कोल्हापूर | राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सामान्य नागरिकांना न्याय मिळावा, या उद्देशाने कोल्हापूर सर्किट बेंचची निर्मिती झाली असून ती व्यवस्था केवळ वकिलांसाठी नव्हे, तर गोरगरिबांसाठी आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनानंतर मेरी वेदर क्रीडांगणावर आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
गवई म्हणाले की, "समानतेच्या न्यायदानासाठी शाहू महाराजांच्या विचारांचे अनुकरण करा. आता खंडपीठ स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयाने प्रस्ताव सादर करावा. ती मागणी लवकरच पूर्ण होईल."
ते पुढे म्हणाले, "गेल्या ४३ वर्षांच्या संघर्षात २५ वर्षांपासून मी सहभागी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०१४ पासून या लढ्यात आहेत. न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाचा आग्रह मी कायम धरला. आज हा निर्णय प्रत्यक्षात आल्याचा मला आनंद आहे."
शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना न्याय देण्याची संधी मिळाल्याचे सांगून त्यांनी या दिवसाला नियुक्तीप्रमाणेच आनंददायी म्हटले. कोल्हापूर सर्किट बेंच ही वंचितांसाठी न्यायप्राप्तीचा मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.