🔴 कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला     🔴 राधानगरी धरणाच्या 1 दरवाज्यातून विसर्ग सुरू     🔴 कोल्हापूर- पंचगंगा राजाराम बंधारा पाणी पातळी 43.03 फुटांवर-धोका पातळी ओलांडली     🔴 मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला     🔴 NO Parking वर खुलेआम पार्किंग ट्रॅफिक पोलिस बघ्याच्या भूमिकेत     🔴 स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका दिवाळीनंतरच    
Breaking News]]>

पक्ष बदलतोय, विचार नाही : करवीरमध्ये राहुल पाटील यांचा 25 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीत प्रवेश..

अजय शिंगे/कोल्हापूर, दि. 20 ऑगस्ट – दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे २५ ऑगस्ट रोजी भव्य प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.


राहुल पाटील यांनी या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही पक्ष बदलत आहोत, मात्र विचार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विचार तसाच राहणार आहे, फक्त व्यासपीठ बदलेल.”


त्यांनी पुढे सांगितले की, “विधानसभा निवडणुकीत आम्हाला उमेदवारी मिळाली होती. त्या वेळी महाविकास आघाडीने आमच्या पाठीशी उभे राहून मोठी मदत केली होती. आमदार सतेज पाटील यांनी देखील पूर्ण ताकद लावून साथ दिली होती. मात्र आजची परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी सोडविणे आमचे कर्तव्य आहे. प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठीच आम्ही हा निर्णायक पाऊल उचलत आहोत.”


भोगावती कारखान्याच्या कर्जप्रश्नी अजित पवारांना भेटण्यासाठी गेलेल्या पाटील यांनी स्पष्ट केले की, पहिल्याच भेटीत उपमुख्यमंत्र्यांनी कर्ज देण्याची ग्वाही दिली. त्याच वेळी पक्षप्रवेशाचा पर्याय पुढे आला. यानंतर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.


करवीर मतदारसंघातील समीकरणांबाबत बोलताना राहुल पाटील यांनी स्पष्ट केले की, “आमदार चंद्रदीप नरके हे आमचे पारंपरिक विरोधकच राहतील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असोत किंवा विधानसभा निवडणूक, आम्ही केवळ राष्ट्रवादी काँग्रेस व पी. एन. पाटील गट म्हणूनच लढणार आहोत. नरके यांच्याशी कुठलीही राजकीय जुळवाजुळव होणार नाही.”


त्यांनी पी. एन. पाटील यांच्या काळातील आठवणींनाही उजाळा दिला. “साहेब पराभूत झाले तरी त्यांच्या पाठीशी विलासराव देशमुख यांसारखे नेते उभे होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला नाही. पण आजची वेळ वेगळी आहे, राजकारणाचे रंग बदलले आहेत. कार्यकर्त्यांच्या हितासाठी नवे निर्णय घेणे आवश्यक झाले आहे.”


करवीरमधील हा पक्षप्रवेश सोहळा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असून, महायुतीतील समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसला नव्या ऊर्जेसह कार्यकर्त्यांचा ओघ मिळण्याची चिन्हे आहेत.


أحدث أقدم