेक विसर्ग सुरू असून एकूण 21,900 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी (21 ऑगस्ट, रात्री 11:00 वा.)
तेरवाड बंधारा – 62 फूट 09 इंच (इशारा 71 फूट, धोका 73 फूट)
शिरोळ बंधारा – 61 फूट 09 इंच (इशारा 74 फूट, धोका 78 फूट)
नृसिंहवाडी यादवपुल – 60 फूट 10 इंच (इशारा 65 फूट, धोका 68 फूट)
रुई बंधारा – 70 फूट 08 इंच (इशारा 67 फूट, धोका 70 फूट)
इचलकरंजी बंधारा – 67 फूट 00 इंच (इशारा 68 फूट, धोका 71 फूट)
सुर्वे बंधारा – 39 फूट 11 इंच
अंकली बंधारा – 47 फूट 02 इंच
राजापूर बंधारा – 49 फूट 03 इंच
सद्यस्थितीत नदीपात्रातील पाणीपातळी नियंत्रणात येत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.