कोल्हापुर - घाटमाथा आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सलग मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांचा रौद्ररूप पुन्हा एकदा दिसू लागला आहे. जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात तब्बल पाचव्यांदा पात्राबाहेर गेली असून इशारा पातळी गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राधानगरी धरणाचा विसर्ग वाढला
पावसाचा जोर कायम राहिल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे सोमवारी पहाटे उघडण्यात आले. परिणामी तब्बल ११ हजार ५०० क्युसेक पाणी भोगावती नदीपात्रात सोडले जात आहे. या प्रचंड विसर्गामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ होऊन नदीने पुन्हा धोक्याचा इशारा दिला आहे.
इतर धरणांतूनही पाण्याचा मोकाट प्रवाह
जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांचा विसर्गही मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. वारणा धरणातून ६,६३० क्युसेक, दूधगंगा धरणातून ५,५०० क्युसेक तर कुंभी धरणातून १,३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या सर्व विसर्गामुळे पंचगंगा आणि उपनद्यांची पातळी सतत वाढत असून नदीकाठच्या गावांना सजग राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
४५ बंधारे पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला
शाहुवाडीसह जिल्ह्यातील अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शाहुवाडी तालुक्यातील कासारी खोऱ्यातील बर्की बंधारा पाण्याखाली गेला असून बर्की, बुरानवाडी, लटकेवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हाभरात तब्बल ४५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ते वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रशासनाचा अलर्ट
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नदीकाठच्या ग्रामस्थांना धोकादायक ठिकाणी न थांबता सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनावरे आणि मालमत्ता यांची देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे,” असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.